Tuesday, July 14, 2015

सह्यमेळावा


सह्याद्रीच वेड ज्याला लागलं तो शहरातल्या घोडदौडीत पुरता घुसमटून जातो. एक-दोन महिन्याच्या वर ट्रेक विरह सहन करणं त्याला अवघड होऊन जातं. आणि मग ही मंडळी निघतात ती सह्याद्रीतील घाटमाथ्यांवर... ही भटकी जमात केवळ भटकंती करुन थांबत नाही, तर वेळोवेळी वेगवेगळ्या 'बॉल्ग्स' वरुन व्यक्त ही होत असते. स्वराज्याचे हे मावळे फक्त घाट किंवा कोकणच नव्हे तर महाराष्ट्र भर पसरलेले आहेत. अश्या या सह्यवेड्या बॉल्गर्सची एकत्र मोट बांधण्यासाठी नाशिक मधे 'सह्यमेळावा'चे आयोजन करण्यात आले होते.
यंदाचे हे सह्यमेळाव्याचे तिसरे वर्ष होते. नाशिक, पुणे, मुंबई वरुन तब्बल ३० जण सटाणा तालुक्यातील चौल्हेर आणि पिंपळागडाला भेट देण्यासाठी एकत्र जमले होते. या एकत्र येण्या मागचे प्रयोजन असे की, वर्षभर इतरत्र ट्रेक करणारे सगळे ट्रेकर्स एकत्र येऊन, ट्रेक मधिल आपला व्यैयक्तिक अनुभव सगळ्यांशी share करतील. Rock climbing, rescue operation, archaeology, घाट वाटा, प्राणी आणि पक्षी तज्ञ, दुर्गसंवर्धन अश्या विविध क्षेत्रांतील मंडळी आपले अनुभव वाटण्यास उस्तुक होती.
यंदाच्या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सह्यवेड्यांना साथ लाभली ती ४ ते ९ या वयोगटातील खेळकर आणि खोडकर भावी पिढीची!!! गडावरिल अनवट वाटा असो वा गडाच्या उतारा वरिल घसारा असो... ही वानर टोळी सगऴ्यांवर मात करत उड्या मारत मनसोक्त मजा लुटत होती. दुनियादारी पासून अनभिज्ञ असलेल्या या भावी ट्रेकर्स सोबतचा ट्रेक अनुभव बरच काही शिकवणारा होता. त्यांच्या निरागस प्रश्णांची उत्तर देताना मात्र आमची दमछाक होत होती.
शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी असे बरेच कट्टे अनुभवलेले असले.. तरी हा थोरामोठ्यांचा आगळा वेगळा सह्यमेळावा लाख मोलाचा अनुभव देणारा होता.
चौल्हेर
हेमाडपंथी मंदिर
पिंपळा कडे कूच
रानमेवा - कोशिंब
पिंपळा वरिल सुप्रसिद्ध नेढे...
डोलबारी रांगेतील साल्हेर-सालोटा

इती सह्यमेळावा सफळ संपुर्णम...