Tuesday, September 29, 2015

कारवी महोत्सव

यंदाच्या गणपतीत अंबोली मार्गे मालवणात जाणे झाले. दर सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी या वर्षी अंबोलीत फुललेली दिसली. काही ठिकाणी फक्त टोपलीच होती तर, काही ठिकाणी पुर्ण बहरलेली कारवी दिसली. या आधी २००७ मधे रतगडावर फुललेली कारवी बघितली होती. यंदा मात्र हा कारवी मोहत्सव कॅमेर्‍यात टिपण्याच भाग्य लाभलं.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२ सेल्फी विथ कारवी

Monday, August 3, 2015

रोहा भटकंती

यंदा पावसाने जुन मधे इंगा दाखवुन दिल्यावर पुढे अधिक मास पाळायचा निर्णय घेतला. पण त्यामुळे मान्सुन ट्रेकिंगचा माहोल सुरु होण्यास जुलै अखेर पर्यंत वाट पहावी लागली. जुलैच्या शेवटच्या विक-एन्डला पाऊस आपला बॅकलॉग भरुन काढण्याची चिन्ह दिसू लागली आणि भटकंतीचा माहोल तयार होऊ लागला. शुक्रवार सकाळ पासूनच व्हॉट्सअप ग्रुप वर भाराभर पोस्टींचा पाऊस पडू लागला आणि कोकणात ट्रेकला जाण्याचा प्लॅन डन झाला.
प्लॅन नुसार सगळे शनिवारी रात्री भांडुपला गिरिविहार कडे जमले. यो रॉक्स, नविन गिलबिले, जिप्सी आणि अस्मादिकास सोबत घेऊन गिरिविहारची होंडा सिटी रोह्याच्या दिशेने निघाली. हायवेवरचा रेनडान्स बघत इंदापुर मार्गे रात्री तिनच्या सुमारास तळा गावात पोहचलो. पहाट झाल्या खेरीज चढाई सुरु करता येणार नव्हती, त्यामुळे गाडीत बसल्या जागी डासांची करमणूक केली. पावसाच्या सरीत मिसळलेला रातकिड्यांचा आवाजाने आणि वार्‍यावर ताल धरलेल्या पानांच्या सळसळीने पहाटेच्या गोडव्यात रंगत आणली होती. कोंबड्याच्या बांगेने गावाला जाग येऊ लागली. आधी पोटोबा मग ट्रेकोबा या तत्वाला जागत आमची गाडी एस्टी स्टॅण्ड वर पोहचली. स्टॅण्ड वरिल बिन पावाची गरमागरम मिसळ ओरपून सातच्या सुमारास गड चढायला घेतला.
तळा गावचा रखवालदार म्हणजे 'तळगड'!!
कोकणातला गड असल्याने उंची फार नव्हती. डोंगराची धार, त्यावर माची आणि वर किल्लाचा पसारा अशी तीन टप्पातील चढाई नेत्रसुखद होती. माची वरुन पुढे जाताना वाटेतील भग्न दरवाजाच्या अलिकडे हनुमान आणि शरभ शिल्प दिसलं.
रात्रभर भुरभुरणार्‍या पावसाने दडी मारल्याने आता सेल्फी काढण्याला ऊत आला होता.
अर्धा तासात गडमाथा गाठला. गडाची तटबंदी अजुनही बर्‍या पैकी सुस्थितीत आहे. हिरव्यागार बुरुजा वरील ढाल-काढीचे निशाण चित्तवेधक होतं. गड माथ्यावर जवळजवळ सात पाण्याची टाकी आहेत. महादेवाची कोरिव पिंडी आहे. आदिलशाही कडून इ.स.१६४८ मधे महाराजांनी किल्ला तळगड जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात महाराजांनी जे १२ किल्ले स्वतः कडे राखले होते त्यात तळगडाचा समावेश होता.
तासाभरात गडफेरी उरकून आम्ही कुडा लेण्यांचा रस्ता धरला. वाटेत झालेल्या मुसळधार पावसाने गाडीला चांगला वॉश मिळाला खरा पण यो आणि नविनची पावसात भिजण्याची इच्छा अपुरीच राहिली.
तळगडाच्या पश्चिमेला तळा-खाजणी रस्त्या वर कुडा लेण्यांचा डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्या पर्यंत गाडी रस्ता आहे. पायथ्या पासुन दहा मिनिटांत लेण्यां पर्यंत पोहचता येते.
लेणी पाहून आम्ही रोहा-मुरुड सस्त्यावरिल खाजणीचा खाडी पुल ओलांडून घोसाळगडा कडे निघालो. गावातील गणपती मंदिरा मागून एक वाट थेट गडाकडे चढते. वाट साधी असली तरी हवेतील दमटपणा मुळे चांगलाच घामटा निघत होता. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या तटा जवळ पोहचलो.
तटाला रान वनस्पतींचा विळखा बसल्याने फार हानी झाली आहे. तटाखाली पाण्याच टाकं आहे, तर उजव्या बाजूला तटाखाली उतरण्यासाठी चोर दरवाजा आहे. चोर दरवाज्यात बसल्यावर त्या चौकटीतून येणार्‍या थंडगार वार्‍याने एकदम फ्रेश वाटलं. त्या अरुंद जागेत फार वेळ न घालवता आम्ही उत्तरेकडील माची कडे निघालो. माचीच्या शेवटाला बुरुज बांधून माची संरक्षित केलेली दिसते. येथून दिसणारा नजारा केवळ अवर्णनिय!!!.
गडाच्या दक्षिण टोकाला बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्या वर जाणारी वाट तटबंदी वरुन जाते. डावी कडे आणि उजविकडे पाण्याच टाकं आहे, तर समोरील पायर्‍यांंची वाट बालेकिल्ल्या कडे घेऊन जाते. ही झाडाझुडपान जाणारी वाट काही ठिकाणी दरड कोसळल्याने फारच अरुंद आणि धोकादायक झाली आहे. गडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या बुरुजावर गवतात पडलेली तोफ दिसते. ती तोफ म्हणजेच बालेकिल्ल्या वर जाण्यार्‍या वाटेची खूण आहे. वर जाणारी वाट खड्या चढणीची व पावसामुळे निसरडी झालेली आहे. त्यामुळे तिथेच काही क्षण आराम करण्यात धन्यता मानली.
तटबंदीच्या आधी उजव्या हाताला भवानी हौद लागतो. कातळात कोरलले खांब हे या हौदाच खास वैशिष्ठ्य आहे. डावी कडील टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. टाक्यातल्या थंडगार पाण्याने क्षुधा शांत करुन गड उतरायला लागलो. उतरताना वाटेत ब्लु मॉरमॉन चे दर्शन झाले. गड उतारावर आडव्या आलेल्या वडाच्या पारंब्यांवर झोके घेऊन टारझनगिरीची हौस भागवून घेतली.
गावात पोहचे पर्यंत पोटात आग लागली होती. त्वरीत रोह्या कडे मोर्चा वळवला. रोह्याच्या एस्टी स्टॅण्ड वर बारटक्के खानावळीत लज्जतदार जेवणाची उत्तम सोय झाली. तृप्त मनाने शेवटच्या डेस्टिनेशन निघालो... किल्ले बिरवाडी!
बेलखर-रेवदांडा रस्त्यावर चणेरा गाव आहे. चणेराला डावीकडे वळून बिरवाडी गावत पोहचलो. गावातून थेट भवानी मातेच्या मंदिरा पर्यंत रस्ता जातो. मंदिराच्या मागे टेकडीवजा किल्ला आहे. भरपेट जेऊन सुस्तावल्याने मंदिराच्या पायर्‍या चढायचा कंटाळा आला होता. यावर उपाय म्हणुन धावतपळत एका दमात सगळ्या पायर्‍या चढून सुस्ती घालवली. मंदिरा शेजारीच महाराजांचा पुतळा आहे. राजांना वंदन करुन बुरुजाच्या उजवी कडून चढाईला सुरवात केली.
जस जसे पुढे सरकू लागलो तशी वाट नाहिशी होऊ लागली. दुसर्‍या बुरुजा खालील वाट तर चक्क दरड कोसळल्याने बुजून गेली होती. वरखाली कसरत करत पुढे निघालो तर वाट काही सापडेना. वर बुरुज मात्र दिसत होते, पण किल्ल्याच प्रवेशद्वार काही सापडेना . गडाला बराच वळसा घातल्या नंतर पुर्वेला दोन बुरुजांत दडलेलं किल्ल्याच प्रवेशद्वार समोर आलं. दरवाजा अडचणीच्या वाटेवर असल्यामुळे बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.
वर प्रवेश केल्यावर घोड टाकं आहे. त्या शेजारुन वाट पुढे बालेकिल्ल्या कडे जाते. वाटेत एके ठिकाणी गुरांसाठी पाणी पिण्याच दगडी भांड दिसलं. गड आकाराने लहान असल्याने फार वेळ न घालवता खाली उतरायला लागलो. एव्हाना संध्याकाळ होत आलेली तरी पावसाने आम्हाला एकदाही गाठले नव्हते. घामाने चिंब भिजलेले आम्ही सगळेच पावसाची विनवणी करु लागलो.
खाली उतरताना जंगलात वाट परत नाहिशी झाली. चकवा लागावा तसा आम्ही त्या काट्याकुट्यां मधुन भरकटू लागलो. किल्ल्याची उंची कमी असल्याने खाली माची स्पष्ट दिसत होती पण पावसाळ्यात वाढलेल्या जंगलामु़ळे ढोर वाटाही बुजल्या होत्या. नविन आणि यो काठीने वाटेतील झाडोरा झोडपत वाट बनवण्याचा प्रयन्त करत होते, पण त्यांनाही यश येत नव्ह्तं. त्यातच डास फार त्रास देऊ लागले. जिप्सी आणि गिरिचे पाय सरकत होते, तोल जात होता. पण वाट सापडण्याचे काहीही चिन्ह दिसेना. भांबावलेल्या स्थितीत काय करावे कळेना. मग सगळ्यांना वरच्या दिशेने चढण्यास सांगितले. आम्ही वर पोहचे पर्यंत नविन पटापट वर निघून गेला आणि वाट सापडल्याचे शुभवर्तमान घेऊन आला. पाच एक मिनिटांत माची वर पोहचल्याने सगळ्यांना हायसे वाटले.
अगदी सोप्प्या वाटणार्‍या गोष्टी कधी कधी आपली सत्वपरिक्षा घेतात. त्याचीच प्रचिती बिरवाडीच्या किल्ल्याने आम्हास दिली. कोकणतील निसर्गाच अंतर्बाह्य रुप उलघडून दाखवणारे हे तिन्ही किल्ले कायम मनात घर करुन राहतील यात शंकाच नाही.
--------------------------------------------------

Tuesday, July 14, 2015

सह्यमेळावा


सह्याद्रीच वेड ज्याला लागलं तो शहरातल्या घोडदौडीत पुरता घुसमटून जातो. एक-दोन महिन्याच्या वर ट्रेक विरह सहन करणं त्याला अवघड होऊन जातं. आणि मग ही मंडळी निघतात ती सह्याद्रीतील घाटमाथ्यांवर... ही भटकी जमात केवळ भटकंती करुन थांबत नाही, तर वेळोवेळी वेगवेगळ्या 'बॉल्ग्स' वरुन व्यक्त ही होत असते. स्वराज्याचे हे मावळे फक्त घाट किंवा कोकणच नव्हे तर महाराष्ट्र भर पसरलेले आहेत. अश्या या सह्यवेड्या बॉल्गर्सची एकत्र मोट बांधण्यासाठी नाशिक मधे 'सह्यमेळावा'चे आयोजन करण्यात आले होते.
यंदाचे हे सह्यमेळाव्याचे तिसरे वर्ष होते. नाशिक, पुणे, मुंबई वरुन तब्बल ३० जण सटाणा तालुक्यातील चौल्हेर आणि पिंपळागडाला भेट देण्यासाठी एकत्र जमले होते. या एकत्र येण्या मागचे प्रयोजन असे की, वर्षभर इतरत्र ट्रेक करणारे सगळे ट्रेकर्स एकत्र येऊन, ट्रेक मधिल आपला व्यैयक्तिक अनुभव सगळ्यांशी share करतील. Rock climbing, rescue operation, archaeology, घाट वाटा, प्राणी आणि पक्षी तज्ञ, दुर्गसंवर्धन अश्या विविध क्षेत्रांतील मंडळी आपले अनुभव वाटण्यास उस्तुक होती.
यंदाच्या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सह्यवेड्यांना साथ लाभली ती ४ ते ९ या वयोगटातील खेळकर आणि खोडकर भावी पिढीची!!! गडावरिल अनवट वाटा असो वा गडाच्या उतारा वरिल घसारा असो... ही वानर टोळी सगऴ्यांवर मात करत उड्या मारत मनसोक्त मजा लुटत होती. दुनियादारी पासून अनभिज्ञ असलेल्या या भावी ट्रेकर्स सोबतचा ट्रेक अनुभव बरच काही शिकवणारा होता. त्यांच्या निरागस प्रश्णांची उत्तर देताना मात्र आमची दमछाक होत होती.
शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी असे बरेच कट्टे अनुभवलेले असले.. तरी हा थोरामोठ्यांचा आगळा वेगळा सह्यमेळावा लाख मोलाचा अनुभव देणारा होता.
चौल्हेर
हेमाडपंथी मंदिर
पिंपळा कडे कूच
रानमेवा - कोशिंब
पिंपळा वरिल सुप्रसिद्ध नेढे...
डोलबारी रांगेतील साल्हेर-सालोटा

इती सह्यमेळावा सफळ संपुर्णम...

Wednesday, April 15, 2015

'मर्लायन'च्या देशात...

निकोबार पासुन अंदाजे १५०० कि.मी. दुर दक्षिणेला टेमासेक (Temasek) या नावाने ओळखल जाणारं एक प्राचीन बंदर आहे. १४व्या शतकात पालेमबंग (Palembang)चा राजपुत्र त्रिभुवन (Sang Nila Utama) हा या टापु वर आला असता त्याला सिंहाचे दर्शन झाले. त्या स्मरणार्थ म्हणुन 'Temasek' बंदराचे नामकरण “The Lion City” म्हणजेच 'सिंगापुर' असे झाले.
मंगोल, पोर्तुगीज, जपानी, ब्रिटिश अशी राजयकिय स्थित्यंतरे अनुभवलेल्या सिंगापुरने १९६५ नंतर मलेशिया पासुन फारकत घेतली. चिनी, मलय, फिलिपाईन्स, भारतीय अश्या संमिश्र संकृती जोपासणार्‍या या देशाची धुरा पिपल्स अ‍ॅक्शन पार्टी (PAP)कडे आली. PAPचे दमदार नेता Lee Kuan Yew यांच्या योजना बद्ध नेतृत्वाखाली सिंगापुरने नेत्रदिपक प्रगती कडे वाटचाल केली. मलेशिया कडुन आयात होणार्‍या पाण्यामुळे बरेच वाद निर्माण होऊ लागले. त्याला पर्याय म्हणुन distilled waterचा स्विकार करणारं सिंगापुर हे एक स्वावलंबी राष्ट्र म्हणुन जगा समोर आलं. १९९० पर्यंत सिंगापुर हे आर्थिक क्रांती साठी प्रसिद्ध झालं ते 'ली कान यु' यांच्या कणखर नेतृत्वामुळेच. सिंगापुर भेटीच्या दोन दिवस आधीच त्यांच निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सिंगापुरकर्स तब्बल दहा तासाच्या वर रांगेत उभे रहात होते. ली वरिल प्रेमा खातर त्यांच्या अंतिम यात्रे दरम्यान लोकांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती.
या शिस्तबद्ध देशाला भेट देण्याचा मनसुबा नुकताच पार पडला. आधुनिकतेची कास पकडलेल्या या छोट्याश्या राष्ट्रात फिरण्यासाठी बरिच ठिकाणं आहेत. चला तर सैर करुया मर्लायनच्या देशाची...
Merlion Park
Mascot of Singapore म्हणुन Merlion प्रसिद्ध आहे. सिंहाच धड आणि खाली माश्याची शेपटी अशी या ८.६ मिटर उंच शिल्पाची खासियत आहे.
Marina Bay - Sands SkyPark
Las Vegas Sands Corpची ५६ मजली गगनचुंबी इमारत हे पर्यटकांच केंद्र बिंदू आहे. Sands SkyParkचे ३ भव्य टॉवर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १९१ मिटर उंच skyscapper वरिल Swimmng Pool आणि Observation Deck हे त्यांचे खास वैशिष्ट्य!!! Shopping पासुन casino पर्यंत सगळं काही एकाच छता खाली समावलेले आहे.
Observation Deck वरुन दिसणारा नजारा...
Singapore Flyer



Garden by the bay
दक्षिणेच्या बंदराकडील भागा लगत Garden by the bayचा १०१ हेक्टरचा परिसर वसलेला आहे. South, East आणि Central अश्या तीन भागात विभागलेल्या या अवाढव्य Garden मधिल Flower Dome, Cloud Forest, Supertrees Grove ही पर्यटकांची आवडती ठिकाणं आहेत. इथला Light show फारच नेत्रदिपक असतो.
Sentosa Island
Vivo City पासून जवळ असलेल्या या बेटा वर Universal Studio, Waterpark, Dolphin Island, S.E.A. Aquarium आणि बरेच वैविध्यपुर्ण Adventure park आहेत. इथला खजिना लुटायला दोन-तीन दिवस कमी पडतील.
मात्र वेळे अभावी आम्ही फक्त Universal Studio आणि S.E.A. Aquariumला भेट देणे पसंत केले. Universal Studio हे आधुनिक खेळ आणि करमणुकीच्या साधनांसाठी प्रसिद्ध असलेल ठिकाणं. स्वप्नातील बेट अस याच वर्णन केलं तर वावगं ठरू नये. इथे येणारे अबाल, वृद्ध आपले भान हरपुन या स्वप्नवत दुनियेत तल्लीन होउन जातात .
Loss Island
Jurasik Park
Water Show
4D show
Fast & furious
S.E.A. Aquarium
Jurong Bird Park
सिंगापुरच्या पश्चिमेला ५० एकरच्या भुभागात वसलेल आहे Jurong Bird Park. जगातील ४०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी इथे पहावयास मिळतात. आणि त्यांची योग्य निगाही राखली जाते हे विशेष!
Chinatown Street Market
सिंगापुरला येऊन खरेदी नी खादाडी करायची असेल तर चायना टाऊन शिवाय योग्य जागा नाही. काही शाकाहारी भारतीय मात्र Littile India मधेच जाणे पसंत करतात. पण चायना टाऊनच्या खाऊ गल्लीतली विविधता Littile India मुळीच नाही. चायना टाऊनच्या Pagoda आणि Sago streets वर खरेदी केल्या शिवाय सिंगापूर वारी पुर्ण होउच शकत नाही.