Sunday, January 26, 2014

सासामुमो - १


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...
घडाळ्याच्या काट्यांवर धावणार्‍या आम्हा धारकर्‍यांना वरिल वाक्यांनी क्षणात स्फुरण चढते.. नी मग ध्यास लागतो तो आपल्या आवडत्या छंदाचा आणि त्याला खतपाणी घालणार्‍या मित्रांचा... कधी, कोण, कुठे असले शुल्लक प्रश्ण मागे पडतात, नी मग वाट पकडली जाते ती सह्याद्रीच्या पायथ्याची...
आपला आवडता छंद जोपासायला आपल्या सवंगड्यांची सोबत असणे, या सारखे दुसरे सुख ते कोणते? गिरिभ्रमण हा असाच एक छंद गेल्या कित्येक वर्षां पासून जोपासला गेला तो या सह्याद्रीतील भटक्यांच्या साथीने... या आपल्या मावळ्यां सोबत घालवलेले भटकंतीतील काही क्षण दैनंदिन आयुष्यातील रटाळपणा विसरायला लावतात आणि मग मन धाऊ लागते ते सह्यधारे वर उभारलेल्या गडकोटां मागे... भटकंतीला सह्याद्रीतील आडवाटांची मुळीच ददात नाही. मनाला वाटेल तेव्हा तिथे जावे... सह्याद्री स्वागताला कायम उभाच.
पंचवार्षिक योजनेत रखडलेल्या बागलाण प्रांताच्या साल्हेर मुल्हेर ट्रेक साठी नविन वर्षातील १८ ते २० जानेवारीचा मुहुर्त ठरवण्यात आला. चाचपणी अंती सहा मावळ्यांनी मोहिमे करता अनुकुलता दर्शविली. नविन गिलबिले, विनय भिडे आणि गिरिविहार यांच्या सोबत शुक्रवारी रात्री खोपट वरुन नाशिक कडे रवाना झालो. पुण्याहुन येणारे दिपक डिंगणकर आणि सुन्या नाशकात भेटणार होते. पैकी केवळ दिपक एकटाच या मोहिमेस रुजू झाला. सुन्याला ऑफिसच्या अपरिहार्य कारणामुळे येणे अशक्य झाले... तरी पठ्ठ्याने त्याच्या वर सोपवलेली Fire Worksची जबाबदारी न विसरता दिपक कडे सुपुर्त केली हे विशेष. स्मित
ठाणे - नाशिक - सटाणा - तारहाबाद अशी रिले पार पाडत शनिवारी सकाळी ९.०० वाजता साल्हेर पायथ्याच्या वाघांबे गावात पोहचलो. साल्हेरच्या चढाई साठी दोन मार्ग आहेत. एक साल्हेरच्या उत्तरे कडिल वांघाबे गावातून तर दुसरा पश्चिमेकडील साल्हेर गावातुन. आम्हाला साल्हेर - सालोटा एकाच दिवसात करायचा होता. सालोटा हा साल्हेरच्या पुर्वे कडे आहे. त्यामुळे आम्ही वाघांबे गावातुन साल्हेर - सालोटाच्या खिंडत पाठिवरील ओझी ठेवुन आधी सालोटा करायचा आणि मग खाली उतरुन बॅग घेऊन साल्हेर मुक्कामी जायचे असा बेत आखला होता. वेळ न दवडता गावातील पोपट मामाला गाईड म्हणुन सोबत घेतले.
प्रचित्र १
चढाईला सुरवात करताच पुढे गेलेला एक ग्रुप दिसला. मजल दर मजल करत त्या ग्रुपला गाठताच त्यातुन मायबोलीकर भुंगा बाहेर आला. गळाभेटींचा कार्यक्रम पार पडल्यावर एकमेकांच्या प्लॅन्सची देवाणघेवाण झाली. भुंग्याचा कॉलेज ग्रुप फक्त साल्हेर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी माघारी फिरणार होता... तर आम्ही संध्याकाळी साल्हेर मुक्कामी पोहचणार होतो.
प्रचित्र २
प्रचित्र ३
बागलाण प्रांतातील सेलबारी डोलबारी ही डोंगररांग उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उत्तरेकडील बिनीची जोडी. यातील डोलबारी रांगेवर वसलेल्या साल्हेर - सालोटा वरिल चढाई म्हणजे महा कठिण काम. तासलेले सरळसोट कडे आणि पायथ्या पासुन अंगावर येणारा चढ चढाताना चांगलीच दमछाक होते.
प्रचित्र ४
प्रचित्र ५
प्रचित्र ६
खिंडीत पोहचल्यावर सालोटावर चढाई करण्यासाठी आम्ही डावी कडे वळलो. सालोटाच्या पायर्‍यां खाली खांद्यावरच ओझ हलक केलं. त्यामुळेच सालोटाच्या उंच पायर्‍या चढणे सोप झालं.
प्रचित्र ७
प्रचित्र ८
प्रचित्र ९
सालोटाच्या वाटेवरिल दरवाजे भग्नावस्थेत आहेत. सालोटा जरी साल्हेर पेक्षा उंचीने कमी असला तरी त्याचे कडे साल्हेरला आव्हान देत दिमाखात उभे आहेत.
प्रचित्र १०
समोर साल्हेरवर चढाई करणारा भुंग्याचा ग्रुप
प्रचित्र ११
प्रचित्र १२ साल्हेरचे निरिक्षण करणारा दिपक
प्रचित्र १३
प्रचित्र १४
प्रचित्र १५ दरवाजाचे भग्नावशेष
प्रचित्र १६
सालोटाच्या कड्यां मधे पाण्याची सुकलेली टाकी आहेत. या टाक्यांची विशेषता म्हणजे यांची कप्प्याकप्प्यांत केलेली विभागणी. सालोट्यावर पाण्याच टाकं आहे पण त्यातील पाणी पिण्यास उपयुक्त नसल्याने आमची निराशा झाली.
प्रचित्र १७ साल्हेरच्या विचारात गढलेले पोपट मामा
प्रचित्र १८
उन्हातुन चढाई केल्यामुळे जीव कासाविस झाला होता त्यातच भुकेची जाणीवही वाढू लागली होती. त्वरित गड उतरण्याचा निर्णय घेतला. खिंडीत येऊन कड्याच्या सावलीत दुपारच जेवण केलं. पोपट मामांना भाजी-भाकरी आणि मानधन देऊन त्यांची रवानगी केली.
थोडा वेळ विश्रांती घेऊन साधारण तीनच्या सुमारास साल्हेरच्या कड्यांना बिलगलो. वर उन आणि खाली दरितुन येणारा थंड वारा आमच्या चढाईची परिक्षा बघत होता. एव्हाना पाण्याचा साठा संपत आला होता.
प्रचित्र १९
प्रचित्र २०
प्रचित्र २१ साल्हेर चढाई दरम्यान दिसणार सालोटा किल्ल्यांचा विहंगम दृष्य..
प्रचित्र २२
साल्हेरवर पोहल्या शिवाय पाण्याची सोय होणार नव्हती. पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा आणि कपारीतील गुहांच्या रांगा पार करत साल्हेरच्या तिसर्‍या दरवाजात पोहचलो खरं... पण एव्हढ्या मोठ्या गडावर पाण्याच टाकं शोधायच कुठे? दिपकने साल्हेरचा नकाशा काढला.. गिरि आणि विनयचे त्यावर चर्चासत्र चालू झाले... शेवटी दरवाजाच्या उजविकडील वाट पकडुया असा फतवा विनयने काढला.
प्रचित्र २३
प्रचित्र २४ काही पाऊलं पुढे जाताच गंगासागर दिसला.
नकाशातील पहिली महत्वाची खुण सापडल्याचा आनंद झाला. विनय गुहांच्या शोधात तलावाच्या वरच्या बाजुस गेला.. नी आम्ही पाण्याच्या शोधात पुढे होमकुंडा कडे निघालो. होमकुंडा पासुन काही अंतरावरच पिण्याच्या पाण्याच टाकं दिसल्यावर व्याकुळलेला जिवं टोपात पडला. त्याच झाल असं की, नविनच्या म्हणण्या नुसार पाण्यात बरेच बॅक्टेरीया आहेत. ते गाळुन उकळुन प्यावे लागणार.. हे प्रवचन ऐकताच गिरिने नविनला झापायला सुरवात केली. पण नविन काही केल्या बधेना... शेवटी जेवणाचा टोप काढुन त्यात रुमालाने पाणी गाळण्याचा सोपस्कर पार पडला आणि मगच आमचा तहानलेला जीव भांड्यात पडला.
गडावर गेल्यावर आंघोळी करायची अस गिरिने ठरवलं होत.. पण गडावरील भणाणत्या वार्‍यामुळे गिरिला आंघोळीचा बेत रद्द करावा लागला. बाटल्या आणि टोपं पाण्याने भरुन घेतले आणि गुहेकडे निघालो. गुहेत भुंग्याचा ग्रुप मस्त आराम करत होता. त्यांच्याशी गप्पाटप्पा चालु असताना सुप साठी चुल मांडण्यात आली. गरमा गरम सुप पिऊन थोडी तरतरी आली खरी... पण बाहेरिल थंडीने आमची बोलतीच बंद केली होती. दिवसभराच्या श्रमाने थकल्यामुळे जेवणा आधी थोडा आराम करावा म्हणुन आम्ही जे आडवे झालो ते थेट दुसर्‍या दिवशी सकाळीच अंथरुणातुन उठलो. रात्री दहाच्या सुमारास मला जाग आल्यावर जेवणासाठी इतरांना उठवण्याचा क्षीण प्रयत्न करुन पाहिला पण कोणीही काहिही ऐकण्याच्या परिस्थीत नव्हता.
प्रचित्र २५
 

No comments:

Post a Comment