Monday, August 3, 2015

रोहा भटकंती

यंदा पावसाने जुन मधे इंगा दाखवुन दिल्यावर पुढे अधिक मास पाळायचा निर्णय घेतला. पण त्यामुळे मान्सुन ट्रेकिंगचा माहोल सुरु होण्यास जुलै अखेर पर्यंत वाट पहावी लागली. जुलैच्या शेवटच्या विक-एन्डला पाऊस आपला बॅकलॉग भरुन काढण्याची चिन्ह दिसू लागली आणि भटकंतीचा माहोल तयार होऊ लागला. शुक्रवार सकाळ पासूनच व्हॉट्सअप ग्रुप वर भाराभर पोस्टींचा पाऊस पडू लागला आणि कोकणात ट्रेकला जाण्याचा प्लॅन डन झाला.
प्लॅन नुसार सगळे शनिवारी रात्री भांडुपला गिरिविहार कडे जमले. यो रॉक्स, नविन गिलबिले, जिप्सी आणि अस्मादिकास सोबत घेऊन गिरिविहारची होंडा सिटी रोह्याच्या दिशेने निघाली. हायवेवरचा रेनडान्स बघत इंदापुर मार्गे रात्री तिनच्या सुमारास तळा गावात पोहचलो. पहाट झाल्या खेरीज चढाई सुरु करता येणार नव्हती, त्यामुळे गाडीत बसल्या जागी डासांची करमणूक केली. पावसाच्या सरीत मिसळलेला रातकिड्यांचा आवाजाने आणि वार्‍यावर ताल धरलेल्या पानांच्या सळसळीने पहाटेच्या गोडव्यात रंगत आणली होती. कोंबड्याच्या बांगेने गावाला जाग येऊ लागली. आधी पोटोबा मग ट्रेकोबा या तत्वाला जागत आमची गाडी एस्टी स्टॅण्ड वर पोहचली. स्टॅण्ड वरिल बिन पावाची गरमागरम मिसळ ओरपून सातच्या सुमारास गड चढायला घेतला.
तळा गावचा रखवालदार म्हणजे 'तळगड'!!
कोकणातला गड असल्याने उंची फार नव्हती. डोंगराची धार, त्यावर माची आणि वर किल्लाचा पसारा अशी तीन टप्पातील चढाई नेत्रसुखद होती. माची वरुन पुढे जाताना वाटेतील भग्न दरवाजाच्या अलिकडे हनुमान आणि शरभ शिल्प दिसलं.
रात्रभर भुरभुरणार्‍या पावसाने दडी मारल्याने आता सेल्फी काढण्याला ऊत आला होता.
अर्धा तासात गडमाथा गाठला. गडाची तटबंदी अजुनही बर्‍या पैकी सुस्थितीत आहे. हिरव्यागार बुरुजा वरील ढाल-काढीचे निशाण चित्तवेधक होतं. गड माथ्यावर जवळजवळ सात पाण्याची टाकी आहेत. महादेवाची कोरिव पिंडी आहे. आदिलशाही कडून इ.स.१६४८ मधे महाराजांनी किल्ला तळगड जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात महाराजांनी जे १२ किल्ले स्वतः कडे राखले होते त्यात तळगडाचा समावेश होता.
तासाभरात गडफेरी उरकून आम्ही कुडा लेण्यांचा रस्ता धरला. वाटेत झालेल्या मुसळधार पावसाने गाडीला चांगला वॉश मिळाला खरा पण यो आणि नविनची पावसात भिजण्याची इच्छा अपुरीच राहिली.
तळगडाच्या पश्चिमेला तळा-खाजणी रस्त्या वर कुडा लेण्यांचा डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्या पर्यंत गाडी रस्ता आहे. पायथ्या पासुन दहा मिनिटांत लेण्यां पर्यंत पोहचता येते.
लेणी पाहून आम्ही रोहा-मुरुड सस्त्यावरिल खाजणीचा खाडी पुल ओलांडून घोसाळगडा कडे निघालो. गावातील गणपती मंदिरा मागून एक वाट थेट गडाकडे चढते. वाट साधी असली तरी हवेतील दमटपणा मुळे चांगलाच घामटा निघत होता. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या तटा जवळ पोहचलो.
तटाला रान वनस्पतींचा विळखा बसल्याने फार हानी झाली आहे. तटाखाली पाण्याच टाकं आहे, तर उजव्या बाजूला तटाखाली उतरण्यासाठी चोर दरवाजा आहे. चोर दरवाज्यात बसल्यावर त्या चौकटीतून येणार्‍या थंडगार वार्‍याने एकदम फ्रेश वाटलं. त्या अरुंद जागेत फार वेळ न घालवता आम्ही उत्तरेकडील माची कडे निघालो. माचीच्या शेवटाला बुरुज बांधून माची संरक्षित केलेली दिसते. येथून दिसणारा नजारा केवळ अवर्णनिय!!!.
गडाच्या दक्षिण टोकाला बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्या वर जाणारी वाट तटबंदी वरुन जाते. डावी कडे आणि उजविकडे पाण्याच टाकं आहे, तर समोरील पायर्‍यांंची वाट बालेकिल्ल्या कडे घेऊन जाते. ही झाडाझुडपान जाणारी वाट काही ठिकाणी दरड कोसळल्याने फारच अरुंद आणि धोकादायक झाली आहे. गडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या बुरुजावर गवतात पडलेली तोफ दिसते. ती तोफ म्हणजेच बालेकिल्ल्या वर जाण्यार्‍या वाटेची खूण आहे. वर जाणारी वाट खड्या चढणीची व पावसामुळे निसरडी झालेली आहे. त्यामुळे तिथेच काही क्षण आराम करण्यात धन्यता मानली.
तटबंदीच्या आधी उजव्या हाताला भवानी हौद लागतो. कातळात कोरलले खांब हे या हौदाच खास वैशिष्ठ्य आहे. डावी कडील टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. टाक्यातल्या थंडगार पाण्याने क्षुधा शांत करुन गड उतरायला लागलो. उतरताना वाटेत ब्लु मॉरमॉन चे दर्शन झाले. गड उतारावर आडव्या आलेल्या वडाच्या पारंब्यांवर झोके घेऊन टारझनगिरीची हौस भागवून घेतली.
गावात पोहचे पर्यंत पोटात आग लागली होती. त्वरीत रोह्या कडे मोर्चा वळवला. रोह्याच्या एस्टी स्टॅण्ड वर बारटक्के खानावळीत लज्जतदार जेवणाची उत्तम सोय झाली. तृप्त मनाने शेवटच्या डेस्टिनेशन निघालो... किल्ले बिरवाडी!
बेलखर-रेवदांडा रस्त्यावर चणेरा गाव आहे. चणेराला डावीकडे वळून बिरवाडी गावत पोहचलो. गावातून थेट भवानी मातेच्या मंदिरा पर्यंत रस्ता जातो. मंदिराच्या मागे टेकडीवजा किल्ला आहे. भरपेट जेऊन सुस्तावल्याने मंदिराच्या पायर्‍या चढायचा कंटाळा आला होता. यावर उपाय म्हणुन धावतपळत एका दमात सगळ्या पायर्‍या चढून सुस्ती घालवली. मंदिरा शेजारीच महाराजांचा पुतळा आहे. राजांना वंदन करुन बुरुजाच्या उजवी कडून चढाईला सुरवात केली.
जस जसे पुढे सरकू लागलो तशी वाट नाहिशी होऊ लागली. दुसर्‍या बुरुजा खालील वाट तर चक्क दरड कोसळल्याने बुजून गेली होती. वरखाली कसरत करत पुढे निघालो तर वाट काही सापडेना. वर बुरुज मात्र दिसत होते, पण किल्ल्याच प्रवेशद्वार काही सापडेना . गडाला बराच वळसा घातल्या नंतर पुर्वेला दोन बुरुजांत दडलेलं किल्ल्याच प्रवेशद्वार समोर आलं. दरवाजा अडचणीच्या वाटेवर असल्यामुळे बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.
वर प्रवेश केल्यावर घोड टाकं आहे. त्या शेजारुन वाट पुढे बालेकिल्ल्या कडे जाते. वाटेत एके ठिकाणी गुरांसाठी पाणी पिण्याच दगडी भांड दिसलं. गड आकाराने लहान असल्याने फार वेळ न घालवता खाली उतरायला लागलो. एव्हाना संध्याकाळ होत आलेली तरी पावसाने आम्हाला एकदाही गाठले नव्हते. घामाने चिंब भिजलेले आम्ही सगळेच पावसाची विनवणी करु लागलो.
खाली उतरताना जंगलात वाट परत नाहिशी झाली. चकवा लागावा तसा आम्ही त्या काट्याकुट्यां मधुन भरकटू लागलो. किल्ल्याची उंची कमी असल्याने खाली माची स्पष्ट दिसत होती पण पावसाळ्यात वाढलेल्या जंगलामु़ळे ढोर वाटाही बुजल्या होत्या. नविन आणि यो काठीने वाटेतील झाडोरा झोडपत वाट बनवण्याचा प्रयन्त करत होते, पण त्यांनाही यश येत नव्ह्तं. त्यातच डास फार त्रास देऊ लागले. जिप्सी आणि गिरिचे पाय सरकत होते, तोल जात होता. पण वाट सापडण्याचे काहीही चिन्ह दिसेना. भांबावलेल्या स्थितीत काय करावे कळेना. मग सगळ्यांना वरच्या दिशेने चढण्यास सांगितले. आम्ही वर पोहचे पर्यंत नविन पटापट वर निघून गेला आणि वाट सापडल्याचे शुभवर्तमान घेऊन आला. पाच एक मिनिटांत माची वर पोहचल्याने सगळ्यांना हायसे वाटले.
अगदी सोप्प्या वाटणार्‍या गोष्टी कधी कधी आपली सत्वपरिक्षा घेतात. त्याचीच प्रचिती बिरवाडीच्या किल्ल्याने आम्हास दिली. कोकणतील निसर्गाच अंतर्बाह्य रुप उलघडून दाखवणारे हे तिन्ही किल्ले कायम मनात घर करुन राहतील यात शंकाच नाही.
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment