Monday, December 13, 2010

रतनगड

दिवाळीची ४ दिवस सुट्टी... सणाचे दिवस असले तरी ४ दिवस घरात बसुन काढणे आम्हा भटक्यांना कठिणच.

हो ना करत रतनगडचा बेत नक्की झाला. रविवारी सकाळीच कसारा गाठुन भंडारदरा (शेंडी)ला पोहचलो. रतनगडाला जायचं तर प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण पार करुन रतनवाडी गाठाव लागतं. त्यात एकमेव होडी सेवा, वाट पहाण्यात दुपारचे चार वाजले. होडीतुन एक तासाचा प्रवास करुन रतनपाड्यात पोहचायला संध्याकळचे ५ वाजले.
आम्हा सहाजणां पैकी तीघे मोटरसायकल वरून आल्याने आधीच गडावर पोहचले होते. चढाईला दोन तास लागणार होते, सुर्य मावळतीकडे झुकला होता, त्यातच अमावस्या होऊन गेली होती. वाटेतच अंधार पडणार याची खात्री पटली.

काय करावे या विचारात पुढे निघालो असता, नदीच्या टोकाशी अमृतेश्वराचे मंदिर दिसले.
Photobucket
यादवकालीन सुमारे १२०० वर्षा पुर्वीचे हेमाडपंथी मंदिर, त्याचा शांत परिसर आणि यक्षकिन्नरांच्या सुबक मुर्त्यांनी सजलेलं मंदीर मनाला भुरळ पाडतं होतं. मंदिराच्या बाजुला एक विस्तीर्ण पुश्करणी आहे. भंडारदर्‍याला येणारे बरेचसे पर्यटक खास मंदिराला भेट देउन जातात. थोडावेळ मंदिरात विसावल्यावर तेथील फ़ेरीवाल्यांकडे वाटाड्याची चौकशी केली. वाटाड्याचं आणि आमचं सुत्र जमल्यावर आम्ही चौघांनी गडाकडे कुच केली. सकाळ पासुन होणार्‍या प्रवासाच्या कसरतीमुळे थकवा जाणवत होता. पण कोणत्याही परिस्तिथीत गडावर पोहचायचा निर्धार होता.

मजल दरमजल करत तासाभरात एका तिट्यावर आलो. त्यातील एक वाट हरिश्चंद्र गडाला जाते याची पुष्टी वाटाड्याने केली. आम्ही उजविकडे वळुन पहिल्या पठारावर पोहचलो. पुर्वेकडून चढत असल्यामुळे सुर्य आमच्यासाठी कधीच मावळला होता. उरलेली पायवाट संधीप्रकाशात पार करावि लागणार या चिंतेत असताना; समोर गडाचा उभा चढ दिसला आणि आमच्यातली हवा पार निघुन गेली. साडेसहाच्या सुमारास दोन हेलकावणार्‍या शिड्या चढून ५० फ़ुटाचे अंतर कमी केले.
Photobucket
Photobucket

काळोखात गडाचा पुर्व दरवाजा (बहुदा गणेश दरवजा) नरजेत येत होता, परंतु वाट अगदीच चोंचोळी होती. त्या चिमण्या वाटेतुन दरवाजात पाऊल ठेवताच दुपारी पोहचेलेले तीघे जण त्यांच्याकडील टॉर्च नाचवत सामोरे आले. सगळ्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन गड काबीज केल्याचा आनंद साजरा केला.
दुसर्‍या दिवशी पश्चिमेकडून कोकणात उतरायचा मनसुबा वाटाड्याला बोलून दाखवला आणि त्याने ही तयारी दर्शवली. सकाळी परत वर येण्याचे आश्वासन देऊन त्या अमावस्येच्या अंधारात तो गडप झाला. जवळच असलेल्या गुहेत जाऊन पाठिवरचा भार कमी केला.
Photobucket

दुपारचे जेवण चुकल्यामुळे आता पोटात काक शाळा पेटली होती. लगेच चुल पेटवुन गरमा गरम चिकन सुप तयार केला, MTR चा तयार पुलाव गरम करुन दोन मिनिटात फ़स्त केला.
Photobucket
प्रत्येकाने सोबत बराच शिधा आणला होता. चुलीवर खिचडी तयार होत असताना विस्तवावर (सुकामेवा) सुके बोंबिल भाजले जात होते. खिचडी, तळलेली मिर्ची आणि सुके बोंबील अशी फ़क्कड मेजवानी झाली आणि दमललेले आत्मे तृप्त होऊन गुहेत निद्रीस्त झाले. मधेच एखादी विद्युतलता अंधाराचे गुढ वाढवुन जाई... त्यामुळे रात्रभर वेगवेगळ्या आवाजाने जाग येत राहिली. सुर्योदायाला सगळी मंडळी निसर्गाला हाक देण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या ठिकाणांना भेट देऊन आली. रात्री शिल्लक राहिलेल्या सुक्या मेव्यानेच सकाळी दंतमंजनाचा कार्यक्रम पार पडला. नाष्ट्याला दिवाळीचा फ़राळ होताच.

आम्हाला गडाच्या पश्चिमेला खाली ठाणे जिल्ह्यात उतरायचे होते. साम्रद आणि घाटघर पर्यंतची पायपीट किमान ३ ते ४ तासांची होती, म्हणुन वाटाड्याला सकाळी नऊलाच हजर रहाण्याची ताकीद दिली होती. त्या अनुशंगाने आठच्या सुमारास आम्ही गडाच्या प्रदक्षीणेला निघालो. गुहे शेजारीच रतनाईदेवीचे कातळात कोरलेले मंदीर दिसले. गणेश दरवाजाकडून पुढे गेल्यावर एक ढासळलेला बुरुज दिसला, बाजुलाच थंडगार गोड पाण्याची तीन्-चार टाके होती. थोडं पुढे गेल्यावर साम्रद कडे घेउन जाणार कोकण दरवाजा दिसला. दरवाजाची बरीच पडझड झाली होती आणि खाली खोल दरी दिसत होती, वाटेचं नामोशिशाण दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला कोकणात उतरण्याचा निर्णय बदलावा लागला. पुढे गेल्यावर आणखी काही टाके आणि एक भुयार दिसलं. आत जाण्याचा छोटासा मार्ग होता पण कोणाची भीड झाली नाही.

बाले किल्ल्याचा शेवटच्या टप्प्यात निसर्गाचा एक उत्कृष्ट नमुना पहावयास मिळाला. गडाच्या कातळ भिंतीत एक निसर्गनिर्मीत नेढे आहे..
Photobucket

Photobucket


पाच एक मिनिटाचा उभा चढ चढुन नेढ्यात गेल्यावर समोर ४२०० फ़ुट खोलीवरचा पुर्ण भंडारदराचा परिसर डोळे विस्फ़ारुन टाकत होता. नेढ्याच्या दोन्ही बाजुने वारा कानात गुंजन करत होता. गावातुन निघालेली होडी दिसत होती, त्वरीत एका BSNL मित्राने सेलवरुन नावाड्याशी संपर्क साधला असता... दुपारी दुसर्‍या फ़ेरीला १२ पर्यंत वाट पहाण्याची हमी नावाड्याने दिली. नेढ्यातुन चहु बाजुंचा परिसर नेजरेत भरत होता. समोर ढगात घुसलेला कळसुबाई, डाविकडे अलंग, मदन, कुलंगची रांग, पायथ्यापासुन खुणावणारा खुट्टा अगदिच समोर दिसतो. उजविकडे आजोबा, हरिश्चंद्रगड आणि माहुलीचा परिसर नजरेत भरत होता. गडाच्या दक्षीणेकडील दरवाजा बर्‍यापैकी सुस्थीत आहे. तीथे बराच वेळ Mobile Range चा लपंडाव खेळल्यावर गुहेकडे प्रयाण केले. वाटेत निळ्याशार कार्वीच आणि सोनकीच्या फ़ुलांच जंगल पसरलं होतं.
Photobucket

पुर्वेकडील बुरुजावरून समोरील दरीचे विहंगम दृष्य आणि कडा न्याहाळताना काहिंच्या मनातील कोकणकड्याच्या आठवणी ताजा झाल्या.
Photobucket

गुहेत परतुन सामानाची आवरा आवर करुन आम्ही शिडी मार्गे गड उतरू लागलो. संध्याकाळी चढाईच्या वेळी भयावह वाटणारे जंगल आता डोक्यावर सावली धरुन आम्हाला साथ देत होतं. परंतु रात्रीच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. प्रवरा नदीच्या प्रवाहासोबत गड उतरल्यावर नदिच्या डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. रतनवाडीत परतल्यावर बाजरीची भाकरी आणि पिठल्यांवर सगळ्यांचा आडवा हात पडला.

गडावरील रात्र, जेवण, वाटाड्याचे अनुभव, नावाड्याने दिलेली टांग, गाडी वाल्यांचे अवाजवि दर आणि एकुणच प्रवासाची दगदग यामुळे रतनगडचा ट्रेक अविस्मरणिय झाला.

No comments:

Post a Comment