Friday, July 29, 2022

Zozila

गेल्या वर्षी ३० जुलैला कारगिल ते श्रीनगर या परतीच्या प्रवासातला हा अनुभव...


गुरुवारी लेह वरून निघून रात्री कारगिल मुक्कामी पोहचलो होतो. वाटेत काही ठिकाणी पावसामुळे डोंगर खचण्याचे प्रकार दिसले होते. रात्री जेवणं झाल्यावर हॉटेलचा मॅनेजर सांगू लागला की, "कल सुबह जल्दी निकलने से अच्छा है की, आराम से दोपहर का खाना खाके निकलना.." कारण शुक्रवारी सकाळी नऊ नंतर कारगिल - श्रीनगर रस्त्यावरचा 'झोझीला पास' देखभाली करता बंद असतो. खरंतर आम्हाला 'कारगिल वॉर मेमोरियल' बघून सकाळी नऊच्या आधी झोझीला पार करुन सोनमर्ग गाठायच होतं.. पण वॉर मेमोरियल बघून झोझीला चेकपोस्टवर पोहचायला फक्त पाचच मिनिटं उशीर झाला.. नी आम्ही अडकलो.. "शाम को चार बजे के बाद पास खुलेगा" असं चेक पोस्ट वरच्या सैनिकाने सुनवलं..


गाडीच्या बाहेर जास्त वेळ भटकणे शक्य नव्हतं.. कारण थाजीवस ग्लेशियर वरुन येणारे बोचरे वारे आणि त्यात पावसाची रिपरिप.. नशिबाला दोष देत तिथेच सात तास गाडीत बसून वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.. अश्या जागी अडकलो होतो जिथे खाण्यापिण्यासाठी केवळ एकच टपरी आणि त्यातही फक्त मॅगी मिळत होती. दुपारी एक वाजेपर्यंत आमच्या मागे एक किलोमीटर पर्यंत गाड्यांची रांग लागलेली दिसत होती. शहरातून आलेले बाईक रायडर इथेही आपल्या बेशिस्तीच प्रदर्शन करत होते. त्यांच्यामुळे सामान वाहून नेणाऱ्या आर्मीच्या गाड्यांची पंचाईत होत होती. साधारण दिडच्या सुमारास ड्राइवर लोकांची चुळबुळ सुरु झाली आणि बघता बघता CO2 छाप मागे सोडत सगळे झोझीलाच्या रस्त्याला लागले.


घाटात पोहचे पर्यंत पावसाचा जोर वाढला होता. रस्त्याच्या डाव्या बाजूची 'बाताल'ची दरी धुक्यात विरून गेली होती आणि उजव्या बाजूला अंगावर कोसळण्याच्या पवित्र्यात उभे असलेले डोंगरांचे ठिसूळ कडे बघून मनात धडकी भरत होती. गाडी समोरील पाच फुटा पुढचं काहीच दिसत नव्हतं. केवळ पुढच्या गाडीच्या टेल लाईटच्या भरवश्यावर आमचा सारथी गाडी हाकत होता. बराच वेळ झाला पण समोरुन एकही गाडी येताना दिसत नव्हती. एव्हाना आम्ही हनुमान चालीसा सुरु केली होती.. आणि अचानक पुढच्या गाड्या मागे फिरू लागल्या.. आमच्या ड्राइवरने ही त्वरित U turn घेतला. ज्याची भीती होती तीच खरी ठरली.. त्या अरुंद घाटात मध्यावर असताना पावसामुळे भूस्खलन सुरु झालं होतं. उजवीकडच्या डोंगरातून सुटलेले छोटेमोठे दगड वायू वेगाने आमच्या डोक्यावरुन डावीकडल्या दरीत झेपावत होते. तिथे थांबणे म्हणजे जीवाशी खेळ होता. लगेच मागे फिरलो, पण समोर शंभर एक फुटांवरुन खाली सरकत येणारा दगडमातीचा थर दिसला आणि ब्रह्मांडच आठवलं.. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.. ड्राइवरने त्यातल्या त्यात एका सुरक्षीत वळणावर दरीच्या बाजूला गाडी उभी केली आणि आम्ही खाली उतरलो. घाबरलेले पर्यटक एकमेकाला धीर देत देवाचा धावा करत होते. 


या वाईट परिस्थिती शेवटी धावून आली ती ड्राइवर मंडळीच. तिथे अडकलेल्या त्या शेकडो गाड्यांमधले सगळे ड्राइवर एकत्र आले आणि रस्त्यावर आलेला राडारोडा हटवायला लागले.. पर्यटकांपैकी काही जण मदतीला गेले.. पण त्यांनी "ये आपका काम नही.. यहा का मौसम खराब है" असं दरडावत गाडीत बसायला लावलं. कोणत्याही परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षीततेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या मानसिकतेला खरंच सलाम!


थोड्याच वेळात धोपटून सरळ केलेल्या त्या रस्त्यावरुन दोन रिकाम्या सुमो गाड्या वाट काढत पुढे जाऊ लागल्या, पण भुसभुशीत मातीत त्यांची चाकं गरागरा फिरुन त्या तिथेच अडकत होत्या. त्यातच पाऊस वाढल्याने परत एकदा वरुन आणखी राडारोडा रस्त्यावर आला. नशीबाची परिक्षा बघणारा काळच जणू.. कठीण परिस्थितीशी दोन हात करत राहणं हा मानवी स्वभाव इथे ही दिसून आला. जवळच्याच एका गाडीतून दोरखंड आणले गेले आणि परत एकदा सगळ्यांनी जोर लावून अडकलेल्या त्या दोन सुमो गाड्यांची सुटका केली. चिखलात उमटलेल्या सुमोच्या पाउलांवर पाऊल ठेवत बाकीच्या गाड्या दरीच्या बाजूने हिंदकाळत हळू हळू पुढे सरकू लागल्या. तो टप्पा गाडीत बसून पार करायचा आमचा काही धीर झाला नाही. आम्ही चालत उड्या टाकत त्या घसाऱ्या वरुन पुढे आलो. तेव्हढ्यात डोक्यावरुन एक दगड दरीत कोसळताना बघितला आणि जिवाचं पाणीपाणी झालं. या सगळ्या धावपळीत पुढे गेलेल्या मित्राचा मोबाईल आणि पाकीट खिशातून पडलेलं सापडलं, ते उचलून तसेच पळत सुटलो.. पुढे दोन तीन ठिकाणी आणखी काही दरडी कोसळल्या होत्या. मागचा अनुभव लक्षात घेता ते ही टप्पे देवाचा धावा करत चालतच पार केले.



घाटाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो आणि जीवात जीव आला. खाली 'बताल'ला 'अमरनाथ'चा बेस कॅम्प दिसू लागला आणि हायसे वाटले. सुटलो बुवा म्हणतोय तोवर पुढे दोनतीन किलोमीटर लांबवर गाड्यांची रांग दिसू लागली. इतक्या सगळ्या दिव्यातून बाहेर पडतोय तर पुढे अजून एक नविन समस्या उभी ठाकलेली.. 


एकीकडे थाजीवास ग्लेशियरला समांतर जाणारी मावळतीची सुर्य किरणे तर खाली झोझीलाच्या पायथ्याला असलेल्या स्थानिक गावकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन.. Army सोबत झालेल्या वादामुळे NH -1वर अख्खं गाव गोळा झालेलं. आधी आर्मीच्या जवानाने माफी मागावी तरच आम्ही राष्ट्रीय महामार्ग मोकळा करु अशी अट घातलेली. पर्यटकांमधे लहान मुलं, महिला आणि वयस्कर लोकंही होती. पर्यटकांचे जे दिवसभर हाल झालेले त्याच्याशी आंदोलन कर्त्यांना काहीच घेणंदेणं नव्हतं. त्यांनी मात्र अपमानाच्या बदल्यात थकलेल्या पर्यटकांना वेठीस धरलं होतं.    



चेकपोस्ट वरिल पाच तास प्रतीक्षा, पुढे घाटातला दोन तासांचा चित्तथरारक अनुभव आणि आता हे दोन तासांपासून सुरु असलेलं आंदोलन संपायची वाट बघणं.. इतके विचित्र आणि विक्षिप्त अनुभव आजपर्यंत कोणत्याच प्रवासात आले नव्हते. सकाळी सातला हॉटेल वरुन निघालेलो आम्ही संध्याकाळचे सात वाजत आले तरी अर्धा रस्त्यात पण पोहचलो नव्हतो. परिस्थिती पुढे सगळे हतबल झालो होतो. शेवटी Armyच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी येऊन तो तंटा मिटवला आणि आम्ही श्रीनगर कडे मार्गस्थ झालो. 


घाटात कसोटीच्या क्षणी पर्यटकांची काळजी घेणारी ड्राइवर मंडळी आणि आंदोलन करुन पर्यटकांना वेठीस धरणारे स्थानिक गावाकरी.. सगळे एकाच प्रदेशातली, एकच भाषा बोलणारी.. मात्र व्यवसायातील फरकामुळे दोघांच्या मानसिकतेतील तफावत प्रकर्षाने दिसून आली.

Saturday, May 14, 2022

‘हर की पौड़ी’

Blue Poppy,  घांगरिया, गोविंदघाट, चामोली,  तयाल,  जॉलीग्रॅन्ट अशी बरिच नानाविध नावं.. कधीही न ऐकलेली..  मेंंदूच्या कप्प्यात साठून राहिलेली.. फुलों की घाटी, हेमकुंड साहिब, जोशीमठ, रुद्रप्रयाग... आणि जाग आली.  खर तर जाग आली ती जिम कॉर्बेटच्या पुस्तकातला रुद्रप्रयागचा नरभक्षक आठवल्याने... घड्याळात बघितलं तर साडे तीन वाजलेले... म्हंटलं सकाळी नऊची फ्लाईट आहे तर इतक्या लवकर उठून फायदा नाही. पण उस्तुकेपोटी झोप लागेल तर ना.. दोन वर्षांपासून व्हॅलीचा प्लॅन ठरत होता.. हिमालयातील टूर म्हंटली की सगळे जण मनाने केव्हाचेच तिकडे पोहचलेले असतात.. पण तो योग जुळून यायला नशिबासोबत मित्रांचीही साथ आवश्यक असते... आणि मग जी काय धमाल,  मस्ती होते त्याला तोड नाही. 


उत्तराखंडच्या दुर्गम वाटांवरुन फिरताना तिथल्या अलौकीक नजार्‍यांची चैन अनुभवत.. कधी पक्षांच्या जुगलबंदीचा स्वर कानात साठवत.. तर कधी शेजारच्या दरीत कोसळणार्‍या धबधब्याचा नाद ऐकत..  सामान वाहणार्‍या खेचरांच्या टापांच्या आवाजात मिसळलेले त्यांच्या मालकांचे कुकारे ऐकत.. गावकर्यांचे किस्से.. गाईड लोकांच्या गप्पा.. मजल दरमजल करत.. प्रत्येकाची वे़ळ सांभाळत इच्छित स्थळी पोहचण्यात दमछाक होते.. पण या अनुभुतीची मजा काही औरच!   


सगळं आवरुन विमानतळ गाठलं.. मुंबईच्या वेगवेगळ्या टोकांवरुन आलेले टुरचे साथीदार एव्हाना हजर झाले होते. साधारण चार तासांचा प्रवास करुन देहरादुनच्या जॉलीग्रॅन्ट Airportवर उतरलो. तीन टॅक्सींची जमवाजमव करुन आम्ही आठ जणांनी हरिद्वार कडे प्रस्थान केले. जुलैचा महिना असल्याने हवेत दमटपणा आणि आकाश ढगाळ होते.. थोडा अपेक्षाभंगच झाला.. देहरादून पेक्षा मुंबई बरी असं मनाला वाटून गेलं. पहिल्या दिवसाचा मुक्काम हरिद्वार मधल्या 'तयाल' धर्मशा़ळेत होता.. धर्मशाळेतला मुक्काम म्हंटल्यावर थोडी धाकधुकं होती.. पण अगदी चकाचक AC Roomची व्यवस्था असलेली धर्मशाळा बघुन आश्चर्याचा धक्काच बसला.


संध्याकाळी गंगाआरती साठी ‘हर की पौड़ी’ला निघालो. घाटावर आधी पासूनच भाविकांची लगबग दिसून आली. प्रत्येकजण सोईची जागा पकडण्यात व्यस्त होता.. गंगाआरतीचा चांगला नजारा कुठून मिळेल या शोधात फिरत असताना अचानक एका हवालदाराने हात पकडून खाली बसवलं.. "यहा से फोटो निकालना..  और मेरा भी फोटो निकालना"  म्हणत काठी आपटत पुढे बसलेल्या गर्दीत जाऊन उभा राहिला.. 


या जागेचे पौराणिक महत्व असे की, समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अमृत कलशातील काही थेंब ब्रह्मकुण्ड येथे सांडले.. म्हणून या जागेला  'हर की पौडी' म्हणजेच "हरि यानी नारायण के चरण" म्हणतात.  बरेच श्रध्दाळू लोकं इथे गंगास्नानच पुण्य गोळा करताना दिसतात.  आम्ही उभे असलेल्या बिर्ला घाट आणि ब्रह्मकुण्ड घाटाच्या मधून गंगेचा एकसंध प्रवाह वाहत होता.. घाटावरच्या देवळांच्या साथीने संधीप्रकाशात वाहणारी ती धार्मिक गंगा.. हजारो दिव्यांच्या प्रकाशात लुकलुकणारी केशरी गंगा..  

देवप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनीची भेट घडवणारी पौराणीक गंगा..  ऋषिकेशला वळसा घालून हरिद्वारच्या मैदानातून वाहणारी सात्विक गंगा..  एव्हाना समोरील मंदिरातून एकच घंटानाद सुरु झालेला..  पुजारी वृंदाच्या हातातील आरत्या झगमगू लागलेल्या.. उपस्थीत जनसमुदाय एकाच मंत्रघोषात तल्लिन झालेला..  अन दोन्ही कर आपसूक जोडले गेले.


हर हर गंगे, जय माँ गंगे |

ॐ जय गंगे माता, श्री जय गंगे माता ।

जो नर तुझको ध्याता, जो नर तुझको ध्याता,

मनवांछित फल पाता | ॐ जय गंगे माता….




Wednesday, July 3, 2019

अल्केझॅण्ड्रा - रामबाग

पाऊस सुरु झाला की आधी बेडकं बाहेर पडतात आणि मग ट्रेकर्स.. गेल्या चार महिन्यांचा ट्रेक विराम संपवण्यासाठी पावसाळ्या शिवाय चांगली संधी नव्हती... भल्या पहाटे यो आणि रोमाच्या सोबतीने गिरीच्या होंडासिटीतून कर्जत कडे रवाना झालो.


पुण्या वरुन आलेल्या सुन्याला चौक फाट्या वर पिक करुन बोरगाव कडे निघालो. चौकातल्या हॉटेल पुर्वा समोर ओसंडून वाहणारी पावसाळी गर्दी पाहून मनात काळजी दाटून आली. जस जसं पुढे गावाकडे जाऊ लागलो तसं सेल्फी ट्रेकर्सचे जथ्थे वाढू लागले..  मनातल्या काळजीच रुपांतर चिंतेत होऊ लागलं.  ही सगळी जत्रा माथेरान वर जाणार म्हणजे वाटेतल्या निसर्गाचे काय हाल होणार या विचाराने मन विषण्ण झालं. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आमच्या वाटेला ईतर जनता येण्याचं कारणंच नव्हतं.. ती सगळी सेल्फीची दिंडी वन ट्री पॉईन्टच्या वाटेने निघाली होती.


पोखर गावातल्या शाळे शेजारी गिरीची गाडी उभी करुन..  आम्ही कूच केली ती खाटवण गावाच्या दिशेने.. वाटेतला ओढा ओलांडून समोरच्या टेकाडावर पोहचताच "पेरते व्हा.. पेरते व्हा.." कोकलणार्‍या पावश्याने दर्शन दिले.  मागे वळून पाहिलं तर मोरबे धरणाने गाठलेला तळ दिसत होता. नवी मुंबईचा हा पाणीवाला यंदाच्या रोडावलेल्या पावसाळ्या मुळे खूपच आटला होता. पाऊस पाण्याची चिंता वाहत पुढे निघालो.. वारा पडला होता त्यामुळे पहिल्याच टप्प्यात सगळे घामाघूम झालो. पावसाची एक दमदार सर येऊन गेली. उजविकडे धुक्याच्या पडद्यात गुरफटलेला सोंडाई किल्ला आपली ओळख सांगू लागला..  ट्रेक दरम्यान चालणारा हा निसर्गाचा खेळ मोबाईल मधे कैद करत, रमत गमत निघालो ते खाटवणच्या दिशेने...






आजची मोहीम होती माथेरानच्या अल्केझॅण्ड्रा पॉईन्ट वरुन चढाई आणि त्याच अल्केझॅण्ड्रा पॉईन्टच्या डाव्या बगलेतून उतरणार्‍या रामबाग पॉईन्टने उतराई.. गार्बेट पॉईन्टच्या समोरील सोंडेवर असलेल्या या अल्केझॅण्ड्रा पॉईन्टची चढाई एकदम अंगावर येणारी..  पायथ्याला विस एक घरांच खाटवण नावाच टुमदार गाव.. बांधावरच्या चिखलातली वाट तुडवत पायथ्याच्या गावा पर्यंत पोहचायला आम्हाला तासाभराची पायपीट करावी लागली..  गावाच्या समोरुनच सोंडेवरची खडी चढाई सुरु होते.  सोंडेच्या मधल्या टप्प्यात एक दोन पठार आहेत.. तिथल्या कोवळ्या गवतावर गावातल्या गाईंनी मनसोक्त ताव मारला होता. पठारावर वाढलेल्या झुडपांवर कोषाचे किडे आपलं पान कुरतडण्याच काम मन लावून करत होते..  रानातल्या माश्या पावसाला कंटाळून आमच्या छत्री मधे घुसु पहात होत्या..  एकंदर पावसाळी ट्रेकचा माहोल जमून आला होता.








सोंडेच्या वरच्या टप्प्यातून खाली शेतांच्या चौकटीत वसलेली कौलारू घरे लक्ष वेधून घेत होती.  शेवटच्या टप्प्यात चढाईचा कस लागत होता. पडझड झालेली कातळातली वाट दम काढत होती. शेवटच्या पायर्‍यां चढून अल्केझॅण्ड्रा पॉईन्ट वर पोहचलो तर स्वागताला चहा वाला हजर.. त्याच्याकडील आलं घातलेला वाफाळता चहा घेतला. दुपारच्या जेवणाची विचारणा केली. जवळच असलेल्या चहावाल्याच्या घरात झुणका भाकरीची सोय झाली.. बाहेर अखंड कोसळणार्‍या पावसाने आणि गार वार्‍याने हुडहूडी भरली होती. अश्या कुंद वातावरणात भोसले मामांच्या घरातील धगधगत्या चुली शेजारी बसून खालेल्ली झुणका भाकरीची गोडी काय वर्णावी.. मनोमन त्या अन्नपुर्णेचे आभार मानले..



पोटपुजा आटोपून रामबाग पॉईंटच्या दिशेने निघालो. ही वाट दगडाने पक्की बांधलेली आहे, त्यामुळे उतरताना कुठेही कष्ट पडत नाहीत. खाली उतरताना पर्वत कस्तुर आणि नवरंग पक्षाची शिळ ऐकू येणे म्हणजे ट्रेक मधे श्रीखंड.. वाटेतले थंड पाण्याचे ओहोळ पार करत, रमतगमत पदरातून खाली उतरत दिड तासात पोखर गावात उतरलो..  सकाळाच्या गर्दीचा आता थांगपत्ताही नव्हता.. जवळच वाहणार्‍या नदीत कावळ्याची आंघोळ आटोपली. पुढे पळस्पे फाट्यावर दत्त सॅन्क्सचा गरमागरम वडा आणि वाफाळता चहा घेऊन पावसाळी भटकंतीचा श्रमपरिहार केला.




रविवारची क्रिकेट वर्ल्डकपची भारतXइंग्लंडची मॅच बघायची सोडून.. या भटकंतीने काय दिले?.... जंगलातील तंगडतोंड, धबधब्यांचे फेसाळणे, ढगांचा मफलर गुंडाळून बसलेल्या डोंगरांचे नजारे , प्राण्यांचा-पक्षांचा सहवास, आयत्या वेळी आपुलकीने खाऊ घातलेली भाकर.. आणि हे सगळ अनुभवायला जिवलग मित्रांची धम्माल साथ!!! 


      

Monday, November 13, 2017

दांडेली



मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास चौथ्या सवंगड्याला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभराचे श्रम आणि त्यात नाईट ड्रायव्हिंग झाल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधराची जबाबदारी विनयवर सोपवली आणि मागच्या सीटवर विराजमान होताच हेडरेस्ट वर मान टाकली.. 

एव्हाना प्लेअरवर लागलेल्या गझलनी मनाचा ताबा घ्यायला सुरवात केलेली. हायवेवरचा गार वारा आणि कानात घुटमळणारे गुलजारचे शब्द!!! .. मन अलगद रातराणीच्या सुगंधा मागे तरंगत जाऊ लागले. अश्या निवांत क्षणी वृक्षराजीन डवरलेलं निबीड अरण्यं मनाला खुणावू लागलं.. कैलासपतीच्या अंगाभवती फेर धरलेली वेलबुट्टी बघून मन वेडावून गेलं. पहाटेच्या मंगल समई वृक्षवेलींचा अडथळा पार करत जमिनीशी सलगी करणारी कोवळी किरणे रोमांचीत करू लागली. झर्‍याच्या तालावरची पक्षांची भुपाळी वेड लावू लागली. मधेच त्यांच्या किलबिलाटाला pause लावणारा हुप्प्यांचा धीरगंभीर हुंकार... आणि अचानक पसरलेली शांतता.. अश्याच एका अनभिज्ञ क्षणी एखादं जंगली श्वापद हुल देऊन शेजारून निसटून गेलेलं.. त्या गुढरम्य वातावरणाने अंग शहारुन गेलेलं... जंगलातील ती निरामय शांतता मनात उतरत गेलेली आणि अश्या निवांत क्षणी वाटेत पसरलेल्या फांद्यानी वाट अडवून टोल मागावा... हो टोल.. शेवटी टोल नाक्याने त्या गुढरम्य स्वप्नाची तंद्री भंग पावली.


पहाटेच्या गार वार्‍यात अचानक Jungle Foxच्या टोळीच दर्शन झालं. गाडीला ब्रेक लागताच सावध झालेली ती टोळी नुकतीच केलेली शिकार तोंडात दाबून जंगलात पसार झाली. अंगमोडत गाडीतून पायउतार झालो. पहाटेच्या दवात न्हाहलेल्या गवताच्या कुंद दरवळाने शरिरातील सगळ्या संवेदना जागृत झाल्या. उगवतीला केशरी पडद्याच्या पार्श्वभुमीवर आळसावलेल्या डोंगरदर्‍यांची महिरप मोठी विलोभनीय दिसत होती. मधूनच एकाद पाखरू आकाशात भरारी घेऊन त्या अलौकीक सौर्दंयाला तीट लावण्याच कार्य पार पाडत होतं. त्या चैतन्यमय वातावरणाने रात्रीच्या प्रवासाचा शिणवटा कुठल्या कुठे निघून गेला होता.
काळू नदीचा वरदहस्त लाभलेलं दांडेली हे कर्नाटकच्या उत्तर सीमे वरील घनदाट अरणय! समुद्र सपाटी पासून ४७३ मिटर उंचीवर असलेल्या या सदाहरित जंगलात आढळणारा Black Panthers हे या जंगलाच प्रमुख आकर्षण!!! निसर्गाने दांडेलीवर जैवविविधतेची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. वृक्षवल्ली व्यतिरिक्त पक्षांच्या ३०० हून अधिक जातींची इथे नोंद झालेली आहे. नोव्हेंबरचा गारठा वाढू लागला की उत्तरे कडील पक्षी स्थलांतर करुन दक्षिण भारतात येतात. समुद्र सपाटी कडून येणार्‍या दमट वार्‍यांमुळे पश्चिमघाटातील हिवाळा उत्तरे पेक्षा सुसह्य असतो. त्यामुळे बहुतेक स्थलांतरीत पक्षी प्रजननासाठी पश्चिमघाटातील दांडेलीचा आश्रय निवडतात. हा काळ पक्षीप्रेमीं साठी मोठी पर्वणीच असते.




सकाळच्या दाट धुक्यातून वाट काढत दांडेलीतील टिंबर डेपो कडे निघालो. वाटेत एका बांधावर झुपकेदार रानकोंबडा (Junglefowl) दिसला. गाडी थांबवून कॅमेरा सेट करे पर्यंत तो ही झुडपात गुडूप झाला. एव्हाना सुर्य बराच वर आला होता. टिंबर डेपोच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला ऐनाच्या झाडांनी कमानी उभारल्या होत्या. नऊ वाजत आले तरी गेट बंदच होते. चोर दिंडीतून आत शिरताच Indian giant squirrelने आमचे स्वागत केले. भिमाशंकरच्या डोंगर- दर्‍यात आढळणारा लाजरा-बुजरा 'शेकरु' आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी इथे मात्र बिनधास्त वावरत होता.

शेकरु


आमच्या आधीच एक ग्रुप इथे पक्षी निरिक्षणासाठी पोहचला होता. पक्षांपेक्षा त्यांचाच किलबिलाट जास्त होता.. म्हणुन आम्ही थोडं आडरानात शिरलो... दांडेलीच्या परिसरात रक्तरोहीडा आणि नवलीची बरिच झाडे आहेत. नव्वदच्या दशकात दांडेली हे रोहिडाच्या लाकडाचा लिलाव करणारं आशियातील अग्रेसर ठिकाण होतं. १९९५ नंतर Jungle lodgesच्या स्थापने नंतर इथला plywood factory बंद झाल्या. २००९ मधे वनखात्याने स्थानिकांच्या मदतीने 'Hornbills trail' आयोजीत करुन Hornbillच्या संवर्धनासाठी विशेष पाऊलं उचलून इथल्या पक्षांना अभयदान दिलं..

दांडेलीच्या या सरंक्षित परिसरात पक्षांप्रमाणेच प्राण्यांचा ही वावर वाढला आहे. टिंबर मार्टच्या पहिल्या फेरीत धनेश, कोतवाल, पावशा, भृंगराज, काळ्या डोक्याचा कुहुआ, तपकिरी डोक्याचा तांबट, लाल निखार, सुभग, तोईपोपट यांनी दर्शन देऊन आम्हाला उपकृत केलं.
भृंगराज (Racket Tailed Drongo)
मलबार धनेश (Malabar Pied Hornbill)


पावशा (Common Hawk Cuckoo)
काळ्या डोक्याचा कुहुआ (Black-Headed  Cuckooshrike)

 तपकिरी डोक्याचा तांबट (Brown Headed Barbet)


लाल निखार (Scarlet Minivet - Male)
सुभग (Common Iora)COMMON IORA)


कोतवाल (Drongo)


तोईपोपट (Plum Headed Parakeet - Male)


मलबारी कर्णा (Malabar Trogan)


सर्पगरुड (Sulawesi Serpent-Eagle)


सुर्य बराच वर आला होता. मुक्कामाच्या ठिकाणी परतत असताना आसमंतात सर्पगरुडाचा कॉल ऐकू येत होता. गाडी थांबवून कॉलच्या दिशेने कॅमेरे रोखले आणि त्या राजबिंड पक्षाचं रुप कॅमेर्‍यात कैद केलं. तिथून पुढे निघतो तर Malabar Troganची जोडी विनायकला दिसली... पण कॅमेर्‍या सरसावण्यापुर्वीच ते जंगलात पसार झाले. अश्या प्रकारे आमच्या पक्षी निरिक्षणाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला होता..




मुक्कामाची सोय गणेशगुडीतील Old Magazine House मधे होती... OMHच तसं साधारण गेस्टहाऊस असल्याने इथे सामान्य पर्यटकांची गर्दी नसते.. पण या गेस्टहाऊने पक्ष्यांसाठी केलेली पाणपोईची सोय हा एक विलक्षण अनुभव आहे. हिरव्याकंच गर्द झाडीच्या समोर पक्षांसाठी ठराविक अंतरांवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवलं होतं... आणि त्यांना त्यात जलक्रीडा करता यावी म्हणून त्या भांड्यां शेजारी झाडांच्या फांद्याची खास रचना केली होती. त्या जागे पासून दहा एक फुटां वर हिरवी जाळी बांधून आडोसा पक्षी निरिक्षकांसाठी आडोसा तयार केला होता.
दुपार नंतर या पाणपोईवर विविध पक्षांची परेड सुरु होते... पोटभर जेवण झाल्याने अमंळ सुस्ती चढली होती. तेव्हढ्यात Blue Capped Rock Thrush हजेरी लावली. सगळे जण कॅमेरे सरसावून बसले.. आणि त्या नंतर काळोख होई पर्यंत अखंड क्लिकक्लिकाट सुरू राहिला. Blue Cappedच्या सलामी नंतर Asian Brown Flycatcherच्या जोडीचे आगमन झाले.. मागोमाग Tickell's Blue Flycatcher, Indian Paradise Flycatcher, Black Naped Monarch, Rusty Tailed Flycatcher, Oriental White Eye, Yellow Browed Bulbul, Oriental Magpie Robin, Verditer Flycatcher, Emerald Pigeon, Flame Throated Bulbul, White Rumped Munia, Puff Throated Babbler, Dark Fronted Babbler, Yellow Tit, White Bellied Blue Flycatcher, Orange Headed Thrush इत्यादी पक्षी या परेड मधे सामिल झाले.

निळ्या डोक्याचा कस्तूर (Blue Capped Rock Thrush)

तपकिरी लिटकुरी (Asian Brown Flycatcher)

(तांबुला (Red-breasted Flycatcher)

चश्मेवाला (Oriental White Eye)





पिवळ्या भुवईचा बुलबुल (Yellow Browed Bulbul)




दयाळ (Oriental Magpie Robin)



निलीमा (Tickell's Blue Flycatcher)



स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher - Male)




स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher - Female)

नीलांग (Verditer Flycatcher)

पाचू कवडा (Emerald Dove) 

लालकंठी बुलबुल (Flame Throated Bulbul)

नीलमणी (Black Naped Monarch - Male)

काळ्या डोक्याचा सातभाई (Dark Fronted Babbler)





ठिपकेवाला पहाडी सातभाई (Puff Throated Babbler)

पिवळा बल्गुली (Indian Yellow Tit)



पांढर्‍या पोटाचा निळा माशिमार (White Bellied Blue Flycatcher)






संध्याकाळी गारठा वाढू लागताच गेस्ट हाऊस तर्फे गरमागरम सुपची सोय करण्यात आली. सुप सोबत आजच्या दिवसा लेखाजोखा इतरां सोबत शेअर करण्यात आला.. बरेच दर्दी आणि हौशी पक्षी निरिक्षक दोन-तीन दिवसां पासून इथे मुक्कामी होते.. त्यांच्या कडून सकाळच्या सत्रा बद्दलची माहिती घेतली आणि सामिष भोजना वर ताव मारुन ढाराढूर झालो.
सकाळी लवकर जाग आली ती जंगलातील कॉलने.. बाहेर सर्वत्र धुक्याच साम्राज्य पसरलेलं होतं. मनाशी म्हणाले, हाय रे देवा.. हे धुकं असच राहिलं तर पहाटेची पक्षांची लगबग कॅमेर्‍यात टिपण मुश्किल होईल...
सातच्या सुमारास आमची टोळी गेस्टहाऊस पासून अर्धा किलोमिटर वरिल एका झाडापाशी येऊन पोहचली.. त्या झाडाला लहान पिवळसर फळांचा बहर आलेला होता.. आणि तो बहर आपआपल्या चोचीत टिपण्यासाठी वेगवेगळ्या पक्षां मधे स्पर्धा रंगली होती.
धुक्याचा पडदा विरळ होताच आम्हाला Asian Fairy Bluebirdने दर्शन दिले.. झाडाच्या वरच्या टप्प्यात Pompadour Green Pigeonची शाळा भरली होती. त्यांची शाळा सुटताच Common Hill Mynaने त्या fruiting treeचा ताबा घेतला. त्यांच्या मागोमाग Golden Oriole, White Cheeked Barbet, Malabar Barbet, Flame Throated Bulbul, Yellow Browed Bulbul, Orange Headed Thrush, Green Bee Eater या असामींनी तिथे हजेरी लावली.

नीलपरी (Asian Fairy Bluebird)





हळद्या, आम्रपक्षी (Golden Oriole)




 हळद्या (Indian Golden Oriole - Female)



कुर्टुक (White Cheeked Barbet)



हरोळी (Pompadour Green Pigeon)



लालकंठी बुलबुल (Flame Throated Bulbul)

रानकस्तूर (Orange Headed Thrush)




पिवळ्या भुवईचा बुलबुल (Yellow Browed Bulbul)

मलबार तांबट (Malabar Barbet)


डोंगरी मैना (Common Hill Myna)




वेडा राघू (Green Bee Eater)

कापशी घार (Black Shouldered Kite)

 



checkoutची वेळ झाली होती म्हणून जड अंतकरणाने तिथुन निघालो.. चारही बाजुने जंगलाने वेढलेलं गेस्ट हाऊस आणि त्याला झुळझुळ झर्‍याची साथ... तिथल्या वाढप्या पासुन सगळ्यांनाच असलेली निसर्गाची ओढ ही सगळी शिदोरी घेऊन आम्ही तिथून निघालो. आठवण म्हणुन OMHच्या गेटवर विनयचा फोटो काढत असताना काही फुटांवरुन झर्‍यावर पाणी पियायला आलेला Wild boar खुसपुस करत जंगलात पळून गेला.

दांडेलीतील दोन दिवसाच्या मुक्कामाने मन अगदी तृप्त झाले होते. गाडीत मागच्या सीटवर बसून आदल्या रात्री पाहिलेले स्वप्न काही अंशी सत्यात उतरतानाची अनुभूती येत होती. मात्र सध्या सुरु असलेली निसर्गाची कत्तल बघता अशी हिरवी स्वप्न केवळ स्वप्नच राहितील की काय, अशी भिती वाटते. निसर्ग जोपासण्यापेक्षा तो ओरबाडण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही वृत्ती केवळ निसर्गालाच नव्हे तर निसर्गाचाच एक भाग असलेल्या मनुष्याला देखिल संपवून टाकेल यात शंकाच नाही.