Saturday, May 14, 2022

‘हर की पौड़ी’

Blue Poppy,  घांगरिया, गोविंदघाट, चामोली,  तयाल,  जॉलीग्रॅन्ट अशी बरिच नानाविध नावं.. कधीही न ऐकलेली..  मेंंदूच्या कप्प्यात साठून राहिलेली.. फुलों की घाटी, हेमकुंड साहिब, जोशीमठ, रुद्रप्रयाग... आणि जाग आली.  खर तर जाग आली ती जिम कॉर्बेटच्या पुस्तकातला रुद्रप्रयागचा नरभक्षक आठवल्याने... घड्याळात बघितलं तर साडे तीन वाजलेले... म्हंटलं सकाळी नऊची फ्लाईट आहे तर इतक्या लवकर उठून फायदा नाही. पण उस्तुकेपोटी झोप लागेल तर ना.. दोन वर्षांपासून व्हॅलीचा प्लॅन ठरत होता.. हिमालयातील टूर म्हंटली की सगळे जण मनाने केव्हाचेच तिकडे पोहचलेले असतात.. पण तो योग जुळून यायला नशिबासोबत मित्रांचीही साथ आवश्यक असते... आणि मग जी काय धमाल,  मस्ती होते त्याला तोड नाही. 


उत्तराखंडच्या दुर्गम वाटांवरुन फिरताना तिथल्या अलौकीक नजार्‍यांची चैन अनुभवत.. कधी पक्षांच्या जुगलबंदीचा स्वर कानात साठवत.. तर कधी शेजारच्या दरीत कोसळणार्‍या धबधब्याचा नाद ऐकत..  सामान वाहणार्‍या खेचरांच्या टापांच्या आवाजात मिसळलेले त्यांच्या मालकांचे कुकारे ऐकत.. गावकर्यांचे किस्से.. गाईड लोकांच्या गप्पा.. मजल दरमजल करत.. प्रत्येकाची वे़ळ सांभाळत इच्छित स्थळी पोहचण्यात दमछाक होते.. पण या अनुभुतीची मजा काही औरच!   


सगळं आवरुन विमानतळ गाठलं.. मुंबईच्या वेगवेगळ्या टोकांवरुन आलेले टुरचे साथीदार एव्हाना हजर झाले होते. साधारण चार तासांचा प्रवास करुन देहरादुनच्या जॉलीग्रॅन्ट Airportवर उतरलो. तीन टॅक्सींची जमवाजमव करुन आम्ही आठ जणांनी हरिद्वार कडे प्रस्थान केले. जुलैचा महिना असल्याने हवेत दमटपणा आणि आकाश ढगाळ होते.. थोडा अपेक्षाभंगच झाला.. देहरादून पेक्षा मुंबई बरी असं मनाला वाटून गेलं. पहिल्या दिवसाचा मुक्काम हरिद्वार मधल्या 'तयाल' धर्मशा़ळेत होता.. धर्मशाळेतला मुक्काम म्हंटल्यावर थोडी धाकधुकं होती.. पण अगदी चकाचक AC Roomची व्यवस्था असलेली धर्मशाळा बघुन आश्चर्याचा धक्काच बसला.


संध्याकाळी गंगाआरती साठी ‘हर की पौड़ी’ला निघालो. घाटावर आधी पासूनच भाविकांची लगबग दिसून आली. प्रत्येकजण सोईची जागा पकडण्यात व्यस्त होता.. गंगाआरतीचा चांगला नजारा कुठून मिळेल या शोधात फिरत असताना अचानक एका हवालदाराने हात पकडून खाली बसवलं.. "यहा से फोटो निकालना..  और मेरा भी फोटो निकालना"  म्हणत काठी आपटत पुढे बसलेल्या गर्दीत जाऊन उभा राहिला.. 


या जागेचे पौराणिक महत्व असे की, समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अमृत कलशातील काही थेंब ब्रह्मकुण्ड येथे सांडले.. म्हणून या जागेला  'हर की पौडी' म्हणजेच "हरि यानी नारायण के चरण" म्हणतात.  बरेच श्रध्दाळू लोकं इथे गंगास्नानच पुण्य गोळा करताना दिसतात.  आम्ही उभे असलेल्या बिर्ला घाट आणि ब्रह्मकुण्ड घाटाच्या मधून गंगेचा एकसंध प्रवाह वाहत होता.. घाटावरच्या देवळांच्या साथीने संधीप्रकाशात वाहणारी ती धार्मिक गंगा.. हजारो दिव्यांच्या प्रकाशात लुकलुकणारी केशरी गंगा..  

देवप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनीची भेट घडवणारी पौराणीक गंगा..  ऋषिकेशला वळसा घालून हरिद्वारच्या मैदानातून वाहणारी सात्विक गंगा..  एव्हाना समोरील मंदिरातून एकच घंटानाद सुरु झालेला..  पुजारी वृंदाच्या हातातील आरत्या झगमगू लागलेल्या.. उपस्थीत जनसमुदाय एकाच मंत्रघोषात तल्लिन झालेला..  अन दोन्ही कर आपसूक जोडले गेले.


हर हर गंगे, जय माँ गंगे |

ॐ जय गंगे माता, श्री जय गंगे माता ।

जो नर तुझको ध्याता, जो नर तुझको ध्याता,

मनवांछित फल पाता | ॐ जय गंगे माता….