Tuesday, July 3, 2012

घोडखिंड पदभ्रमण

देवशयनी आषाढी एकादशीच्या रात्री आम्ही निघालो होतो ते पन्हाळ्याला... निमित्त होते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतीथी दिनी घोडखिंडीत पोहचून त्या रत्नविराला मानवंदना देण्याचे.

महाराजांनी सिध्दी जौहरच्या वेढ्यातून निसट्याण्यासाठी ज्या वाटेचा अवलंब केला... त्याच वाटे वरून आम्ही पदभ्रमण करणार होतो. साधारण ४५ मैलाचा (६४ कि.मी.) प्रवास महाराजांनी २१ तासात पुर्ण केला. तोही विशालगडचा वेढा कापून... मात्र आम्ही हाच मार्ग तीन दिवसात आरामात पार करणार होतो.

गडावर उतरलो तेव्हा पहाट धुक्यात हरवली होती. ती कुंद-धुंद हवा ऊरात भरून घेताच रात्रीच्या प्रवासाचा क्षीण पार निघून गेला. सोबत आणलेला लवाजमा एका धर्मशाळेत ठेवून प्रदक्षिणेला निघालो. सोबतीला पावसाची संततधार होतीच. समोर पाच फुटांवरचे काहीच दिसेना म्हणून मागे फिरलो. दुपार नंतर धुक्याने कृपा केली आणि मग गडफेरीचा उत्साह दुणावला. राजवाडा, शिवमंदिर, सज्जा कोठी, राजदिंडी, अंबारखाना, चार दरवाजा, पुसाटी बुरूज, दुतोंडी बुरुज करत करत बाजीप्रभुंच्या पुतळ्या जवळ आलो.

 

रात्री परत धुक्याने आसमंत आच्छादून टाकला आणि आम्ही गुडूप झालो.

*******

पन्हाळागड ते विशालगड पदभ्रमण मोहिमेचा पहिला टप्पा २८ कि.मी.चा होता... पहाटे लवकर आटोपून राजदिंडी कडे निघालो. विशालगडाकडे जाणारी ही एकमेव वाट अतिशय दुर्गम आहे. दरी आणि झाडीतून सावधतेने गड उतरून आम्ही तासाभरात म्हसईच्या पठारावर आलो. इथल्या नजार्‍याची तुलना पाचगणीच्या टेबल पॉईन्टशी करता येईल. सोसाट्याच्या वार्‍या सोबत पावसाचा आडवा मारा अंगाचा थरकाप उडवित होता. पठारावर म्हसई देवीचे मंदिर आहे. देवीचा आशिर्वाद घेऊन दुपारचे पॅक्ड लंच फस्त केले.

पुढे म्हसई पठार उतरुन 'करपेवाडी'ची वाट जवळ केली. वाटेत गुढघाभर चिखल साचलेला होता. एखाद वेळेस चिखलात रुतून बसलेला शूज काढण्यासाठी कोपरा पर्यंतचा हात चिखलाने बरबटून घ्यावा लागे. चिखलाचा त्रास नको म्हणून शेताच्या बांधा वरुन जायचे म्हटले तर तिथले ठिसूळ दगड सरळ चिखलात लोटून देत. शेवटी सगळेच चिखलमय होऊन करपेवाडीत पोहचलो... तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. जवळच्या ओढ्या वर शुचिर्भुत होण्यासाठी गेलो. प्रत्येकाने आपला आवडता दगड शोधून दमलेल्या पायांना वाहत्या पाण्याचा मसाज देण्याचे काम सुरू केले. समोरच बसलेल्या एका दगडाने 'अरे बघितलस का तुझ्या पोटरीतून रक्त येतयं' असे सुचविले... बघितले तर जळवांचा उद्योग सुरू होता... लगेचच त्या जळू वर तंबाखूचे पाणी ओतले. समोरच्या दगडाकडे पाहिले तर... त्याच्या ही पायातून रक्त वहात होते.. विशालगडच्या या मार्गात जळवांचा त्रास सहन करावा लागतो... त्यासाठी खबरदारी म्हणून तंबाखूचे पाणी सोबत ठेवले होते.

रात्री जेवण आटोपून गुरांच्या शेजारी मॅट पसरल्या. बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती. शेणाच्या सुगंधात, बेडूक आणि रातकिड्यांच्या संगितात थकले भागले जीव चिडीचूप झाले.

*******

दुसरा दिवस उजाडला तोच मुळी शाळेला जाणार्‍या चिल्ल्यापिल्ल्यांच्या गोंगाटात. आज पावसाने रजा घेतली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात शेतातील पिकं डौलत होती. अशी प्रसन्न पहाट फक्त चित्रपटातूनच पाहिली होती. आम्ही ज्या 'भरारी' संस्थे सोबत आलो होतो तिने करपेवाडीतील शाळेसाठी वही वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता... तर काही ट्रेकर्स मंडळींनी आठवणीने सोबत आणलेल्या गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप केले. शाळेच्या प्रांगणात वडाच्या पारा समोर उभं राहून ऐकलेलं ते जन्-गण्-मन कायम लक्षात राहिलयं.

चहा-नाष्टा आटोपून परत कालचेच ओले कपडे अंगावर चढवले. दचकू नका... पावसाळी ट्रेक मधे आंघोळ नसते आणि करायचीच असेल तर पुर्ण कपड्यात... भर पावसात :P सुके कपडे सिलबंद करून निघालो ते पाटेवाडीच्या दिशेने. वाटेत एके ठिकाणी जंगल लागले... तिथे वाट चुकीचा खेळ खेळून झाला. पावसाची गैरहजेरी कायम असल्यामुळे उकाडा जाणवत होता. आमच्या पुण्याईने म्हणा हवं तर... पाटेवाडीत पाण्याने भरून वाहणार्‍या टाकी खाली जलाभिषेक करवून घेण्याच पुण्य पदरी पडलं.

पुढे एक नदी ओलांडून पांढरपाणी येथील शाळेत मुक्कामाला पोहोचलो. आजचा १८ कि.मी.चा टप्पा तसा कमी श्रमाचा होता. वेळे आधी मुक्कामी पोहचलो होतो... रात्रीच्या जेवणाला फुरसत होती... अशी सुवर्ण संधी ट्रेकर्स मंडळी थोडीच वाया जाऊ देतील. ग्रुप मधे उद्योनमुख कलाकार बरेच होते आणि सोबतीला ढोलकीची साथ होती... नमन, गवळण, भजन, लोकगीत, कोळीगीत, पोवाडा अशी महाराष्ट्राची लोकधारा पार हिमालया पर्यंत जाऊन पोहचली.

*******

पदभ्रमण मोहिमेचा आजचा तिसरा दिवस आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा... नरविर बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतीथी. आज सगळेच जण ती ऐतिहासीक खिंड बघण्यास उत्सूक होते. त्या वाटेवरुन चालताना एक वेगळीच अपूर्वाई जाणवत होती. कालच्या बाजीप्रभूंवर रचलेल्या पोवाड्याचे स्वर आपसूकच मनातल्या मनात फेर धरत होते. शरिरात एक विलक्षण उर्जा सळसळत होती. पायांची गती तेजीत होती. एका डोंगर माथ्याला डावी मारत घसरड्या पायवाटेने घोडखिंडीत उतरलो... फार तर शे-पन्नास जणांना उभं रहाता येईल अशी ती अरुंद खिंड... जशी काय दोन फुफ्फुसातील अन्ननलिका... तिथे तो लढला... तो झुंजला... तो पावला... अद्वितीय पराक्रमाने केली त्याने ती खिंड पावन... 'पावनखिंड'

कोल्हापूरातून आलेल्या एका ग्रुपने तिथे लाठी-काठी, तलवारबाजीची प्रत्यक्षिके दाखविली. आप्पांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत पावनखिंडीतील रणसंग्रामाचे कथन केले. ती ऐतिहासीक आठवण मनात साठवून आम्ही विशालगडा कडे निघालो. दोन दिवस दगड धोंड्यातून चालायची सवय झाली होती... त्यामुळे अचानक समोर आलेल्या डांबरी रस्त्यावरुन चालणे जड झाले होते. समोर विशाल छाती पसरून उभा असलेला विशालगड नजरेत भरत होता. गडावरील महादेवाच्या मंदिरात आरती करून पदभ्रमण मोहिमेची सांगता झाली.

२००२ मधे ट्रेकिंगला सुरवात केली ती याच पन्हाळागड ते विशाळगड पदभ्रमण मोहिमेने... १० वर्षे लोटली तरी ही मोहिम कायम लक्षात राहिली ती श्री. अप्पा परब यांनी मोहिमेत केलेल्या मार्गदर्शनामुळेच. यंदा खूप ईच्छा असूनही जाता आले नाही... म्हणून ही मानवंदना त्या परमविरांसाठी /\

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार । धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार । त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥ चौक ८ आयुष्य सरतं घडोघडीं । काळाजी उडी । आल्यावर मढी । पडती; कुडी खास एकदां पडणार । पळभर उशीर नाहिं खपणार । जर मरण खास तर प्राण्या ! कसा मरणार ? । जो मर्द मानव झाला । सोडी जीवाला । रणांगणिं; त्याला कीर्ति वरणार ॥ पुन्हां चढला बाजीला जोर । दिलाय त्यानं मार । केला थंडगार । यवन; तवा झाली होती दोन पार । भूमिला झाला मुडद्यांचा भार । अंगावर चालले होते तरी वार । जरि झाला शत्रुचा मोड । वाटेना तो गोड । काय अवघड । बाजीला झालं सांगतों तुम्हांला ॥ त्यानं पहिला मान फिरवून । किल्ला निरखून । नाहीं पर खूण दिसली हो त्याला ! ॥ तोफांचा जाळ दिसेना । म्हणून यातना । होत बघ नाना । वाटल त्याला झाला नाश कार्याचा । ज्यासाठीं देह खर्चिला । तोंच नाहीं झाला । पार मनीं लागला । घोर----शिवाचा ! ॥ ऐका हा नाद----झाला । कसला हो बोला । गोळीबार झाला ! । हाय गोळा आला । लागला वीराला । धाडकन पडला भूवर । बाजी रणवीर । जसा काय थोर वृक्ष उन्मळला ॥ चाल

------------------------------------------------------------------------------------

तटी : पहिलाच ट्रेक असल्यामुळे सोबत कॅमेरा नव्हता. नकाशा आणि बाजींचे प्रचि नेट वरुन साभार...