Monday, February 27, 2017

चंद्रमौळी लिंगाणा

शिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो माघ कृष्ण सप्तमीला.. निमित्त होतं रायगडाच्या पूर्वेकडील सह्यरांगेतील 'लिंगाणा' मोहीम. सह्याद्रीच्या पदरातून उभारलेला लिंगाणा म्हणजे ध्यानस्त बसलेल्या 'कैलासपती'च रूपच जणू.. त्याच्या खांद्यावरून उतरणाऱ्या सरळसोट सह्यधारा म्हणजे जटाधारी शंकराचाच अवतार भासावा. घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वर जटेच्या आकाराचा माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह!

हिवाळ्यात ठरलेली आमची लिंगाणा मोहीम काही ना काही कारणास्तव पुढे ढकलली जात होती. ट्रेकचा मुहुर्त थोडा लांबला हे एका अर्थी बरच झालं... नाहितर इतक्या सुंदर देखाव्यास आम्ही मुकलो असतो. आमचे नाशिकचे स्नेही आणि चक्रम हायकर्सचे सभासद हेमंत यांच्या लिंगाणा मोहिमेतून स्पुर्ती घेऊन आम्ही स्वतःच आमची लिंगाणा मोहीम आखली होती.

१७ फेब्रूअरीच्या रात्री मोहरी गावात दाखल झालो. येथेच पुणे-मुंबईकरांच्या गळाभेटी झाल्या. लिंगाणा चढ-उतर करायला पूर्ण दिवस लागतो म्हणून सूर्य उगवायच्या आतच पायथ्याकडे कूच करणे क्रमप्रात्प होते. चढाईस लागणारे क्लायबिंग इक्युप्मेंट सतीश, कुशल, सुनील यांनी सोबत आणले होते. सगळ्या साहित्याचे सभासदां मधे समान वाटप करून पहाटेच मोहरी गावातून बोराटयाच्या नाळेकडे प्रस्थान केले. सकाळच्या गारव्यात नाळेत कोसळलेल्या शिळांवरून माकडउड्या मारत लिंगाणाच्या पायथ्याला पोहचयाला तास-दीड तास लागला. पुढे गेलेल्या म्होरक्यांनी वेळ न दवडता क्लायबिंगचा सेटअप लावायचं काम सुरु केल होत. आम्ही सुद्धा हेल्मेट, हार्नेस, कॅरीबिनर, स्लिंग, ग्लोज असा सगळा चढाईचा साज चढवून इशारतीची वाट पहात पायथ्याला बसून होतो.

आमच्या ग्रुप मधले आघाडीचे चढाईपटू सतीश, वासू, कुशल आणि सुनिल यांच्या हाती आपल्या आयुष्याचे दोर सोपवून आम्ही निर्धास्त होतो. सेटअप लावत वर गेलेल्या वासू आणि सतीशचा कॉल येताच एक-एक जण वर सरकू लागला. काही वेळातच पहिल्या टप्प्यातील पंधरा फुटाचा एक रॉकपॅच येताच आमच्यातील अवजड वाहनांचा धीर खचला.. त्यांना वर ढकलण्यात बराच वेळ खर्ची पडला. वाटेतले खडतर टप्पे पार करत बहुतेक सगळे मावळे गुहे पर्यंतची चढाई करण्यात यशस्वी झाले. मात्र गुहे पर्यंतचा टप्पा गाठण्यास आम्हाला दुपारचे दोन वाजले होते. सोबत आणलेल्या शिदोरीवर ताव मारुन आम्ही पुढिल चढाईस तयार झालो.

गुहेच्या मागून चढाईचा दुसरा खडतर टप्पा सुरु होतो... त्यातील पहिलाच टप्पा ७० फुटांचा होता. सतिशने अनवाणी पायांनी त्या तापलेल्या कड्याला घवसणी घातली... खालून सतीशला belay देण्याच काम कुशल ईमानेइतबारे करत होता. दरम्यान आम्ही पश्चिम टोकाकडील पाण्याच्या टाक्यां मधून पाणी भरुन घेतलं... बराच वेळ कड्याशी झटापट करुन सतिश वर पोहचला खरा... पण सतीश सारखी चपळाई आणि ताकद आम्हा सगळ्यां मधे नव्हती. त्यात दुपारचे उन आमची परिक्षा घेत होतं.. पाण्याची कमतरता, चढाईच्या क्षेत्रातील नवखेपण, परतीच्या प्रवासातील बोराटा नाळेतील खडा चढ आणि हाताशी असलेला अपुरा वेळ.. या सगळ्याचा विचार करुन आम्ही वेळेचे गणित मांडले, तर ते जुळत नसल्याची खात्री पटली. मग जड अंतःकरणाने सर्वांनुमते माघारी फिरण्याचा सुज्ञ निर्णय घेण्यात आला.. सर सलामत तो ट्रेक पचास...

पुढल्या वेळी योग्य सराव आणि पाठीशी पुरेसा वेळ घेऊन परत येऊ, असं मनाशी ठरवून परतीचा प्रवास सुरु केला. चढाई पेक्षा उतराई जास्त भितीदायक होती कारण पाया खाली थेट ४०० ते ५०० फुटांची खोल दरी... Top Belayच्या सहाय्याने रॅपलिंग करत खाली उतरलो. 

दिवसभराच्या श्रमाने सगळे दमून गेलो होतो.. रायलिंग आणि लिंगाणाच्या मधल्या खिंडीत बसून लिडर्स लोकांच wind up बघत थोडा वेळ आराम केला. पश्चिमेकडे सरकलेला किरमाणी हात उंचावून अभिवादन करत होता. त्या पार्श्वभूमीवर नुकताच उतरून आलेलो लिंगाणा जणू काही आपल्यातलाच एक सवंगडी भासत होता... म्हणत होता पुढल्या वेळी फुरसत मधे या.. आपल्या लाडक्या दोस्ताची गळाभेट घ्यायला...
क्षणचित्रे  
१. सिंगापूर नाळे कडे...  

२. बोराटयाची नाळ..
३. रायलिंग आणि लिंगाणा मधील खिंड
४. चढाई पटू 
५. क्षणभर विश्रांती..
६. गुहा..
७. लीडर सतीश..

८. सह्यधारा..
९. किरमाणी..
१०. परतीच्या प्रवासातील बोराटयाची नाळ..