Wednesday, July 3, 2019

अल्केझॅण्ड्रा - रामबाग

पाऊस सुरु झाला की आधी बेडकं बाहेर पडतात आणि मग ट्रेकर्स.. गेल्या चार महिन्यांचा ट्रेक विराम संपवण्यासाठी पावसाळ्या शिवाय चांगली संधी नव्हती... भल्या पहाटे यो आणि रोमाच्या सोबतीने गिरीच्या होंडासिटीतून कर्जत कडे रवाना झालो.


पुण्या वरुन आलेल्या सुन्याला चौक फाट्या वर पिक करुन बोरगाव कडे निघालो. चौकातल्या हॉटेल पुर्वा समोर ओसंडून वाहणारी पावसाळी गर्दी पाहून मनात काळजी दाटून आली. जस जसं पुढे गावाकडे जाऊ लागलो तसं सेल्फी ट्रेकर्सचे जथ्थे वाढू लागले..  मनातल्या काळजीच रुपांतर चिंतेत होऊ लागलं.  ही सगळी जत्रा माथेरान वर जाणार म्हणजे वाटेतल्या निसर्गाचे काय हाल होणार या विचाराने मन विषण्ण झालं. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आमच्या वाटेला ईतर जनता येण्याचं कारणंच नव्हतं.. ती सगळी सेल्फीची दिंडी वन ट्री पॉईन्टच्या वाटेने निघाली होती.


पोखर गावातल्या शाळे शेजारी गिरीची गाडी उभी करुन..  आम्ही कूच केली ती खाटवण गावाच्या दिशेने.. वाटेतला ओढा ओलांडून समोरच्या टेकाडावर पोहचताच "पेरते व्हा.. पेरते व्हा.." कोकलणार्‍या पावश्याने दर्शन दिले.  मागे वळून पाहिलं तर मोरबे धरणाने गाठलेला तळ दिसत होता. नवी मुंबईचा हा पाणीवाला यंदाच्या रोडावलेल्या पावसाळ्या मुळे खूपच आटला होता. पाऊस पाण्याची चिंता वाहत पुढे निघालो.. वारा पडला होता त्यामुळे पहिल्याच टप्प्यात सगळे घामाघूम झालो. पावसाची एक दमदार सर येऊन गेली. उजविकडे धुक्याच्या पडद्यात गुरफटलेला सोंडाई किल्ला आपली ओळख सांगू लागला..  ट्रेक दरम्यान चालणारा हा निसर्गाचा खेळ मोबाईल मधे कैद करत, रमत गमत निघालो ते खाटवणच्या दिशेने...






आजची मोहीम होती माथेरानच्या अल्केझॅण्ड्रा पॉईन्ट वरुन चढाई आणि त्याच अल्केझॅण्ड्रा पॉईन्टच्या डाव्या बगलेतून उतरणार्‍या रामबाग पॉईन्टने उतराई.. गार्बेट पॉईन्टच्या समोरील सोंडेवर असलेल्या या अल्केझॅण्ड्रा पॉईन्टची चढाई एकदम अंगावर येणारी..  पायथ्याला विस एक घरांच खाटवण नावाच टुमदार गाव.. बांधावरच्या चिखलातली वाट तुडवत पायथ्याच्या गावा पर्यंत पोहचायला आम्हाला तासाभराची पायपीट करावी लागली..  गावाच्या समोरुनच सोंडेवरची खडी चढाई सुरु होते.  सोंडेच्या मधल्या टप्प्यात एक दोन पठार आहेत.. तिथल्या कोवळ्या गवतावर गावातल्या गाईंनी मनसोक्त ताव मारला होता. पठारावर वाढलेल्या झुडपांवर कोषाचे किडे आपलं पान कुरतडण्याच काम मन लावून करत होते..  रानातल्या माश्या पावसाला कंटाळून आमच्या छत्री मधे घुसु पहात होत्या..  एकंदर पावसाळी ट्रेकचा माहोल जमून आला होता.








सोंडेच्या वरच्या टप्प्यातून खाली शेतांच्या चौकटीत वसलेली कौलारू घरे लक्ष वेधून घेत होती.  शेवटच्या टप्प्यात चढाईचा कस लागत होता. पडझड झालेली कातळातली वाट दम काढत होती. शेवटच्या पायर्‍यां चढून अल्केझॅण्ड्रा पॉईन्ट वर पोहचलो तर स्वागताला चहा वाला हजर.. त्याच्याकडील आलं घातलेला वाफाळता चहा घेतला. दुपारच्या जेवणाची विचारणा केली. जवळच असलेल्या चहावाल्याच्या घरात झुणका भाकरीची सोय झाली.. बाहेर अखंड कोसळणार्‍या पावसाने आणि गार वार्‍याने हुडहूडी भरली होती. अश्या कुंद वातावरणात भोसले मामांच्या घरातील धगधगत्या चुली शेजारी बसून खालेल्ली झुणका भाकरीची गोडी काय वर्णावी.. मनोमन त्या अन्नपुर्णेचे आभार मानले..



पोटपुजा आटोपून रामबाग पॉईंटच्या दिशेने निघालो. ही वाट दगडाने पक्की बांधलेली आहे, त्यामुळे उतरताना कुठेही कष्ट पडत नाहीत. खाली उतरताना पर्वत कस्तुर आणि नवरंग पक्षाची शिळ ऐकू येणे म्हणजे ट्रेक मधे श्रीखंड.. वाटेतले थंड पाण्याचे ओहोळ पार करत, रमतगमत पदरातून खाली उतरत दिड तासात पोखर गावात उतरलो..  सकाळाच्या गर्दीचा आता थांगपत्ताही नव्हता.. जवळच वाहणार्‍या नदीत कावळ्याची आंघोळ आटोपली. पुढे पळस्पे फाट्यावर दत्त सॅन्क्सचा गरमागरम वडा आणि वाफाळता चहा घेऊन पावसाळी भटकंतीचा श्रमपरिहार केला.




रविवारची क्रिकेट वर्ल्डकपची भारतXइंग्लंडची मॅच बघायची सोडून.. या भटकंतीने काय दिले?.... जंगलातील तंगडतोंड, धबधब्यांचे फेसाळणे, ढगांचा मफलर गुंडाळून बसलेल्या डोंगरांचे नजारे , प्राण्यांचा-पक्षांचा सहवास, आयत्या वेळी आपुलकीने खाऊ घातलेली भाकर.. आणि हे सगळ अनुभवायला जिवलग मित्रांची धम्माल साथ!!!