Monday, December 13, 2010

सिद्धगड

मायबोलीवर GS1 याने लिहिलेला सिद्धगडचा वृत्तांत...

ट्रेकिंगमधल्या कसलेल्या सिद्धांचा गड तो सिद्धगड असे वर्णन वाचले होते सिद्धगडाचे, त्यामुळे तिकडे जाण्याचे बरेच दिवस मनात होते. पण दोन दिवसांचा हा ट्रेक एका दिवसात वा रात्र-दिवसात कसा बसवावा असा प्रश्न होताच.

शनिवारी १ जुलैला आम्हाला नारिवली या गावी जायचे होते. तिथे कर्जतहून जाणे हे पुणेकरांना जवळचे आहे पण तशा सोयीस्कर बस नाहीत संध्याकाळी पाचनंतर.

तुफान पाउस पडत होता. घाटात तर खिडकीबाहेर ढगांशिवाय काहीच दिसत नव्हते. गप्पा गप्पात कल्याण आले. खचाखच भरलेल्या एस्टीत आम्ही आठ जण शिरलो, नऊला मुरबाडला पोहोचलो. आमची नारिवलीला जाणारी शेवटची एस्टी अगदी पाच मिनिटांनी चुकली. पण मोठा गट असल्याचा फायदा असा झाला की लगेच एक खाजगी जीप घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत म्हसा लागले आणि गोरखगडाच्या वेळेला मध्यरात्री म्हसापर्यंत केलेली पौर्णिमेची पायपीट आठवली.

नारिवली गावात पोहोचलो. गावच्या देवळात सत्संग चालू होता. देउळ अगदी प्रशस्त होते. सत्संग आटोपल्यावर गावच्या मुलांनी अगत्याने चौकशी केली, कळशी भरून पाणी आणून दिले. झोपायला देवळातलीच मोठी चटई वापरायची परवानगी दिली, लागल्यास समोरच्या घरातून पाणी घेता येईल असे सांगितले आणि आमची व्य्वस्था झाली आहे हे बघुनच मग ते घरी गेले. देवळात एक स्वामीजी पण होते मुक्कामाला.

रात्रीचे फारसे जेवायला आणले नव्हते. पुऱ्या, भेळेचा फराळ पार पाडला आणि सकाळी लवकर उठायचे एकमेकांना बजावत झोपी गेलो. थोडा अंधार आणि शांतता होते तोच आरतीच्या किंकाळीने सर्व जण एकदम उठून बसले. तिच्या अंगावर सापसदृश काहीतरी येऊन पडले होते. पण चौकशीअंती तो लेदरचा पट्टा निघाला. पाच वाजता उठलो, सर्व आवरून निघेपर्यंत साडेसहा होउन गेले. पाउस अजिबात नव्हता. ओढे, नदी ओलांडत तासाभरात एका मोकळ्या पठारावर आलो आणि डावीकडे मच्छिंद्रगड, गोरखगड, दमदम्या, साखरमाचीचा डोंगर आणि त्यालाच समोर काटकोनात आडवा पसरलेला सिद्धगडाचा पहाड दिसत होता. गडाचा माथा मात्र धुक्यात पूर्ण वेढला गेला होता त्यामुळे आम्हाला गड ओळखता येत नव्हता.
siddhagad



dhukyAt daDalelA siddhagaD

लहानमोठे कितीतरी धबधबे या दोन्ही कड्यांवरून उड्या घेत होते आणि ओढ्यांच्या रुपाने आम्हाला आडवे येत होते.
Mihir

mhorakya - GS

Photobucket

वाट शोधत तसेच थोडे चालत राहिलो आणि आता चुकलो अशी खात्री झाली तेवढ्यात शेतात काम करणारा भरत नावाचा मुलगा भेटला. जवळच त्याचे गाव होते सिद्धगडपाडा. त्याला वाट विचारली तर त्याने वाटाड्या म्हणून मला घेउन चला असा बराच आग्रह केला, तो मोडवेना म्हणून त्याला बरोबर घेउन निघालो. काहीशा नाखुषीनेच घेतलेला हा निर्णय किती योग्य होता ते नंतर पावलापावलाला जंगलात, दरीत अदृश्य होणाऱ्या विविध वाटा बघून कळलेच. आता लगेच पुन्हा गेलो तरी वाटाड्या लागेल एवढा विस्तृत आणि घनदाट असा हा जंगली भूलभुलैय्या आहे. अजून थोड्या वाटचालीनंतर एका टेकाडावरच्या एकुलत्या झोपडीत चक्क चहा मिळायची सोय झाली त्यामुळे सकाळपासून चहाची भुणभूण करणारे चहाबाज बेहद्द खुष झाले.
pAUs

siddhagad

ओढ्यांच्या खळ्खळाटाच्या सान्निध्यात सिद्धगडाचा कडा उजवीकडे ठेवत पुढचा प्रवास सुरू झाला. चांगलाच लांबचा व खडा चढ असलेला पल्ला असला तरी दर दहा मिनिटाला एखाद्या धबधब्यात ताजेतवाने व्हायला मिळत असल्याने मजेत चालत राहिलो आणि अखेर निघाल्यापासून चार तासांच्या मेहेनतीनंतर सकाळपासून दिसणाऱ्या या आडव्या पहाडावर एका दरवाजातून दाखल झालो.
dhabadhabA

कोकणातील किल्ला असला तरी सिद्धगड मुख्य रांगेला अगदी खेटून आहे आणि चार हजार फुटांहून अधिक उंच आहे.त्यामुळे एकंदर दमछाक होतेच. इकडुनच भीमाशंकरला वा मिलींद गुणाजीने नावाजलेल्या घाटवरच्या नितांतसुंदर आहुपे गावाला अवघड घाट चढुन जाता येते.

एवढ्या उंचावरच्या पठारावर दहा पंधरा उंबऱ्यांचे सिद्धगड गाव वसले आहे, जंगल तर आहेच पण भरपूर शेतीही आहे आणि मुबलक पाणी असल्याचा फायदा घेत गाव समृद्ध झाले आहे. थोडे चालून डाव्या बाजूला बघतो तर अजून हजार फूट उंच असा एक कडा उभा ठाकला होता. त्याच्या साधारण मधोमध एक गुहा दिसत होती. सर्वांना फारच भूक लागली होती, पण तरी तिथे पोहोचूनच न्याहारी करावी असे एकमताने ठरले.

उभ्या चढणीच्या वाटेने गुहेत पोहोचलो. अक्षरशः स्वर्गात पोहोचल्यासारखे वाटत होते. खाली नजर जाईल तिथे धुके, ढग, हिरवागार आसमंत, त्यात लपलेली साखरमाची आणि सिद्धगड ही दोन पिटुकली गावे, एवढ्या उंचीवरून अगदी खुजे वाटणारे गोरख-मच्छिंद्रचे सुळके आणि इतर शिखरे. डोळे भरून कितीही वेळ पाहिले तरी हलावेसे वाटणार नाही असा हा देखावा पाहण्यासाठी केलेली पायपीट ही अगदी किरकोळ वाटावी एवढे समाधान मिळाले.
gUhA

मुख्य गुहेचे दार बंद करून तिथे रहाणारे साधूबाबा खालच्या गावात गेले होते. आम्ही अरुंद ओसरीत दाटीवाटीने बसलो. प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला. तशातच बरोबर आणलेल्या घन इंधनाच्या स्टोव्हवर गरमागरम कांदेपोहे केले आणि भुकेले जीव त्यावर तुटुन पडले.

पाउस थांबण्याची वा कमी होण्याची लक्षणे दिसेनात, मग तसेच भिजत मी, कूल आणि मिहिर अजून वर निघालो. वाटाड्याने आमचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला, बरीच भीती दाखवली. रस्ता खरच बिकट होता, सुरूवातीला एका धबधब्यातून वर गेलो मग कड्यात कोरलेल्या पायऱ्या तर तरी कधी अरूंद खोबणी, तरी सुदैवाने एवढे धुके होते की मागचे भयंकर एक्सपोजर आम्हाला दिसतच नव्हते. नाहीतर अवघड वाटेपेक्षा ते बघुनच खर तर हात पाय लटपटतात वा डोळे फिरतात. असे बराच वेळ चढलो तरी माथा काही येईना, मग शेवटी तिथुनच सलाम करून परत फिरलो, पण जेवढे गेलो तेवढे सर्वच चित्तथरारक होते.


काळजीपुर्वक उतरलो आणि गुहेपासून बाकी सगळ्यांना घेऊन पावसात भिजतच खाली सिद्धगडाच्या पठारावर उतरलो. गडाच्या दरवाजाजवळच एक मंदिर आहे, तिकडे पुन्हा एकदा आमची चूल मांडली, बाजूला धो धो पाउस, चिंब भिजलेलो आम्ही आणि मग थोड्याच वेळात रटारटा उकळणाऱ्या तांबड्या रश्श्याचा वास आसमंतात पसरला. त्यावर मनसोक्त आडवा हात मारून मंडळी तृप्त झाली. या वेळेपासून ट्रेकदरम्यान सच्च्या डोंगरयात्रीप्रमाणे आपला स्वयंपाक आपणच करायचा असे ठरवले होते तो सगळाच बेत अगदी झकास पार पडला.

मग पुन्हा एकदा रमतगमत परतीची पायपीट चालू केली. गेले चार पाच तास चालू असलेल्या मुसळधार पावसाने सगळे चित्र अजूनच पालटले होते. कड्यावरून मधुर खळखळाट करत उड्या घेणारे ओढे आता घनगंभीर आवाज करत एका लयीत कोसळत होते. सकाळची नदी आता कदाचित पार करता येणार नाही, फार पाणी असेल तर तसा प्रयत्नही करू नका, पाणी ओसरेपर्यंत, सकाळपर्यंत थांबावेही लागेल असा इशाराही वाटाड्याने दिल्यावर तर मीही गंभीऱ झालो. एव्हाना संध्याकाळ झाली होती, वाटाड्याचा सिद्धगड्पाड्याला निरोप घेतला आणि शेवटचा टप्पा भराभर चालू लागलो. एकमेकांना धरून नदी ओलांड्ली, सकाळच्या दोन ओढ्यांच्याही नद्या झाल्या होत्या, त्या ओलांडल्या आणि अखेर अंधुक प्रकाशात नारिवलीला पोहोचलो.

देवळात कपडे बदलले. कर्जतला जाणारी शेवट्ची बस तर केंव्हाच गेली होती, आता मुरबाडला जायला साडेआठला बस. पण तसे मुरबाड-कल्याण-पूणे जाणे म्हणजे जवळजवळ सकाळीच पोहोचलो असतो पुण्याला. शेवटी एक खाजगी जीप कर्जतपर्यंत यायला मिळवली. इंद्र आणि नरेशचा निरोप घेतला आणि कर्जतला गेलो, तिथुन पुढे चेन्नई एक्स्प्रेसने लोणावळा आणि मग रात्री अकरा वीसच्या लोकलने पुणे हा सगळा प्रवास अर्धजागृतावस्थेत केला. सगळे इतके दमले होते पण पुन्हा एकदा एक सर्वांगसुंदर आणि पुरेपुर पावसाळी ट्रेक केल्याचे समाधान मनात होते.

राजमाची

शनिवारी ७ वाजता कर्जत गाठले आणि कोंडिवडेसाठी सहा आसनी रिक्षाची वाट पहात बसलो, पण उशीर झाल्याने त्या वाटेला कोणीच जाणार नाही असे समजले. नशीबाने ८.४५ची महामंडळाची गाडी पकडून खोपड्याला उतरलो... कोंढाणा गावतल्या एका रहिवाश्याच्या सोबतीने कोंडीवडे गाठले.

कोंडिवडेत राहण्याची उत्तम सोय आहे, आम्ही गजानन देशमुखांकडे तळ ठोकला. कोंडीवडे ते राजमाची वाटेत बरेच फ़ार्म हाऊस आहेत. देखमुखाने त्यांच्याच नविन भांधलेल्या घरात रहाण्याची सोय केली तेव्हा फ़ार आनंद झाला, परंतु त्यांच्या इमानदार प्राण्याला आमचा आनंद काही पहावला नाही. पाहुण्यांच्या कुशीत झोपण्याच्या त्याच्या वाईट खोडीमुळे आम्हाला रात्रभर जागता पहारा ठेवावा लागला.

संध्याकाळी लवकर मुंबई गाठायची असल्यामुळे पहाटेच ट्रेकला सुरवात केली. देशमुखांच्या कुत्र्याने कोंढाणाच्या हद्दीपर्यंत सोबत दिली... उल्हास नदीच्या पात्राला लागून असलेला कोंढाण्याचा परिसर आणि समोरच्या डोंगरातून उतरणार्‍या रेल्वेगाड्यांचे दृष्य मनाला भुरळ पाडत होते.
Rajmachi

मुख्य रस्ता सोडुन आम्ही राजमाचीचा मार्ग जवळ केल्यावर काही क्षणात वाट चुकल्याची खात्री पटली. वाट चुकल्याशिवाय ट्रेकला मजाच नसते हे जरी खरं असलं, तरी नंतर मात्र ती डोकेदुखी ठरू शकते. पहाटेच बाहेर पडल्याने ना कोणी वाटसरू ना वाटाड्या भेटला. चुकत चुकत १.३० तासात गुहे जवळ पोहचलो. ही गुहा म्हणजे सातवहानांच्या काळातील शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच होता. आत भग्न अवस्थेत काही अवशेष दिसत होते. गुहेत राहण्याची सोय आहे, परंतु काही बेशिस्त पर्यटकांमुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे. गुहेवरुन कोसळणार्‍या धबधब्याचा नयनरम्य देखावा कॅमेर्‍यात बंदिस्त करुन पुढे निघालो, रस्त्यात एक ग्रुप भेटला पण तोही गुहेच्या दिशेने वाटचाल करत होता.
Guha
Cave
dhabadhabA
dhabadhabA
dhabadhabA
Side View
Guhemadhun

गुहेतील चहावाल्याने पुढल्या वाटेचे मार्गदर्शन केले. ओढा पार करुन आम्ही पुढे सरकलो, काही ठिकाणि ट्रेकर्सच्या पावलांची निशाणे दिसत होती, त्यावरुन स्वर्ग गाठायचा अयशस्वि प्रयत्न करत निसरड्या दरडीपाशी येउन थबकलो. त्यातच एका मित्राने फ़्लोटर्सचे निमित्त करून पाय वर केले. पुढे एका ओढ्याला बगल देऊन वर जाण्याचा प्रयत्न केला. समोर बालेकिल्ला दिसत होता पण चुकिचा मार्ग पत्करल्याने आणि वेळेचे बंधन असल्यामुळे तेथे जाणे शक्य नव्हते.
Chukaleli vaaT
Santosh
Ganesh
Sant Draj
dhabadhabA

थोडावेळ टंगळ मंगळ करून खाली जाणार्‍या बाण निर्देशांचे पालन करत उल्हास नदिच्या पात्रात उतरलो. तेथे काही पर्यटक राफ़्टिंगचे कौशल्य दाखवण्यात गुंतले होते. आम्हालाही ती हौस भागवण्याची फ़ार इच्छा झाली, पण ते खजगी राफ़्ट असल्याचे कळले.
Rafting - Ulhas Nadi
परतीच्या मार्गावर असताना पावसात मनसोक्त भिजुन घेतलं. १.०० वाजता देशमुखांकडे गरमा गरम जेवण घेउन २.१५ ला कर्जत गाठले.

वासोटा

१६ मार्च २००७ला शुक्रवारी संध्याकाळी मोबाईवर 'Gs1'चा नंबर झळकू लागला आणि मनातल्या मनात नविन ट्रेकचा आनंद साजरा केला... 'वासोटा' करतोय.. येणार का? म्हणून विचारणा झाली आणि लागलीच होकार कळवला. पण एक अडचण होती... ती म्हणजे ट्रेकची सुरवात शुक्रवारी नसुन शनिवारी करायची होती... कारण वासोट्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे अशी माहिती मिळाली होती. पुणे - सातारा - बामणोली - वासोटा आणि तसाच परतिचा प्रवास दिड दिवसात करायचा होता. 'गिरीविहार'ला फोन करून त्याचाही कौल घेतला।

जीसच्या प्लॅन नुसार आम्ही रात्री ११ वाजता पुण्यात अपेक्षित होतो... तेथून सातारा मार्गे बामणोलीत मध्यरात्री २ - ३ वाजेपर्यंत पोहचायचे आणि पहाटेलाच बामणोली सोडायचे असा प्लॅन होता... पण मैत्री पार्कला ९ वाजता पकडलेली पुण्याची बस स्वारगेटला पोहचे पर्यंत मध्यरात्रीचे २ वाजले होते... जीसने सांगितल्या प्रमाणे 'मिहिर' आम्हाला घ्यायला स्वारगेटला आला... मिहिरच्या आईने केलेला पाहुणचार आमच्यासाठी फार मोलाचा होता... साडेतिनच्या सुमारास मिहिर आणि भक्ती सोबत त्यांच्या गाडीने आम्ही जीसला गाठले... जीसच्या गाडीत पुण्याचे मायबोलीकर कूल, आरती, स्वाती, फदी बसले होते.

सातारा मार्गे जाताना वाटेत अजिंक्यताराचे दर्शन झाले... पुढे कास पठाराचे आणि कोयनेचे सौंदर्य न्याहाळत सकाळी साडेसातच्या सुमारास बामणोली गाठले... कोयनेचे बॅकवॉटर महाबळेश्वच्या पायथ्याला तापोळ्या पर्यंत पसरलेले आहे. या बॅकवॉटर मधून सव्वा तासाचा लाँचचा प्रवास करून आम्हाला वासोट्याच्या पायथ्याला मेट इंदवलीला जायचे होते. चौकशीअंती कळले की वासोट्याची परवानगी देणारे कार्यालय सकाळी ८ वाजता उघडते... (मनात म्हंटले उशिरा आलो ते एक बरच झालं :p)

Koyana

तेथेच नाष्टापाणी करून, बाराशे रुपयात लाँच ठरवून सकाळी ९ला निघालो... नागमोडी वळणे घेत आम्ही कोयनेच्या घनदाट अरण्याकडे सरकत होतो... आपल्या दोन्ही बाह्या पसरून सह्याद्री आमच्या स्वागताला उभा होता... मंत्रमुग्ध करणार निसर्ग आणि निरव शांतता यांचा अद्भुत मिलाप अनुभवयास मिळाला.

Koyana Parisar

सुमारे पाचशे चौरस किमीच्या दाट जंगलात वसलेला दुर्गम किल्ला अशी ज्याची महती आहे, तो पहाण्याचे बर्‍याच वर्षा पासूनचे स्वप्न पुर्णत्वास येत होते. पुर्वेला सह्यकड्यांनी कोयनेच्या पाण्यात हेलकावणारी रांगोळी काढली होती... पण त्याच सह्यकड्यांनी कोकणात आपला दरारा निर्माण केला होता. उत्तरेला मधु-मकरंद गड, दक्षिणेला जंगली जयगड तर कोकणच्या बाजूला नागेश्वर, महिमंडणगड रुबाबात उभे होते. कोकणातूनही वासोट्यावर येता येते पण त्यासाठी बरीच शक्ती वाया जाते.

Welcome

डाविकडे जुना वासोटा आणि उजविकडे खोट्या नागेश्वर सुळक्याला सोबतीला घेऊन वासोटा दिमाखात उभा होता...

Vasota

नावाड्याला पाच पर्यंत परत येण्याचे वचन देऊन झपाझप पायवाट कापत पायथ्या जवळील वनविभागाच्या कार्यालया जवळ पोहचलो... वाटाड्या म्हणून तेथील कृष्णा गोरे यांना चारशे रुपयांच्या मानधनावर मंजूरी देऊन त्यांच्या सोबत चालू लागलो... वाटेत लिंबोणीच्या आकाराच्या गुलाबी आंबोळगी नावाचा रानमेव्यावर ताव मारला...

AmbuLagi

एक सुकलेला ओढा पार करून बजरंगबलीचे दर्शन झाले.

Maruti

वरच्या माळ्यावर सुर्या मार्चची होळी खेळत होता... देवळा शेजारी पिण्याचे पाणी भरून घेतले आणि निघालो...

Thabak Thabak!!!

Butterfly

देवळापासूनची वाट मोठी असली तरी घनदाट आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती १

Payvat

काही झाडं विचित्र प्रकारच्या नक्षीमुळे विद्रूप दिसत होती... "त्या अस्वलांच्या नखांच्या खूणा आहे". कृष्णाने सांगितलेल्या माहितीमुळे सगळेच जण गपचूप पुढे चालू पडले... सोबत या जंगलात सातशे गवे, भरपूर सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वले, सतरा बिबटे आणि दोन पट्टेरी वाघ आहेत अशी पुरवणी त्याने जोडली.

दुसर्‍या टप्प्यात आल्यावर उजविकडे नागेश्वराला जाणार फाटा दिसला... थोडावेळ आराम करून डाविकडच्या वाटेने वासोट्याकडे निघालो... तिन तासात माथ्यावर पोहचण्यात यश मिळाले. पुढे काही अंतर चालून गेल्यावर दरवाजा दिसला... समोरच देऊळ आहे...

Mahadev Mandir

मागिल बाजूस वाड्याचे अवशेष दिसतात... थोडं पूढे गेल्यावर आणखी एक देऊळ दिसले... माथ्यावर उन्ह आणि वारा यांच्याशी झोंबी खेळत सभोवतालचा नजारा बघत होतो... पश्विमेला हिरवगार कोकणात दिसत होतं... कोकणात उतरणार्‍या डोंगररांगा आणि नागेश्वराला गेलेली वाट पाहून पोटात चक्क गोळा आला... अबब!!!

Nageshwarakadil vaat

Kapari

Vinchu Kata


थोडं मागे येऊन डाविकडच्या वाटेने पाण्याच्या टाक्या जवळ गेलो... पेटपुजा करून थोडावेळ तेथेच सावलीत आडवे झालो...

Vasotya varil Hanuman Mandir

"चलाऽऽऽ चलाऽऽऽ पाचच्या आत पोहचयं नव्हं"... कृष्णाने आवाज दिला. जडावलेल्या अवस्थेतच जुन्या वासोट्याकडे निघालो... आणि समोरच दृष्य पाहून झोपच उडाली... चार हजार फूट खोल कोसळणारा बाबूकडा पहाताना कोकणकड्याची याद आली... निसर्गाच्या या रुद्रभिषण अदाकारीमुळेच तर भटकंतीचे वेड लागतं.

Babu Kada

Kadelot

तीन वाजून गेले होते, वचनपुर्तीसाठी सगळेच भराभर पळत खाली उतरलो... बराच पल्ला फार कमी अवधीत गाठला होता... किनार्‍यावर येताच हंटर काढून कोयनेच्या पाण्यात पाय सोडून बसलो... आह्हा... काय तो आनंद!

याची साठी केला होता अट्टाहास शेवटचा क्षण गोड व्हावा

yachi sathi kela attahas

अंधार पडायच्या आत लॉचने बामणोली गाठायचे होते... हंटर तसेच हातात घेतले आणि बोटीत उड्या टाकल्या... वासोट्याच्या मागील सुर्यास्ताचे फोटो क्लिक करून राहिलेल्या बॅकवॉटरच्या प्रवासात झोपेचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयन्त केला.

Bye Bye !!!

संध्याकाळी साडे सहाला बामणोली वरून निघालो. सातारा रोडवर मिसळपाव खाऊन पुण्याकडे रवाना झालो. मिहिरने आम्हाला स्वारगेटला सोडले तेव्हा रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. मुंबईची एस्टी पकडून सायनला उतरलो तेव्हा पहाट होत आली होती. असा दगदगीचा ट्रेक पार पडूनही मनात खूप समाधान होतं.

रतनगड

दिवाळीची ४ दिवस सुट्टी... सणाचे दिवस असले तरी ४ दिवस घरात बसुन काढणे आम्हा भटक्यांना कठिणच.

हो ना करत रतनगडचा बेत नक्की झाला. रविवारी सकाळीच कसारा गाठुन भंडारदरा (शेंडी)ला पोहचलो. रतनगडाला जायचं तर प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण पार करुन रतनवाडी गाठाव लागतं. त्यात एकमेव होडी सेवा, वाट पहाण्यात दुपारचे चार वाजले. होडीतुन एक तासाचा प्रवास करुन रतनपाड्यात पोहचायला संध्याकळचे ५ वाजले.
आम्हा सहाजणां पैकी तीघे मोटरसायकल वरून आल्याने आधीच गडावर पोहचले होते. चढाईला दोन तास लागणार होते, सुर्य मावळतीकडे झुकला होता, त्यातच अमावस्या होऊन गेली होती. वाटेतच अंधार पडणार याची खात्री पटली.

काय करावे या विचारात पुढे निघालो असता, नदीच्या टोकाशी अमृतेश्वराचे मंदिर दिसले.
Photobucket
यादवकालीन सुमारे १२०० वर्षा पुर्वीचे हेमाडपंथी मंदिर, त्याचा शांत परिसर आणि यक्षकिन्नरांच्या सुबक मुर्त्यांनी सजलेलं मंदीर मनाला भुरळ पाडतं होतं. मंदिराच्या बाजुला एक विस्तीर्ण पुश्करणी आहे. भंडारदर्‍याला येणारे बरेचसे पर्यटक खास मंदिराला भेट देउन जातात. थोडावेळ मंदिरात विसावल्यावर तेथील फ़ेरीवाल्यांकडे वाटाड्याची चौकशी केली. वाटाड्याचं आणि आमचं सुत्र जमल्यावर आम्ही चौघांनी गडाकडे कुच केली. सकाळ पासुन होणार्‍या प्रवासाच्या कसरतीमुळे थकवा जाणवत होता. पण कोणत्याही परिस्तिथीत गडावर पोहचायचा निर्धार होता.

मजल दरमजल करत तासाभरात एका तिट्यावर आलो. त्यातील एक वाट हरिश्चंद्र गडाला जाते याची पुष्टी वाटाड्याने केली. आम्ही उजविकडे वळुन पहिल्या पठारावर पोहचलो. पुर्वेकडून चढत असल्यामुळे सुर्य आमच्यासाठी कधीच मावळला होता. उरलेली पायवाट संधीप्रकाशात पार करावि लागणार या चिंतेत असताना; समोर गडाचा उभा चढ दिसला आणि आमच्यातली हवा पार निघुन गेली. साडेसहाच्या सुमारास दोन हेलकावणार्‍या शिड्या चढून ५० फ़ुटाचे अंतर कमी केले.
Photobucket
Photobucket

काळोखात गडाचा पुर्व दरवाजा (बहुदा गणेश दरवजा) नरजेत येत होता, परंतु वाट अगदीच चोंचोळी होती. त्या चिमण्या वाटेतुन दरवाजात पाऊल ठेवताच दुपारी पोहचेलेले तीघे जण त्यांच्याकडील टॉर्च नाचवत सामोरे आले. सगळ्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन गड काबीज केल्याचा आनंद साजरा केला.
दुसर्‍या दिवशी पश्चिमेकडून कोकणात उतरायचा मनसुबा वाटाड्याला बोलून दाखवला आणि त्याने ही तयारी दर्शवली. सकाळी परत वर येण्याचे आश्वासन देऊन त्या अमावस्येच्या अंधारात तो गडप झाला. जवळच असलेल्या गुहेत जाऊन पाठिवरचा भार कमी केला.
Photobucket

दुपारचे जेवण चुकल्यामुळे आता पोटात काक शाळा पेटली होती. लगेच चुल पेटवुन गरमा गरम चिकन सुप तयार केला, MTR चा तयार पुलाव गरम करुन दोन मिनिटात फ़स्त केला.
Photobucket
प्रत्येकाने सोबत बराच शिधा आणला होता. चुलीवर खिचडी तयार होत असताना विस्तवावर (सुकामेवा) सुके बोंबिल भाजले जात होते. खिचडी, तळलेली मिर्ची आणि सुके बोंबील अशी फ़क्कड मेजवानी झाली आणि दमललेले आत्मे तृप्त होऊन गुहेत निद्रीस्त झाले. मधेच एखादी विद्युतलता अंधाराचे गुढ वाढवुन जाई... त्यामुळे रात्रभर वेगवेगळ्या आवाजाने जाग येत राहिली. सुर्योदायाला सगळी मंडळी निसर्गाला हाक देण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या ठिकाणांना भेट देऊन आली. रात्री शिल्लक राहिलेल्या सुक्या मेव्यानेच सकाळी दंतमंजनाचा कार्यक्रम पार पडला. नाष्ट्याला दिवाळीचा फ़राळ होताच.

आम्हाला गडाच्या पश्चिमेला खाली ठाणे जिल्ह्यात उतरायचे होते. साम्रद आणि घाटघर पर्यंतची पायपीट किमान ३ ते ४ तासांची होती, म्हणुन वाटाड्याला सकाळी नऊलाच हजर रहाण्याची ताकीद दिली होती. त्या अनुशंगाने आठच्या सुमारास आम्ही गडाच्या प्रदक्षीणेला निघालो. गुहे शेजारीच रतनाईदेवीचे कातळात कोरलेले मंदीर दिसले. गणेश दरवाजाकडून पुढे गेल्यावर एक ढासळलेला बुरुज दिसला, बाजुलाच थंडगार गोड पाण्याची तीन्-चार टाके होती. थोडं पुढे गेल्यावर साम्रद कडे घेउन जाणार कोकण दरवाजा दिसला. दरवाजाची बरीच पडझड झाली होती आणि खाली खोल दरी दिसत होती, वाटेचं नामोशिशाण दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला कोकणात उतरण्याचा निर्णय बदलावा लागला. पुढे गेल्यावर आणखी काही टाके आणि एक भुयार दिसलं. आत जाण्याचा छोटासा मार्ग होता पण कोणाची भीड झाली नाही.

बाले किल्ल्याचा शेवटच्या टप्प्यात निसर्गाचा एक उत्कृष्ट नमुना पहावयास मिळाला. गडाच्या कातळ भिंतीत एक निसर्गनिर्मीत नेढे आहे..
Photobucket

Photobucket


पाच एक मिनिटाचा उभा चढ चढुन नेढ्यात गेल्यावर समोर ४२०० फ़ुट खोलीवरचा पुर्ण भंडारदराचा परिसर डोळे विस्फ़ारुन टाकत होता. नेढ्याच्या दोन्ही बाजुने वारा कानात गुंजन करत होता. गावातुन निघालेली होडी दिसत होती, त्वरीत एका BSNL मित्राने सेलवरुन नावाड्याशी संपर्क साधला असता... दुपारी दुसर्‍या फ़ेरीला १२ पर्यंत वाट पहाण्याची हमी नावाड्याने दिली. नेढ्यातुन चहु बाजुंचा परिसर नेजरेत भरत होता. समोर ढगात घुसलेला कळसुबाई, डाविकडे अलंग, मदन, कुलंगची रांग, पायथ्यापासुन खुणावणारा खुट्टा अगदिच समोर दिसतो. उजविकडे आजोबा, हरिश्चंद्रगड आणि माहुलीचा परिसर नजरेत भरत होता. गडाच्या दक्षीणेकडील दरवाजा बर्‍यापैकी सुस्थीत आहे. तीथे बराच वेळ Mobile Range चा लपंडाव खेळल्यावर गुहेकडे प्रयाण केले. वाटेत निळ्याशार कार्वीच आणि सोनकीच्या फ़ुलांच जंगल पसरलं होतं.
Photobucket

पुर्वेकडील बुरुजावरून समोरील दरीचे विहंगम दृष्य आणि कडा न्याहाळताना काहिंच्या मनातील कोकणकड्याच्या आठवणी ताजा झाल्या.
Photobucket

गुहेत परतुन सामानाची आवरा आवर करुन आम्ही शिडी मार्गे गड उतरू लागलो. संध्याकाळी चढाईच्या वेळी भयावह वाटणारे जंगल आता डोक्यावर सावली धरुन आम्हाला साथ देत होतं. परंतु रात्रीच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. प्रवरा नदीच्या प्रवाहासोबत गड उतरल्यावर नदिच्या डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. रतनवाडीत परतल्यावर बाजरीची भाकरी आणि पिठल्यांवर सगळ्यांचा आडवा हात पडला.

गडावरील रात्र, जेवण, वाटाड्याचे अनुभव, नावाड्याने दिलेली टांग, गाडी वाल्यांचे अवाजवि दर आणि एकुणच प्रवासाची दगदग यामुळे रतनगडचा ट्रेक अविस्मरणिय झाला.