Tuesday, December 31, 2013

तुंग-तिकोना

काही जणांना ट्रेक म्हणजे ठार वेडे पणा वाटतो... तर काहींना भर उन्हात रग जिरवण्याचा माज.. पण ट्रेक म्हणजे केवळ रग जिरवणे नव्हे..

खर तर ट्रेक म्हणजे, पहाटेचा वारा, 
ट्रेक म्हणजे, पावसाचा मारा.. 
  
ट्रेक म्हणजे, वाटे वरिल उन्हाळा,
ट्रेक म्हणजे, धनगराचा जिव्हाळा..

ट्रेक म्हणजे, चुली वरला चहा,
ट्रेक म्हणजे, गडावरील गुहा..

ट्रेक म्हणजे, जंगलातील निवारा,
ट्रेक म्हणजे, रानपाखरांचा सहारा..

ट्रेक म्हणजे, निसर्गाचा पसारा,
ट्रेक म्हणजे, चांदण्यांचा पहारा..

ट्रेक म्हणजे, देवळाचा गाभारा,
ट्रेक म्हणजे, बुरुजांचा डोलारा..

ट्रेक म्हणजे, शिवरायांचे गान...
ट्रेक म्हणजे, सह्याद्रीचा अभिमान!!!


लोहगड - विसापुर


तिकोना



तुंग

 

Tuesday, November 12, 2013

कोपेश्वर - खिद्रापुर


१२व्या शतकातील शिलाहार राजवटित बांधलेले शिवालय म्हणजे खिद्रापुरच कोपेश्वर मंदिर

सांगली वरुन नृसिंहवाडी मार्गे खिद्रापुरला जाता येते... वाडी पासुनचे अंतर साधारण १८ कि.मी. आहे. तसेच कोल्हापुर वरुन इचलकरंजी मार्गे खिद्रापुर गाठता येते.

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


**

Thursday, October 24, 2013

इकडे आड तिकडे डुबेर... पट्टा आणि बित्तंगा

जुलैच्या सह्यमेळाव्या नंतर गेल्या तीन महिन्यात जंगी ट्रेक असा झालाच नव्हता. त्यातच यंदाचा पावसाळाही अमंळ रेंगाळला होता. त्यात भरीस भर म्हणुन कोजागिरी पौर्णिमेला विकेंडचा मुहुर्त सापडला होता. असे सारे योगायोग जुळून आल्यावर अखिल भारतीय ट्रेकर्स मंडळी खुषीत नसतील तरच नवल...

तिकडे इतर दुनिया घटस्थापना आणि रासक्रिडेत व्यस्त असताना.. ट्रेकर्स मंडळी कोपौच्या ट्रेकची आखणी करण्यात मग्न झाली होती. सातमाळा रेंज पासून पार मंडणगड पर्यंतची चाचपणी सुरु होती. सगळी चाचपणी पार पडल्यावर नेहमीच्या शिरस्त्या नुसार ठरलेला ट्रेक रद्द करण्या पर्यंतची फोनाफोनी झाली. आणि त्याच शिरस्त्याला धाब्यावर बसवून नविन मेंबरसह बाबाच्या धाब्यावरची नियमीत हजेरी देखिल पार पडली.

या सगळ्या सावळ्या गोंधळाला सरावलेले माबोचे जुणेजाणते भटके लोक्स म्हणजेच गिरिविहार, रोमा, योरॉक्स यांच्या सोबत शुक्रवारी घोटीच्या दिशेने सुसाट निघालो. या वेळी आमच्या टोळीत एक नविन मेंबर अबतक ९७ वर नाबाद असलेला अनिरुद्ध होता. कळसुबाई रेंजमधिल डुबेर, आड, पट्टा झालच तर औंढा, बितनगड असा क्रॉसकंट्री ट्रेकचा मनसुबा होता. या आडवाटेच्या भटकंतीची आखणी सह्याद्रीमित्र म्हणजेच ओंकारने फोन करुन दिली.

ठाण्यावरुन मध्यरात्री खचाखच भरलेली आमची गाडी बाबाचा थांबा घेत पहाटे चारच्या सुमारास डुबेरवाडीतील महादेवाच्या मंदिरा पाशी पोहचली. मावळतीकडे झुकलेल्या अश्विनी पौर्णिमेच्या चंद्राला निरोप देऊन आम्ही डुबेरच्या किल्ल्याकडे कूच केली.

प्रचि १


चराचरात चैतन्य जागवणार्‍या दिनकराला अभिवादन करण्यासाठी पशुपक्षी आपली फौज घेऊन सज्ज झाली होती. पर्वतीही मोठी भासावी इतका पिटुकला चढ चढुन डुबेरवर पोहचलो तेव्हा आकाशवाणीवर सुर्व्यांचं मंगल प्रभात सुरु झालं होतं.

प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


पुर्वेच्या रंगात उजळुन निघालेली सप्तशृंगी देवीची प्रसन्न मुर्ती.

प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


चारही बाजुच्या पठारी प्रदेशावर लक्ष ठेवणारा डुबेरचा किल्ला अगदीच आटोपशीर आहे. वर जाण्यासाठी महादेव मंदिराच्या उजवीकडुन पायर्‍यांची वाट आहे. किल्ल्यावर पाण्याच तळं आहे.

प्रचि ८


तासाभरात गडफेरी उरकुन खाली आलो. डुबेर गावात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा वाडा आहे. त्याला नक्की भेट द्या असे ओंकारने आवर्जुन सांगितले होते.

प्रचि ९


डुबेर फाट्यावर सकाळचा नाष्टा करुन आम्ही ठाणगावच्या दिशेने निघालो. डुबेर ते ठाणगांव या १६ कि.मी. च्या रस्त्यावर महामंडळ्याच्या बर्‍याच फेर्‍या आहेत. आड किल्ल्यावर जाण्यासाठी आधी ठाणगावात पोहचावे लागते. तेथुन डावीकडचा रस्ता पट्टावाडीकडे तर उजवीकडचा सरळ रस्ता आड किल्ल्याकडे घेऊन जातो.

प्रचि १०


प्रचि ११


आडच्या रस्त्यावर सुझलॉन कं.च्या पवनचक्क्यांची रांगच रांग दिसते. इतक्या होलसेल मधे पवनचक्क्या असुनही हवेतील उष्मा जिव काढतो. ठाणगांवातुन ६ कि.मी. चा घाट रस्ता चढुन वर आल्यावर आडचा किल्ला दिसतो.

प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


किल्ला आकाराने मोठा असला तरी चढाईला अगदीच सोप्पा आहे. किल्लावर हिरवं गवत आणि पाण्याच टाकं असल्या मुळे गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसला. ठिकठिकाणी पाचर मारुन पावसाच पाणी मुरवण्याच तंत्र इथे अवलंबलेलं दिसलं.

प्रचि १४


किल्ल्यावर घारांची जोती आणि तुरळक अवशेष वगळाता विशेष काहीच नाही. किल्ल्या वरुन वायव्येला डुबेर अगदी हाकेच्या अंतरावर दिसतो. तर मागे पश्चिमेला आभाळात घुसणारी औंढ्याची लिंगी दिसते.
खाली दरित पवनचक्क्यांच साम्राज्य पसरलेलं दिसतं.

प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८ अबतक ९७


प्रचि १९ उडी


प्रचि २०


खाली उतरताना उन्हाने अंग भाजुन निघत होतं. पायथ्याला आल्यावर मंडळी विहिरीवर जाउन ताजीतवानी झाली. एव्हाना साडे अकरा वाजत आले होते... आता पुढचं लक्ष होतं पट्टा!!!

ठाणागावला परत आलो तेव्हा खरतर जेवायची वेळ झाली होती... पण उन्हामुळे जेवणाचा उत्साह मावळलेला होता. तरी पण खळगी भरण्यासाठी टपरी वरिल बेसनचा पॅटिसपाव मागवण्यात आला. त्या दिव्य पॅटिसपाव मधे ना बटाटा ना भाजी फक्त बेसनच आवरण बघुन गिरिचा पारा वर चढला.

ठाणगांवातून पट्टावाडी साधारण १६ कि.मी. वर आहे. शक्य तितक्या लवकर पट्ट्याला पोहचून आराम करावा असे सगळ्यांच्या मनात होते. तसं आम्ही दिड वाजताच पट्ट्याचा पायथा गाठला. मात्र वर चढण्याचा ऐवजी पायथ्यालाच झाडा खाली पथारी पसरल्या... उन्हा मुळे आणि रात्रीच्या जागरणामुळे एकंदरीत सगळे कावले होते.

प्रचि २१


तासाभराच्या आरामात दुपारच ऊन, बाईक, काकू, माकड असे बरेच व्यत्यय आले. तरिही थोड्याश्या विश्रांतीने तरतरीत झाल्यावर खांद्यावर सॅग चढवल्या गेल्या. पण अचानक गिरिच्या सुपिक डोक्यातुन एक कल्पना आली... सॅग घेऊन गुहेत गेलो तर माकडांपासून तीचे संरक्षण करण्यासाठी कोणाला तरी तिथेच थांबावे लागले असते. त्या पेक्षा सॅग गाडीतच ठेवून गड फेरी करुन येऊ आणि रात्रीचा मुक्काम बित्तनगडच्या पायथ्याशी करू.

फडत्या फळाची आज्ञा मानून सगळ्यांनी आपला खांदाभार गाडीत हलका केला. हलक्या खांद्यांनी गड चढ चढण्याची मजा काही वेगळीच असते.

प्रचि २२


पाच एक मिनिटांत विश्रामगडाच्या सुप्रसिद्ध बाबाच्या गुहे समोर पोहचलो. तिथे माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. त्यांना दुरुनच रामराम करुन आम्ही पुढे निघालो.

प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


पुर्वीच्या काळी वापरात असलेला दरवाजा.

प्रचि २७


प्रचि २८


दरवाजा शेजारील बुरुजावरुन पट्टावाडीचा सुंदर नजारा दिसतो. अश्या सुंदर ठिकाणी योरॉक्सला उड्या मारण्याच स्फुरण न मिळाले तरच नवल!

प्रचि २९


दरवाज्या डावीकडून पुढे निघाल्यावर वाटेत सिमेंटचे होऊ घातलेले नविन मंदिर दिसते. त्या मंदिरा मागुन वर गेल्यावर अंबरखाना दिसतो.

प्रचि ३०


अंबरखान्या समोर महाराजांचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला आहे.

प्रचि ३१


अचानक आभाळात ढगांनी गर्दी केली. पुढं जावे की मागे परताव या विंचनेत असताना डोक्यावरुन ते सरसर निघुनही गेले.

प्रचि ३२


अंबरखान्याच्या मागील बाजुने वर चढत गेल्यावर गडाच्या पश्चिमेला असलेल्या कड्याचे विलोभनीय दृष्य दिसते.

प्रचि ३३


पश्चिम क्षितीजाचा आसमंत पावसाळी ढगांनी अगदी व्यापुन टाकला होता. आणि त्यामुळेच आम्हाला निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहण्याच भाग्य लाभलं . पट्ट्याच्या डाविकडे कळसुबाई आणि AMK वर ढगांतून पडलेल्या प्रकाशझोताचे चित्ताकर्षक पोट्रेट पाहताना भान हरपले होते.

प्रचि ३४ याची साठी केला होता अट्टाहास...


प्रचि ३५


प्रचि ३६


किती तरी वेळ तो सुंदर नजारा बघत होतो तरी मन तृप्त होत नव्हते. अंधार पडायच्या आधी गडफेरी पुर्ण करायची होती, म्हणुन मग गडाच्या उत्तरेला औढाच्या दिशेने निघालो. आमच्या प्लॅन मधे नं.२ वर असलेला किल्ला औंढ कातळ प्रस्तारोहण असल्या कारणाने करता येणार नव्हता. त्यासाठीचा लागणारा रोप सुन्या घेऊन येणार होता, पण ऐनवेळी तो टांगारु झाल्यामुळे मिळू शकला नाही. पट्ट्याच्या पठारावर जागोजागी पाण्याची टाकं आहेत. त्यातील काही गळकी असल्याने कोरडी झाली होती.

प्रचि ३७ औंढा


पायथ्याल्या आल्यावर बित्तनगडच्या रस्त्याची चौकशी केली... बित्तंगासाठी गाडी रस्ता आहे. थेट बित्तनवाडी पर्यंत... टाकेदला जाणारा घाट न उतरता सरळ एकदरे गावाच्या आधी बित्तंगाचा फाटा लागतो. फाट्या पासुन ६ कि.मी. वर बित्तनवाडी आहे. बित्तंगाची वाट बर्‍या पैकी जंगलातून जाणारी आहे. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं.. बर्‍याच वेळाने मागुन एक बाईकवाला आला. त्याच्याकडे बित्तंगा विषयी चौकशी केली असता त्यांनेच आमची उलट तपासणी सुरु केली. पण त्याचा फायदाही झाला. ते बित्तंगाचे पोलीस पाटिल निघाले. मग त्यांनीच संध्याकाळी आमच्या रहाण्याची सोय केली.

वाडीत पोहचे पर्यंत मिट्ट अंधार झाला होता. पोलीस पाटलांच्या अंगणात चटई टाकून चंद्रोदयाचा नजार पाहण्यात सगळे दंग झालो. पाटलांनी चहा पाणी दिल्यावर जेवणासाठी गळ घातली. पण आम्ही त्यांना चक्क नकार दिला. त्यांनीच मग अंगणात आम्हाला जेवणासाठी चुल पेटवुन दिली. सुप, पापड, सांबार राईस, राजमा असा रेडी टू ईटचा प्रकार पाहुन पाटिलांना 'आ' वासला. मस्त ढेकर देत सगळे शाळेच्या पडवीत निद्रिस्त झालो.

सकाळचा चहा आणि मॅगीचा नाष्टा करुन बित्तनगडच्या वाटेला लागलो. बित्तनगड हा बित्तंगवाडीच्या मागच्या बाजुला असल्याने गावातुन दिसत नाही. वाडीला वळसा मारुन पुढे गेल्यावर बित्तनगडचा खडा चढ दिसू लागतो.

प्रचि ३८


रविवार असल्याने आमच्या सोबत गावातील उनाड पोरांच टोकळंही गडवारीला निघालं. त्यांचा रिंगण फिरवण्याच्या खेळात काही काळ आम्हिही स्वतःला हरवुन बसलो. गडाच्या पायथ्या पर्यंत बैलगाडीची वाट आहे. गडाच्या उजविकडचा खडा चढ चढुन वर गेल्यावर कड्यात खोदलेलं पाण्याच चौकोनी टाकं सोबत आलेल्या पाटलांच्या सुनिलनं दाखवलं. साधारण शरिरयष्टीचा माणूस त्या चौकटीतून सरपटत आज जाऊ शकेल इतक ते अरुंद होतं.

प्रचि ३८


थोड वर गेल्या वर कातळात पिण्याच्या पाण्याच छोटस टाकं दिसलं. गड माथ्यावर भगवा डौलात फडकत होता. माथ्यावरुन पश्चिमेला परसलेली कळसुबाईची डोंगर रांग स्पष्ट दिसते. टाकेद वरुन वर येणार्‍या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्लाच्या उपयोग होत असावा. आजमितीस गडावर तटबंदी वा इतर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत.

प्रचि ३९


उतरताना सुनीलने घसरगुंडीची बिकट वाट पकडली आणि आमची चांगलीच त्रेंधातिरिपिट उडाली. घसरडी माती आणि गवतावरुन बिचकत उतरताना सगळ्यांचीच फजिती होत होती. सोबत आलेल्या लहानग्यांनी तर कमालच केली. वाटेत वेलीवर उगवलेली मेका नावाची काकडी सारखी चवीला असलेली फळे खाण्याचा सपाटाच लावला. दोन चार फळं आम्ही सुद्धा चाखुन पाहिली.

सुर्व्या डोक्यावर यायच्या आत आम्ही गड उतरुन वाडीत आलो. सुनीलने दाखवलेल्या वाटेतील एका डब्याकावर शुचिर्भुत होऊन टाकेदला निघालो.

सीतेचे अपहरण करणार्‍या रावणाला जटायुने रोखण्याचा प्रयन्त केला आणि ज्या ठिकणी तो धारातिर्थी पडला ते ठिकाण म्हणजे टाकेद. येथील जटायु मंदिरात श्रीरामाने जटायुला बिलगलेली करुण शिल्पकृती पहावयास मिळाली. मंदिराच्या परिसरात श्रीराम आणि दत्त महाराजांचे देऊळ आहे.

प्रचि ४०


दर्शन घेऊन निघालो तेव्हा जठराग्नी पेटला होता. मग काय गाडीने भरधाव निघालो घोटीच्या दिशेने. इगतपुरी नंतर वाटेत मयुर हॉटेलात सामिष भोजनावर यथेच्छ ताव मारण्यात आला.

कोजागिरी ट्रेकच्या अविस्मरणिय आठवणींची उजळणी करता करता ठाण्यात शिरलो तेव्हा रिक्षांच्या कर्कश: आवाजाने सगळ्यांची तंद्री भंग पावली.

समाप्त.