Wednesday, January 2, 2013

हडसर - निमगिरी

दिवाळी आधी रतनगड ट्रेक पार पडलेल्याला दिड-दोन महिन्याचा काळ लोटला होता. दिवाळी नंतर रोमाने भैरवगड तर योने सुधागड सर केला होता. मी ऐन वेळी 'कारणे दाखवा नोटिस' बजावून त्यातून काढता पाय घेतला होता. दोन महिने माझा ट्रेक उपास घडलेला असतानाच नाताळच्या लंब विकांतातील क्रॉसकंट्री ट्रेक रद्द झालेल्या यो आणि रोमाचा फोन आला. क्रॉस नाहितर नाही... निदान कंट्री ट्रेक तरी करुचा धोशा लावला होता. मंगळवार असल्याने एका दिवसाचा ट्रेक करायचा होता. जवळचा प्रबळगड करुया अशी टूम निघाली. त्याच काळात आमचा ट्रेक सवंगडी गिरिविहार फॅमिली सोबत जंगलात 'सफर' करत होता.

प्रबळला जायचे तर पहाटे पनवेल वरुन सुटणारी ठाकूरवाडीची पहिली येश्टी पकडावी लागते. थंडीच्या दिवसात ते जिकरीच काम सहज शक्य नव्हतं... म्हणून मग चारचाकी वर शिक्कामोर्तब झालं. पण गिरिला डावलून प्रबळ केला तर तो तिथेच आमची समाधी बांधेल याची खात्री होती... म्हणून म्हटलं गाडीनेच जायचे तर जुन्नर जवळील जोडगोळी 'हडसर-निमगिरी' एका दिवसात सर होईल. ही माहितीही नुकतीच 'जिप्सी दी ग्रेट'ने पुरवली होती.

सोमवार २४ डिसेंबरला ठरल्या प्रमाणे रात्री बाराला रोहित मावळा, रोहितचा मित्र सुरेंद्र आणि Rocks Coupleला घेऊन आम्ही ठाणे-कल्याण-मुरबाड-माळशेज मार्गे जुन्नरला रवाना झालो.

माणिकडोह परिसरातील निमगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी मढ(जुन्नर तालुका)गावा जवळील कवठेवाडी फाट्या वरुन कच्च्या रस्त्याने निमगिरीच्या पायथ्याला जाता येते. मात्र जिप्सीने सुचविल्या प्रमाणे रात्रीच्या प्रवासातील कच्चा रस्ता टाळण्यासाठी आम्ही पारगाव फाट्या वरुन गणेश खिंड-जुन्नर-राजुर मार्गे थेट हडसरला जायचे ठरवले. वाटेत मढ गावा शेजारील पिंपळजोग धरणातील 'चांदणे शिंपत जाशी'चा नजारा टिपण्यात आला.

प्रचि १

रात्रीच्या त्या गारठ्यात फक्त दोन क्लिकवर समाधान मानावे लागले. क्लिकक्लिकाट बंद करुन गाडी पळवायला लागलो. थंडीचा असा काही परिणाम झाला की पाच एक मिनिटांत येणारा पारगाव फाटा काही दिसलाच नाही... आपण चुकलोय हे कळून चुकले होते. मात्र रोमाच्या डोक्यात 'आळेफाटा' असा काय फिट्टं बसला होता की, गाडी थेट ओतूर वरुन पुणे-नाशिक हायवे वर जाऊन पोहचली. :P नाक्यावर चौकशी अंती कळले की, आपण ३० एक कि.मी. पुढे निघुन आलो आहोत. टपरी वाल्याने नारायगाव मार्गे जुन्नरला जाणारा रस्ता सुचवला आणि आम्ही मार्गस्थ झालो.

सुमसाम रस्त्या वरिल दिशा दर्शक काळजी पुर्वक पहात आम्ही पहाटे पाचच्या सुमारास हडसर गावात पोहचलो. तासभर विश्रांती घेऊन साडेसहाला झुंजूमंजू होताच हडसरच्या चढाईला निघालो. गावातील पाणवठ्या नजिक गाडी पार्क केली. विहिरीवर आलेल्या मावश्यांकडून गडा वर जाणार्‍या वाटेची शहानिशा केली. फारशी चढाई न करताच विसएक मिनिटांत आम्ही हडसरच्या नाळीच्या तोंडाशी पोहचलो.

प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५




प्रचि ६: माणिकडोह




प्रचि ७


खिंडीतली चढाई तशी सोप्पी आहे. नवख्या ट्रेकर्सने जपून जावे.

प्रचि ८


नाळीच्या मध्यावरुन खिंडीत लपलेला दरवाजाचा बुरुज नजरेस पडतो. गडाच मुख्य प्रवेशद्वार पश्विमेला असलं तरी वेळ वाचवण्यासाठी आम्ही पुर्वेकडील नाळीच्या वाटेने वर चढत होतो. बुरुजा वरुन पाहिले असता कातळात लपवलेल्या मुख्य दरवाजाची कलाकृती नजरेत भरते.

प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचिन १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५


रोमा आणि यो ने आणलेलया बॅगा तिथेच ठेवून पाच जण चार दिशेला पांगले. ही आयती संधी साधून माकडाने डाव साढला. खाऊची पिवशी समजून माकडाने योने आणलेला गॅसस्टोव्ह लंपास करण्याचा बेत आखला. पण 'उडछलांग' नृत्यनिपुण यो रॉक्सने केलेले 'तांडवनृत्य' पाहून बिच्चार्‍या माकडाने यो समोर सपशेल शरणागती पत्करली. मात्र त्या ऐतिहासाकी क्षणांचे साक्षिदार होणाचे भाग्य केवळ सौ. रॉक्सच्याच नशिबी होते.

प्रचि १६


प्रचि १७


हा नाट्यविष्कार संपन्न होत असताना अस्मादिक मात्र महादेव मंदिरा पाशी उनाडत होते. मंदिरा मागे छोटासा तलाव आहे. नंदी समोरच्या सभामंडपात गणेश, मारुती सोबत गरुडमुर्ती पहावयास मिळली.

प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


एव्हाना आठ वाजून गेले होते... नाष्ट्या साठी कांदेपोह्यांची तयारी सुरू झाली. खाणारे पाच आणि कांदेपोहे दोन पातेले... बहुत नाईन्साफी है... अरे म्हणून काय झालं आम्ही दोन्ही पातेल्यांना समान 'ईन्साफ' मिळवून दिला.

प्रचि २२


प्रचि २३


पेट पुजा आटोपून रोमा, सुरेंद्र आणि Rocks Couple गड फेरीला निघालं आणि मी रात्रीच्या झोपेचा हप्ता भरुन काढण्यासाठी गड उतरु लागलो.

प्रचि २४


प्रचि २५


परतीच्या वाटे वरिल सरळ वाट पेठचीवाडी कडे जाते तर डाविकडिल वाट हडसर गावात जाते. वाटेत दोन ठिकाणी पाण्याचे स्तोत्र पहावयास मिळाली

प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


प्रचि २९ पेठेचीवाडी मधुन निमगिरी कडे जाणारा रस्ता...


प्रचि ३० वेडा राघू


साधारण तास दिडतासाने सगळे गड उतरुन खाली आले. एव्हाना माझाही एक हप्ता वसुल झाला होता. तिथेच ब्रेड, जॅम, चटणी, काकडीचा खुराक संपवण्यात आला.

प्रचि ३१


मध्यान्हीचा सुर्य डोक्यावर तळपत होता आणि लक्ष होते निमगिरी... आम्ही राजुर-१ मार्गे निमगिरी गावाकडे निघालो... अर्धा-पाऊण तासात निमगिरी गावात पोहचलो. गावातून पुढे पारगाव फाट्याकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्याने निमगिरीच्या पायथ्याला पोहचलो. पायथ्याच्या वाडीतील सुरेश-रमेशला सोबत घेऊन आम्ही चढाईला सुरवात केली.

प्रचि ३२


प्रचि ३३


निमगिरीच्या सुरवातीला घळीतून चढताना Zigzag पायवाट आहे. तर शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या कातिल पायर्‍यांचा थाट आहे. आमच्या मागून आलेले पुण्यातील बालोद्यान शाळेची मुलं टपाटप कात़ळ पायर्‍या चढताना पाहून यो आणि रोमाची बोलती बंद झाली. त्यांना लिडर बद्दल विचारले असता कळले की, तो सगळ्यात शेवटी आहे. बारा तेरा वर्षांच्या मुलांना अश्या ठिकाणी मोकाट सोडून देणार्‍या लिडरचा राग आला. पण असो.

प्रचि ३४


प्रचि ३५


प्रचि ३६


प्रचि ३७


प्रचि ३८


प्रचि ३९


सुरेंद्र, सौ.रॉक्स आणि मी पायर्‍यांचा मार्ग टाळून डावी कडून गडाच्या प्रवेशद्वारा समोर येऊन पोहचलो. पडझड झालेल्या दरवाज्या शेजारी एक गुहा सदृश्य खोली आहे. तिथून उजव्या बाजूने प्रदक्षिणा सुरू केल्या वर जवळच दोन पाण्याची टाकी दिसतात. बराच गाळ साचलेल्या त्या टाक्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे. गडाच्या उत्तरेला कातळात दोनचार गुहा आहेत. पण त्यांची साफसफाई न राहिल्याने त्या रहाण्यास अयोग्य आहेत.

प्रचि ४०


प्रचि ४१


प्रचि ४२


इथून समोरील पिंपळजोग धरणाचा परिसर, चावंडचा किल्ला, हरिश्चंद्रगडा वरिल तारमती शिखर दृष्टिक्षेपात येतं.

प्रचि ४३


प्रचि ४४


प्रचि ४५


प्रचि ४६


गड माथ्यावर बरेच भग्नावशेष आहेत. साधारण एका तासात गडफेरी पुर्ण करुन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.

प्रचि ४७


प्रचि ४८


गड उतरताना योने सोबत आलेल्या वाडीतल्या मुलाचे कान टोचले. त्या चुणचुणीत मुलाने आपल्या उत्तरांनी योला खूष केले. निघताना आमचे फोन नंबर मागितले. "काळजी घ्या... जपून जावा.." असा निरोपही दिला.

सगळ्या बाळगोपाळांचा निरोप घेऊन कच्च्या रस्त्याने धुरळा उडवित तासा भरात कवठेवाडी फाट्यावर पोहचलो. टपरी वरिल गरमागरम वडापाव पोटात ढकलून माळशेज कडे रवाना झालो. माळशेज घाटातील बोगद्या आधी थांबून हरिश्चंद्रगडाचे दर्शन घेतले. आता दिवस मावळायच्या आत कोकणकड्याचे दर्शन घ्यायचे होते, म्हणून लगेच बेलपाडा फाट्याचे दिशेने सुसाट निघालो. शेवटी कोकणकड्याचे ओझरते दर्शन घेऊनच सगळ्यांचे कॅमेरे मॅन झाले.

प्रचि ४९


प्रचि ५०


धन्यवाद :)

1 comment:

  1. May I know Who is the Creater of this Blog ! Mast ch aahe
    I m Prashant my cell no is 98 90012305 and 9 175 275 175

    ReplyDelete