Friday, July 29, 2022

Zozila

गेल्या वर्षी ३० जुलैला कारगिल ते श्रीनगर या परतीच्या प्रवासातला हा अनुभव...


गुरुवारी लेह वरून निघून रात्री कारगिल मुक्कामी पोहचलो होतो. वाटेत काही ठिकाणी पावसामुळे डोंगर खचण्याचे प्रकार दिसले होते. रात्री जेवणं झाल्यावर हॉटेलचा मॅनेजर सांगू लागला की, "कल सुबह जल्दी निकलने से अच्छा है की, आराम से दोपहर का खाना खाके निकलना.." कारण शुक्रवारी सकाळी नऊ नंतर कारगिल - श्रीनगर रस्त्यावरचा 'झोझीला पास' देखभाली करता बंद असतो. खरंतर आम्हाला 'कारगिल वॉर मेमोरियल' बघून सकाळी नऊच्या आधी झोझीला पार करुन सोनमर्ग गाठायच होतं.. पण वॉर मेमोरियल बघून झोझीला चेकपोस्टवर पोहचायला फक्त पाचच मिनिटं उशीर झाला.. नी आम्ही अडकलो.. "शाम को चार बजे के बाद पास खुलेगा" असं चेक पोस्ट वरच्या सैनिकाने सुनवलं..


गाडीच्या बाहेर जास्त वेळ भटकणे शक्य नव्हतं.. कारण थाजीवस ग्लेशियर वरुन येणारे बोचरे वारे आणि त्यात पावसाची रिपरिप.. नशिबाला दोष देत तिथेच सात तास गाडीत बसून वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.. अश्या जागी अडकलो होतो जिथे खाण्यापिण्यासाठी केवळ एकच टपरी आणि त्यातही फक्त मॅगी मिळत होती. दुपारी एक वाजेपर्यंत आमच्या मागे एक किलोमीटर पर्यंत गाड्यांची रांग लागलेली दिसत होती. शहरातून आलेले बाईक रायडर इथेही आपल्या बेशिस्तीच प्रदर्शन करत होते. त्यांच्यामुळे सामान वाहून नेणाऱ्या आर्मीच्या गाड्यांची पंचाईत होत होती. साधारण दिडच्या सुमारास ड्राइवर लोकांची चुळबुळ सुरु झाली आणि बघता बघता CO2 छाप मागे सोडत सगळे झोझीलाच्या रस्त्याला लागले.


घाटात पोहचे पर्यंत पावसाचा जोर वाढला होता. रस्त्याच्या डाव्या बाजूची 'बाताल'ची दरी धुक्यात विरून गेली होती आणि उजव्या बाजूला अंगावर कोसळण्याच्या पवित्र्यात उभे असलेले डोंगरांचे ठिसूळ कडे बघून मनात धडकी भरत होती. गाडी समोरील पाच फुटा पुढचं काहीच दिसत नव्हतं. केवळ पुढच्या गाडीच्या टेल लाईटच्या भरवश्यावर आमचा सारथी गाडी हाकत होता. बराच वेळ झाला पण समोरुन एकही गाडी येताना दिसत नव्हती. एव्हाना आम्ही हनुमान चालीसा सुरु केली होती.. आणि अचानक पुढच्या गाड्या मागे फिरू लागल्या.. आमच्या ड्राइवरने ही त्वरित U turn घेतला. ज्याची भीती होती तीच खरी ठरली.. त्या अरुंद घाटात मध्यावर असताना पावसामुळे भूस्खलन सुरु झालं होतं. उजवीकडच्या डोंगरातून सुटलेले छोटेमोठे दगड वायू वेगाने आमच्या डोक्यावरुन डावीकडल्या दरीत झेपावत होते. तिथे थांबणे म्हणजे जीवाशी खेळ होता. लगेच मागे फिरलो, पण समोर शंभर एक फुटांवरुन खाली सरकत येणारा दगडमातीचा थर दिसला आणि ब्रह्मांडच आठवलं.. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.. ड्राइवरने त्यातल्या त्यात एका सुरक्षीत वळणावर दरीच्या बाजूला गाडी उभी केली आणि आम्ही खाली उतरलो. घाबरलेले पर्यटक एकमेकाला धीर देत देवाचा धावा करत होते. 


या वाईट परिस्थिती शेवटी धावून आली ती ड्राइवर मंडळीच. तिथे अडकलेल्या त्या शेकडो गाड्यांमधले सगळे ड्राइवर एकत्र आले आणि रस्त्यावर आलेला राडारोडा हटवायला लागले.. पर्यटकांपैकी काही जण मदतीला गेले.. पण त्यांनी "ये आपका काम नही.. यहा का मौसम खराब है" असं दरडावत गाडीत बसायला लावलं. कोणत्याही परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षीततेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या मानसिकतेला खरंच सलाम!


थोड्याच वेळात धोपटून सरळ केलेल्या त्या रस्त्यावरुन दोन रिकाम्या सुमो गाड्या वाट काढत पुढे जाऊ लागल्या, पण भुसभुशीत मातीत त्यांची चाकं गरागरा फिरुन त्या तिथेच अडकत होत्या. त्यातच पाऊस वाढल्याने परत एकदा वरुन आणखी राडारोडा रस्त्यावर आला. नशीबाची परिक्षा बघणारा काळच जणू.. कठीण परिस्थितीशी दोन हात करत राहणं हा मानवी स्वभाव इथे ही दिसून आला. जवळच्याच एका गाडीतून दोरखंड आणले गेले आणि परत एकदा सगळ्यांनी जोर लावून अडकलेल्या त्या दोन सुमो गाड्यांची सुटका केली. चिखलात उमटलेल्या सुमोच्या पाउलांवर पाऊल ठेवत बाकीच्या गाड्या दरीच्या बाजूने हिंदकाळत हळू हळू पुढे सरकू लागल्या. तो टप्पा गाडीत बसून पार करायचा आमचा काही धीर झाला नाही. आम्ही चालत उड्या टाकत त्या घसाऱ्या वरुन पुढे आलो. तेव्हढ्यात डोक्यावरुन एक दगड दरीत कोसळताना बघितला आणि जिवाचं पाणीपाणी झालं. या सगळ्या धावपळीत पुढे गेलेल्या मित्राचा मोबाईल आणि पाकीट खिशातून पडलेलं सापडलं, ते उचलून तसेच पळत सुटलो.. पुढे दोन तीन ठिकाणी आणखी काही दरडी कोसळल्या होत्या. मागचा अनुभव लक्षात घेता ते ही टप्पे देवाचा धावा करत चालतच पार केले.



घाटाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो आणि जीवात जीव आला. खाली 'बताल'ला 'अमरनाथ'चा बेस कॅम्प दिसू लागला आणि हायसे वाटले. सुटलो बुवा म्हणतोय तोवर पुढे दोनतीन किलोमीटर लांबवर गाड्यांची रांग दिसू लागली. इतक्या सगळ्या दिव्यातून बाहेर पडतोय तर पुढे अजून एक नविन समस्या उभी ठाकलेली.. 


एकीकडे थाजीवास ग्लेशियरला समांतर जाणारी मावळतीची सुर्य किरणे तर खाली झोझीलाच्या पायथ्याला असलेल्या स्थानिक गावकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन.. Army सोबत झालेल्या वादामुळे NH -1वर अख्खं गाव गोळा झालेलं. आधी आर्मीच्या जवानाने माफी मागावी तरच आम्ही राष्ट्रीय महामार्ग मोकळा करु अशी अट घातलेली. पर्यटकांमधे लहान मुलं, महिला आणि वयस्कर लोकंही होती. पर्यटकांचे जे दिवसभर हाल झालेले त्याच्याशी आंदोलन कर्त्यांना काहीच घेणंदेणं नव्हतं. त्यांनी मात्र अपमानाच्या बदल्यात थकलेल्या पर्यटकांना वेठीस धरलं होतं.    



चेकपोस्ट वरिल पाच तास प्रतीक्षा, पुढे घाटातला दोन तासांचा चित्तथरारक अनुभव आणि आता हे दोन तासांपासून सुरु असलेलं आंदोलन संपायची वाट बघणं.. इतके विचित्र आणि विक्षिप्त अनुभव आजपर्यंत कोणत्याच प्रवासात आले नव्हते. सकाळी सातला हॉटेल वरुन निघालेलो आम्ही संध्याकाळचे सात वाजत आले तरी अर्धा रस्त्यात पण पोहचलो नव्हतो. परिस्थिती पुढे सगळे हतबल झालो होतो. शेवटी Armyच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी येऊन तो तंटा मिटवला आणि आम्ही श्रीनगर कडे मार्गस्थ झालो. 


घाटात कसोटीच्या क्षणी पर्यटकांची काळजी घेणारी ड्राइवर मंडळी आणि आंदोलन करुन पर्यटकांना वेठीस धरणारे स्थानिक गावाकरी.. सगळे एकाच प्रदेशातली, एकच भाषा बोलणारी.. मात्र व्यवसायातील फरकामुळे दोघांच्या मानसिकतेतील तफावत प्रकर्षाने दिसून आली.