Friday, December 2, 2011

"सारे प्रवासी घडीचे"

ट्रेनमधल्या डब्यात : एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत




अभिनंदन मित्रा... काय मग? कधी ठरलं?

गेल्याच आठवड्यात... सिंहगडावरून आल्यावर आईने घोषित करून टाकलं... "आधी लगिन दगडाच मग बाकीच्या गडांच"



'अरे व्वा... आता ठरलंच आहे तर करून टाक लवकर... शेवटचा ट्रेक म्हंटलं' (आमचा हिटचिंतक ;) )

'एकदा का 2 X 4चा तह झाला की मग कसला ट्रेक नी कसला ट्रॅक'... अरे.. प्रत्येकाला जिवनात कधी ना कधी उडी ही माराविच लागते. काय करणार? ना ईलाज असतो... आणि तूझ्या उड्यांची ख्याती तर प्रत्येक ट्रेकच्या पाना पानावर पसरलियं. :p



असले गळे भरू सल्ले रिचवत शेवटी त्याने 'ती' उडी मारलीच...



तर झाले असे... मुंबई वरून सुटणार्‍या शेवटच्या लोकलने कसारा गाठले तेव्हा मध्यरात्रीचे अडीच वाजले होते. मार्चचा महिना असल्यामुळे हवेतील चैतन्य गायब होते. नाशिकला जाणार्‍या एस्टीची चौकशी करण्यासाठी एस्टी स्टॅण्ड गाठले तर तिथे नावाला एक कुत्रं हजर होतं. एस्टीसाठी पहाटे पर्यंत वाट पाहवि लागणार यात काहीच शंका नव्हती. 'जल्ला वाट पाहिन पण एस्टीनेच जाईन' या बाण्याला एस्टी स्टॅण्ड वरच ठेऊन आम्ही स्टेशनवर परतलो... म्हंटल मिळेल्या त्या मेलने ईगतपुरी गाठू आणि पहाटेची पहिली एस्टी पकडू... नशिब चांगलं म्हणून की काय प्लॅटफॉर्मवर कुत्र सोडलं तर एक रेल्वे गार्ड भेटला... त्याच्याकडे इगरपुरीला जाणार्‍या ट्रेनची चौकशी केली.



"ये क्या जाऽरेली है!"... समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक मेलगाडी सिग्नल मिळाल्यामुळे सुटण्याच्या पवित्र्यात होती... "इसके बाद कोई गाडी नही है!"



तो, मी आणि हिटचिंतक एकमेकांच्या तोंडाकडे बघत असताना अचानक गार्डने मदतीचा दांडका उगारला. निवांत झोपलेल्या एका डब्याच्या दरवाजावर गार्डने दांडका आपटून दरवाजा उघडायला लावला आणि आम्हा तिघांना त्या धावत्या ट्रेनमधे जबरदस्तीने घुसवलं. जल्ला म्हणतात ना ते... काय ते 'दैव देते नी ट्रेन नेते'.



ट्रेन मधुन उतरावे तर तीने बराच वेग घेतला होता. कोणती ट्रेन? कुठे जातेय? काहीच अतापता नसताना आम्हाला जबरदस्तीने डब्या मधे कोंबून गार्डने स्वत:ची सुटका करवून घेतली होती.



थोड इकडे तिकडे केल्यावर कळलं की, स्लिपर कोच मधे घुसलोय आणि ते ही WT :अओ: ^&%$@%$^ कपाळा वर 'गर्दिश में हो ताँरें' चमकत होते... रुमालाने 'ताँरें' टिपत असताना पाया खाली पसरलेल्या जनतेकडे लक्ष गेले... एव्हढ्या मध्यरात्री अचानक डब्यात घुसल्यामुळे दरवाजा जवळील जनता अचंबित नजरेने आमच्याकडे बघत होती.



त्यातला एक अचंबित... "किधर जाना है?" काय उत्तर द्यावे तेच सुचेना. (पन आमी बी काय कमी नाय... हाडांचे नसलो तरी दगडांचे ट्रेकर आहोत.)

आमचा पलटवार "आप को किधर जाना है?" (म्हणतात ना ते काय ते चोरांच्या उलट्या उड्या... असो.)

"वारानसी"... पायाकडून उत्तर आले.

'हम लोग अगले स्टेशन पे उतर जायेंगे'... असे ठोकून देताच, त्यांची विकेट पडली.



स्लिपर कोच असला तरी डबा बर्‍यापैकी फुल्ल होता... ईगतपुरी येण्यास कित्ती वेळ लागेल याचा काहीच अदमास नव्हता. वरील संभाषण ऐकल्यामुळे दरवाज्या जवळील उतारू आमच्या कडे विचित्र नजरने पहात होते. जसजशी गाडी वर जाऊ लागली तसा घाटातला थंडगार वारा डोक्यातील चक्रे फिरवू लागला. ईगतपुरीवरून किती वाजताची एस्टी मिळेल? चहाची टपरी उघडली असेल का? स्टेशन किती वेळात येईल? सुई दोरा मिळेल का? TTE आला तरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......... TTEचा विचार येताच पोटात गोळा आला.... लगेच तो गोळा मी पुढे पास केला.



गाडीची धडधड कमी होऊन छातीतली धडधड वाढली होती. काही क्षण विचार करून आम्ही जनरल डब्यात घुसण्याचे ठरविले... लटलटत्या पायांनी डगमगत्या डब्यातील अडथळा शर्यंत पार करत दुसर्‍या टोकाकडे गेलो आणि तिथेच नशिबाने हाय खाल्ली... पुढच्या डब्यात चक्क TTE हातातला पॅड सावरत मन लाऊन काम करत होता. आमची वरात लगेच मागे फिरली... काय करावे सुचेना?



त्या वेळी हितचिंतकाच्या डोक्यात काय कीडा वळवळला कोण जाणे... पाठी वरच ओझं खाली उतरवून तडक त्या TTE कडे गेला... आम्ही इकडे बधिर होऊन ते दृष्य पहात होतो... तो गेला तसाच अर्धा मिनिटात परत आला... "काय विचारले? काय म्हणला तो?"

तो म्हणतोय "गाडी स्टेशन के बाहर सिग्नल पे खडी है"



ठरलं तर.... तिघांच्या डोक्यात एकच विचार... ना मागचा ना पुढचा... जो दरवाजा दिसला तो उघडला नी थेट ट्रॅकवर उड्या मारल्या... दरवाज्या जवळील अचंबित जनता आऽ वासून मध्यरात्रीच्या 'उड्या" उघड्या डोळ्यांनी पहात होती. :d

धबधब्यांची जत्रा!!!

गेली काही वर्षे राहुन गेलेल्या महत्वाच्या ट्रेक पैकी एक म्हणजे भीमाशंकर... त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील प्रथम प्राधान्य असलेला ट्रेक. भीमाशंकर करणारे बहुतांश ट्रेकर्स शिडीघाट / गणेशघाटाचा पर्याय निवडतात... त्याला आम्ही कसे अपवाद ठरणार... पण सुन्याच्या 'Offbeat Sahyadri' या ग्रुपने नावाला साजेसा ऑफबिट मार्ग निवडला होता. भीमाशंकर व्हाया वाजंत्री घाट ते बैला घाट असा निराळाच घाट घातला होता.




नारळी पौर्णिमेचे पक्वान्न आणि रक्षाबंधनाचा आनंद पाठीशी घेऊन सगळे ट्रेकर्स रविवारी सकाळी ८ वाजता कर्जतला भेटण्यासाठी निघाले. मुंबईवरून सुटणार्‍या सकाळच्या दोन्ही कर्जत लोकल मधे फक्त आणि फक्त भीमाशंकरचेच ट्रेकर्स खच्चून भरले होते. कारण दुसर्‍या दिवशीची श्रावणी सोमवारच्या स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सगळ्यांना भीमाशंकर गाठून सत्कारणी लावायची होती. भीमाशंकरला सोमवारी कुंभमेळा भरणार याची जणू खात्रीच झाली होती. त्यातल्या त्यात आमच्यासाठी समाधानाची बाब म्हणजे गणेश / शिडी घाटाने जाणारे ट्रेकर्स नेरळ मधे उतरले... त्यामुळे गाडी निम्म्या पेक्षा जास्त रिकामी झाली. मात्र कर्जत एस्टी स्टॅण्डवरील गर्दी पाहून आमच्या समाधानी चाकाची पार हवाच निघून गेली. आम्हाला खांडस मार्गे जामरूखला जाणारी एस्टी पकाडायची होती. पण साडे आठच्या एकाच एस्टीत खांडस मार्गे जाणार्‍या ट्रेकर्सची गर्दी पाहून आम्ही एस्टीने न जाण्याचा निर्णय घेतला. स्टँण्डच्या पलिकडे टमटमवाले वाटच पहात होते.



साधारण एक तासाच्या प्रवासा नंतर आम्ही जामरूख मधिल कामथ पाड्यात पोहचलो. सह्याद्रीच्या पायथ्याला बिलगून असलेल्या ह्या छोट्याश्या गावा बाहेर धबधब्यांची जणू जत्राच भरली होती. तो थंडगार नजारा पाहताच न कळतच प्रत्येकाच्या हातातले कॅमेरे क्लिकू लागले. पाड्यातील एका घरात चहा, पोह्यांचा कार्यक्रम शिजत होता. तो पर्यंत तोंड ओळख पार पडली. पुण्या वरून श्री आणि सौ सुन्या तर मुंबईवरून मी, गिरीविहार, रोहित अशी मायबोलीकरांची टिम सज्ज झाली.



प्रचि१





गरमागरम नाष्टा आटोपून निघोलो ते थेट रणतोंडी धबधब्याच्या दिशेने.

प्रचि२





उजवी कडे पेठ (कोठलीगड)चा किल्ला लक्ष वेधून घेत होता... तर समोरील कातळ कड्यांवरून दरीत झेपावणार रणतोंडीचा रांगडा गडी खुले आव्हान देत होता... ते रौद्रप्रतापी रूप न्याहाळत आम्ही धबधब्याच्या डावीकडून वाजंत्री घाटाकडे सरकलो. एका टेकडीवर मागे राहिलेल्या गलबतांची वाट पहात असताना मधुनच धुक्यात हरवलेल्या हिरव्या कातळ कड्यांचे विहंगम दृष्य नजरेस पडत होते. दरम्यान, या घाटाला वाजंत्री घाट नाव कश्यावरुन पडले असेल? यावर चर्चा सुरू झाली. त्याचे रोहितने दिलेले उत्तर... "चोहो बाजुने वाजत गाजत कोसळणार्‍या धबधब्यांच्या आवाजामुळेच या घाटाला वाजंत्री घाट म्हणत असावेत".



प्रचि३





प्रचि४





प्रचि५





प्रचि६





प्रचि७





प्रचि८





घाट सुरू होताच उभा चढ चढताना हृदयांच्या ठोक्यांची नी पायांच्या वेगाची विषमता वाढू लागली. एका बेसावध क्षणी ढगांसारखा मोठ्ठा गडगडाट ऐकू आला. उजवी कडील कातळातील दरड कोसळताना पाहून क्षणभर का होईना पाय लटलटू लागले. जल्ला रोहितने त्याचेही प्रचि घेतले. :p एव्हाना मागे राहिलेल्या गलबतांचा धीर सुटला होता आणि त्यांनी सोबतीला आलेल्या वाटाड्या सोबत परतीचा मार्ग स्विकारला होता. ग्रुप मधे एक सुरत वरून खास सह्याद्री ट्रेकसाठी आलेला कॅमेरा बहाद्दर होता. फोटोच्या नादात हा वाट चुकला आणि त्याला शोधण्यात सुन्याची धांदल उडाली. त्यातच पुढे गेलेली तरुणाई दाट धुक्यामुळे दिसेना... त्यामुळे मधल्या फळीत रेंगाळणार्‍या आम्हा लोकांना दोन्ही आघाड्यांवर नजर ठेवत मार्गक्रमण करावे लागत होते.



प्रचि९





प्रचि१०





प्रचि११





प्रचि१२





घाटाच्या मध्यावर असताना डावीकडे पदरगडचा सुळका दिसत होता. पदरगडला पाठ करून थोड वर गेल्यावर खांडस कडिल दरीचा दाट धुक्यात हरवलेला भाग दिसत होता. दरीतून येणार्‍या भन्नाट वार्‍यामुळे तेथिल अरुंद वाटेवरून चढताना थोडी काळजी घ्यावी लागत होती. धुक्याचे साम्राज्य नसते तर त्या ठिकाणावर बराच वेळ रेंगाळता आले असते. साधारण साडे तीन तासांनी आम्ही वाजंत्री घाटाचा दरवाजा गाठला. घाटावरील विस्तृत पठारावर वार्‍याने तांडव मांडला होता. संपुर्ण चढाईत पावसाने हजेरी लावल्याने पठारावर येताच थंडीने अंग कुडकुडू लागले. शेवटच्या फळीतील गळंदाजांना घेऊन आम्ही खेतोबाच्या देवाळ कडे निघालो. मात्र वार्‍याच्या मार्‍यामुळे बिनीचे जलंदाज तेथून कधीचे पसार झाले होते.



प्रचि१३





प्रचि१४





प्रचि१५





वाटेत एका ठिकाणी घरगुती जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. रोहितच्या आईने सकाळी तयार केलेल्या पोळ्या आणि गवारीची भाजी... सुधिरच्या आईने बनविलेला मसाले भात आणि तिखट पुर्‍या, कोणी पुरणपोळी तर कोणी शेंगदाण्याची चटणी... सगळे आत्मे तृप्त झाले.



पुढे एक ओढा पार करून अर्धा तासात भोरगिरीच्या एका पाड्यात मुक्कामाला थांबलो. नुकताच पार केलेल्या ओढ्याची आठवण ताजी असताना थकलेल्या जिवांनी श्रमपरिहारासाठी थंडगार पाण्यात डुंबण्याचा मनोदय अंमलात आणला.



रात्रीचे जेवण आटोपून झाल्यावर झोपेच्या जागेसाठी संगित खुर्चीचा खेळ सुरू झाला. कारण त्या पाड्यात मोजकीच चार पाच घरे होती आणि ज्या घरात आम्ही २० जण उतरलो होतो तेथे त्यांच कुटुंब मिळुन एकूण ३० माणसांना जागा करायची होती. दुसर्‍या दिवशी निघताना आम्हाला सामावून घेणार्‍या त्या कुटुंबाचे सगळ्यांनी मनापासून आभार मानले. सुन्याने त्या घरातील एक वर्षाच्या गौरवला कडेवर खेळवून आपली हौस भागवून घेतली.



प्रचि१६





प्रचि१७





सकाळी भरपेट नाष्टा केल्यावर सगळे धारकरी आपल्या अंतिम लक्षाकडे निघाले. वाटेतील दोन मोठे ओहोळ पार केल्यावर ग्रुप फोटो साठी सगळे एकत्र जमले. संधी मिळताच मायबोलीकरांनी तेथेही उड्या मारल्याच.



प्रचि१८





प्रचि१९





प्रचि२०





प्रचि२१







प्रचि२२





प्रचि२३





प्रचि२४





प्रचि२५









प्रचि२६









तासा भरातच गुप्त भीमाशंकरला पोहचलो. तिथे धबधब्यावर मात्र भाविकांची गर्दी लोटली होती. ती गर्दी पाहुन कालच्या दिवसातल्या एकांताला अचानक तडा गेल्याचे जाणवले. दर्शन घेऊन भीमाशंकर मंदिराकडे वाटचाल केली. तिर्थक्षेत्रांच्या परिसरातील घाण पाहून मन विषण्ण झाले. श्रावणी सोमवार असल्यामुळे दर्शनाच्या रांगेला ४-५ तासांचा वेळ लागत होता. पुरेसा वेळ नसल्यामुळे आम्ही दर्शन न घेताच निघायचे ठरवले. दुसर्‍याही दिवशी पावसाची हजेरी कायम होती.



प्रचि२७





एस्टी स्टॅण्ड जवळील एका टपरीवर भजी आणि चहा झाला. ऑफबीटच्या परंपरेला अनुसरून गणेश किंवा शिडी घाटाने न उतरता बैला घाटाने उतरण्यास सुरवात केली. मात्र या घाटाने बरेच भाविक येत होते. अरुंद वाटेमुळे थांबत रस्ता देत पुढे सरकत होतो. संततधार पावसाने या वाटेवरही धबधब्यांची पखरण केली होती. पहिला कडा उतरल्यावर पुढिल वाट तर चक्क ओढ्यातूनच उतरायची होती. जस जसे खाली येऊ लागलो तसे धुके कमी होऊ लागले.



प्रचि२८





सह्यकड्यावरील धबधबे नजरा वेधून घेऊ लागले.



प्रचि२९





प्रचि३०





अश्याच एका धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.



प्रचि३१





प्रचि३२





एव्हाना पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण सुरू करणार इतक्यातच पाऊस हजर... मग काय छत्री लंच सुरू झाला.



प्रचि३३









बैला घाटाने नांदगावात पोहचायला आम्हाला तिन तास लागले. तेथून टमटम पकडून कर्जत गाठले.



भीमाशंकरचा ऑफबीटने ठरवलेला वाजंत्री घाटातील चढाईचा आणि बैला घाटाने उतरण्याचा अनुभव फारच सुंदर होता. अश्याच ऑफबीट रुटने पुढिल ट्रेक करण्याचा मानस बोलून दाखवून आम्ही निरोप घेतला.



प्रचि३४





प्रचिकार : गिरीविहार

दुर्ग कलावंतीण

'यशवंतराव चव्हाण द्रुतगती' मार्गवरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पुर्वेला माथेरानच्या रांगेत दिसणारा प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो. मुंबई पासून जवळ असूनही काही ना काही कारणांनी या किल्ल्याची मोहिम बर्‍याच वेळा रद्द झाली. जवळच तर आहे मग आज नै तर उद्या होईलच... असे मनाशी घोटवून पुढे गेल्यावर पाच एक मिनिटांत इरशालगडाचा 'W' Shape दिसतो. या दोन्ही गडांकडे बघताना मन नेहमी खट्टू होतं... कधी कधी वाटे शेडूंग फाट्यावर गाडीतून उतरावे नी थेट 'ठाकूरवाडी'कडे कूच करावी.



जवळच आहे तर माबोच भटकंती गटग तिथेच करू अशी गेली दोन वर्ष वंदता ऐकत होतो पण सगळ्या भटक्यांचा एकत्र भेटण्याचा योग जुळून येईल तर तो ट्रेक कसला... म्हणून मी आणि गिरिविहारने 'ऑफबिट सह्याद्री' सोबत २३ ऑक्टोबरच्या रविवारी प्रबळगड नाही तर निदान कलावंतीणचा दुर्ग तरी सर करायच निश्वीत केलं. ऑफबिट सोबत जायचे तर रविवारी सकाळी ८ला पनवेल गाठायचे होते... म्हणजे पुर्ण चढाई उनातून होणार यात काहीच शंका नव्हती. तसही दिवाळी नंतर कोणताही मोठा ट्रेक होणार नसल्याने आम्ही जायचे निश्चीत केले.



ठरल्याप्रमाणे ८ला पनवेल स्टेशन गाठले. ऑफबिटच्या राजसला फोन केला तर भाई एस्टी स्टॅण्डवर मिसळ खाण्यात दंग होते... थोड्याच वेळात आम्ही दोघेही त्यांच्यात सामिल झालो. दुपारच्या जेवणाची सोय म्हणून पराठे वैगरे विकत घेतले. सातशे रुपयात १४ जणांना टमटम मधे कोंबून आमची सवारी निघाली 'ठाकूरवाडी' कडे.



वाडीत पोहचे पर्यंत दहा वाजून गेले होते नी उनाचा तडाखा चांगलाच वाढला होता. वेळ न दवडता लगेच चढाईला सुरवात केली. पहिल्या पडावात ओळख परेड करुन पुढिल उभ्या चढाई साठी सज्ज झालो. पाठीवरील सॅक मधे तीन लिटर पाण्या व्यतिरिक्त कसलेच वजन नव्हते. तरीही उन्हाचा त्रास जाणवत होता. ऑफबिटने नावाला साजेसाच खड्या चढाचा मार्ग निवडून आमची पार हवाच काढून टाकली. ऑफबिटचे सगळे मावळे चपळतेने पुढे गेले, मात्र माची पर्यंतच्या खड्या चढाईने आम्हा दोघांची पार वाट लागली होती.



माची वरील एका शिळेवर कोण्या हौशी शिलेदाराने आपल्या अयशस्वी प्रेमाचा शि'ळा'लेख खरडवून ठेवला होता. मनात विचार आले, 'जल्ला... इथ पर्यंत पोचताना आमची ही दमछाक होते आणि ह्या शिलेदारांना कुठून बरं जोर येतो एव्हढ्या वर येऊन शिळालेख खरडवत बसायला?'. म्हणतात ना 'प्रेमाला उपमा नाही'... त्या उपमा पाहुन मलाही सुरसुरी आली होती की लिहावे, 'गडावर प्रेम करा दगडावर नको'... पण म्हंटले नको... तो आपल्या 'दगडा'चा अपमान होईल. ;)



माची वरील एकुलत्या एका झाडा खाली विसावा घेऊन पुढे निघालो तर समोर बुरुजावरील कातळात कोरलेले बजरंगबली आणि गणपती दिसले. तसेच पुढे गेल्यावर माचीवरील वाडीत 'गावठी चिकन करून मिळेल' अशी पाटी दिसली आणि मग काय म्हणता... अंगात जो काय उत्साह संचारला... त्यासाठी एका दमात गड सर करुन येऊ. पण कसलं काय, ती पाटी फक्त नावा पुरताच होती. शेवटी पिठलं भाकरीची ऑर्डर देऊन शेवटच्या टप्प्याकडे निघालो.



प्रब़ळ आणि कलांवती मधल्या बेचक्यात आलो तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. त्या घळीच्या पुर्वेकडील बाजूस प्रबळचा उंचचउंच कडा होता आणि तिकडे थंडगार सावली... तर पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला कलावंतीचा कडा उन्हात तापत होता. सगळ्यांच्या मनात एकच विचार 'सरणार कधी उनं', पण त्याही उनात गड सर करणे भागच होते.



तसा हा सोप्पा ट्रेक... मुनलाईट ट्रेक करायचा सोडून ऑफबिटने उगाच उन्हातून आमची वरात काढली... म्हणून थोडावेळ त्यांच्या नावाने ठणाणा केला.



अरे हा पायर्‍यांचा पॅच फक्त १४ मिनीटांत आम्ही पार करून टॉपला जातो... असे म्हणून लिडरलोक चॅलेंज देऊ लागले... म्हंटले, "१४ काय ७ मिन्टात चढून जाऊ, पण या ऑक्टोबरच्या उन्हात ते शक्य नाही". शेवटी गडावरच्या प्रेमाला जागून आम्ही साडेचौदा मिनिटांत तो पायर्‍यांचा पॅच चढून वर गेलो. वर रखरखीत उन... सावली साठी एकही झाड नाही.



प्रचि मराठी कट्टावरून साभार... हे प्रचि प्रबळगडा वरून काढलेले आहेत.













अगदी टॉपवर जाण्यासाठी एक विस फुटाचा रॉकपॅच पार करावा लागणार होता. लिडर लोक रोप लावण्याच्या कामात गुंतले होते. तो पर्यंत सावली साठी आम्ही त्या रॉकपॅचच्या पुर्वेकडील बाजूला चिटकून बसलो होतो. तो रॉकपॅच रोप न लावता चढणे सोपे होते परंतू उतरताना मात्र रोपची नितांत आवश्यकता भासली.



माथ्यावर कमीत कमी हजार चौ.फु. जागा होती. टेळहणी साठीच तिचा वापर करत असणार यात शंका नाही. फारसे अवशेष दिसले नाहीत. कलावंतीण इतिहास मात्र कळला नाही. वरून टेहळणी करताना समोर उजविकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसत होत... तर इरशालगड प्रबळच्या मागे लपला होता. पुर्वेला चंदेरी, विकटगड दिसला... तर इशान्येला धूसर वातावरणात कल्याणची खाडी, हाजी मलंग दृष्टिस पडला. पश्चिमेला कर्नाळाच्या सुळका आणि उत्तरे कडे पनवेल ते खारघरचा परिसर दिसतो. स्वच्छ वातावरण असते तर वायव्यकडील JNPT आणि मुंबईचा परिसर दिसला असता.





स्थळदर्शन पार पडल्यावर एक ग्रुप फोटो काढून खाली उतरायला सुरवात केली. उतरताना रॉकपॅच ते पायर्‍यांचा पॅच चक्क १४ मिनीटांच्या आत पार केला. :p खाली बेचक्यात बसून थोडी विश्रांती घेतली आणि माची वरील घराकडे प्रस्थान केले. पिठलं-भाकरीच जेवण आटोपले. घरासमोरील निवांत फिरणार्‍या कोंबड्याचे फोटो घेण्यात आले. (फक्त आठवणं)



उतरताना ऑफबिट रुटने न जाता मळलेल्या पायवाटेने उतरल्यामुळे थोडं वळसा घालावा लागला खरा पण वाटेत सावली असल्यामुले फारसे कष्ट पडले नाहीत. चारची एस्टी गाठणे हे एकच उद्दिष्ट होते. आरामात ठाकूरवाडीत पोहचलो ते प्रबळगडाला लवकरच भेट देण्याचे आश्वासन देत.