Friday, June 18, 2010

दूरचे डोंगर वरुन साजरे!!! (कळसुबाई)

पावसाळा सुरू झाला नी वेध लागले ते भटकंतीचे... लागलीच आसमंत सोबत कळसुबाईच्या ट्रेकचा योग जुळून आला...

इगतपूरी - घोटी मार्गे पहाटे ३.३०ला बारीला उतरलो... चतुर्थीच्या चंद्रप्रकाशात ओढ्या काढच्या विधी उरकण्यात काहीच अडथळा नव्हता... चहा-नाष्ट्याची सोय आसमंत तर्फे असल्यामुळे आम्ही फुरसत मधे होतो. पहाटे ६ वाजता चढाईला सुरवात केली. पावसाच्या कृपेने ओढ्यांना फारसे पाणी नव्हते. तरीपण हंटर हातात घेण्यातच मी धन्यता मानली... कारण पुढचा ट्रेक मला ओल्या पायांनी करायचा नव्हता...

वर धुक्याचं साम्राज्य पसरलं होत पण पाऊस रुसलेलाच होता... मात्र मुरुडमाती निसरडी करण्यात त्याने कसलीच कुचराई केली नव्हती... आमच्या सोबत काही पहिलटकर होते... त्यांच्यासाठी हा अनुभव जरा बेरकीच होता... त्यातील एक गलबत पायथ्याला असलेल्या मंदिरातच विसावलं... ओळख परेड घेऊन आम्ही पुढे निघालो... दुरून दिसणारा एक धबधबा आम्हाला आकर्षित करत होता... साधारण ७.३० च्या सुमारास पुर्वेच्या देवाचा तिरपा कटाक्ष आणि धबधब्याच्या मैत्रीमुळे आम्हाला इंद्रधनुष्याचं दर्शन झालं... प्रथमच इतक्या जवळून इंद्रधनुष्य पहाण्याची संधी मिळाल्यामुळे सगळे त्याला कॅमेर्‍यात टिपण्यात गुंतले...
KGD1 030.jpgKGD1 024.jpg
साधारण १ तासाच्या चढाई नंतर पहिल पठार लागलं... तिथे ईडली-चटणी आणि राजगिर्‍याचे लाडू असा बेत आसमंतने योजिला होता... तेथून पुढे लोखंडी शिड्यांचा चढ चढायला सुरवात केली... प्रथम दर्शनी सोपा वाटणारा ट्रेक अचानक कठीण झाल्यामुळे नवोदितांचे थरथरणारे पाय लटपटू लागले... पायर्‍यांचा पहिला टप्पा पार केल्यावर एका टेकडीवर विसावा घेतला... समोरचा परिसर आणि उनपावसाच्या खेळाने मनाचा ताबा कधी घेतला हे कळलेच नाही... काय वर्णन करावे त्या नजार्‍याचे... हिरवा निसर्ग हा भवतीने... अह्हा... केवळ अप्रतिम
KGD1 035.jpgKGD1 039.jpg
KGD1 044.jpg
KGD1 055.jpg
शिडी आणि पायर्‍यांचा अखेरच्या टप्प्याला आम्ही सुरवात केली... मनात म्हंटले चला हा टप्पा पार केला की सुटलो या तंगतोडीतून... पण तसे होणे नव्हते... पुढे धुक्यामुळे कळसुबाईच शिखर काही केल्या नजरेत येत नव्हतं... पायर्‍यां मागे टाकून अर्धा तास झाला तरी शिखराकडची पायपीट काही संपत नव्हती... खालच्या बाजूने कड्यावर येणारा आडवा पाऊस आणि थंडगार वारा अंगात हुडहूडी भरवत होता... पुढे गेलेल्या ग्रुप लिडरने पोहचल्याची इशारत केली तेव्हा आम्हाला हायसे वाटले... तब्बल ३.३० तासात केलेल्या चढाई नंतर शेवटी कळसूबाईच्या दर्शनाचा योग आला... शिखरावर २ - ३ गुंटे जागेत मातेने आपले वास्तव्य वसविले आहे... वर निवार्‍याची जागा मुळीच नसल्याने मी मंदिराच्या भिंतीचा आडोसा घेतला... बेफाम पाउस-वारा आम्हाला तेथे उभ राहू देत नव्हता...
KGD1 050.jpgKGD1 049.jpg
अर्धा अधिक जणांची चढाई बाकी होती... आम्ही ग्रुप लिडरला पटवून खाली उतरण्यास सुरवात केली... आता तर खरी धमाल येणार होती... निसरड्या वाटेवरून न घसरता चालणे म्हणजे तारे वरची कसरत... खाली येताना पहिला पडाव विहिरी जवळ घेतला... थोड खाली येऊन शेवटच्या पठारावर... थालिपिठ, लिंबाच लोणचं, दोन चपाती आणि श्रीखंड असा 'कॅलरीज् गेन'चा कार्यक्रम पार पाडला...

भरल्या पोटी खाली उतरण्यास सुरवात केली... पायथ्याला थांबलेल्या गलबताला घेऊन आम्ही गाडीकडे निघालो... वाटेत आडव्या येणार्‍या ओढ्यात श्रमपरिहार करून भंडारदरा आणि रंधा फॉल बघण्यास निघालो... मात्र तेथे निराशच झाली..
.KGD1 002.jpgKGD1 010.jpg

No comments:

Post a Comment